सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Sunday, 27 October 2019

अवकाळी अभंग


सणासुदी आला
काळतोंड्या पाण्या
कोंब दाण्या दाण्या
फोडलेस

तुझी आय अशी
अवेळी का व्याली
पिके वाया गेली
हातातली

दलिंद्र्यावाणाच्या
पेरणीच्या वेळी
कशी तू बखाडी
पाडतोस

गेल्या साली मेल्या
आला इतकुसा
जीव कसाबसा
वाचविला

आणि यंदा किती
बरसतो बापा
बंद कर खेपा
गयभान्या

बारा बापाचा तू
कितव्या बापाने
भिजवले दाणे
सांग तुझ्या

येड्याच्या बजारा
केला सत्यानास
किती गळफास
हवे तुला

अती केल्यावर
होतोस नकोसा
जाई ना तू कसा
सुक्काळीच्या

अक्कलीच्या कांद्या
कळे ना का तुला
घामातून आला
आहे तू ही

~ राजीव मासरूळकर
    दिवाळी 27/10/19
    दु. 3:30 वा

Tuesday, 15 October 2019

मला अद्यापही वाचता येत नाही

मला अद्यापही वाचन करता येत नाही

माझ्याकडे पदवी आहे
मी पदव्युत्तर पदव्या संपादन केलेल्या आहेत औपचारिकपणे
पण मला वाचन करता  येत नाही

मला वाचन करता येत नाही माझ्या दारिद्र्याचे
माझ्यातल्या कर्मदारिद्र्याचे
माझ्या नियोजनशुन्य दिनचर्येचे
माझा भवतालही माझ्यासारखाच होत चाललाय का
याचं वाचन मला करता येत नाही
सोशल मिडियावर रात्रंदिवस बरंच काहीबाही वाचत असतो मी
सुविचार, विनोद, गोष्टी, बातम्या, वगैरे
पण वर्तमान वास्तव माझ्या वाचनात येत नाही

मला वाचताच येत नाही
शिक्षित-अशिक्षितांच्या डोक्यातला आप्पलपोटा अंधार
निरागस ओठांवरचं निखळ हसू
भुकेल्या पोटाची असह्य अडवणूक
पात्रतेच्या कसोटीचे सगुणसाकार मापदंड
वाचताच येत नाहीत मला

आणि मुख्य म्हणजे
या वेगवान युगाची गती
केवळ लकाकी आणते माझ्या डोळ्यांत
पण काही केल्या ती वाचताच येत नाही मला अद्यापही....

फक्त साक्षात्कार होत राहतो मला
मी साक्षात निरक्षर असल्याचा
आणि आऊटडेटेड होत असल्याची भीती
घोर घाम फोडत राहते....

मी अक्षरं चाचपडतो आहे
21 व्या शतकाच्या दिग्मुढ वाचनपाठाची....!

राजीव मासरूळकर
दि.15/10/2019

Thursday, 15 August 2019

गझल : कुठे स्वातंत्र्य आल्यावर कुणाला देश मिळतो


कुठे स्वातंत्र्य आल्यावर कुणाला देश मिळतो
मला आनंद याचा की मला गणवेश मिळतो

दिलेले काम तो करतो निमुट बैलाप्रमाणे
मिळत काहीच नाही, बस् नवा आदेश मिळतो

इथे सर्वस्व लावावे पणाला लागते बघ
तरी केवळ सुखाचा खिन्नसा लवलेश मिळतो

किती आटापिटा केलाय बोलायास आपण
अता एकाच क्लिकवर आतला संदेश मिळतो

मनाला पाहिजे असते मदत किरकोळशी पण
नकोसा नेमका तेव्हा खडा उपदेश मिळतो

स्वत:सोबत अनेकांचे मरण तात्काळ दिसते
अशावेळीच जगण्याचा खरा उद्देश मिळतो

मला मी शोधतो आहे कधीचा पण मिळेना
कधी राजू कधी राजीव वा राजेश मिळतो

~ राजीव मासरूळकर
   दि.15 ऑगस्ट, 2019

Friday, 7 June 2019

गझल: करू शकतो

गझल

फक्त भासानेच आपण घाबरू शकतो
तो करायाचेय ते, तेव्हा करू शकतो

आज तू वापर मला वाटेल तसले पण
जप, तुला मीही तसे मग वापरू शकतो

हे खरे की पाहिजे वारा जगायाला
वादळामध्ये कुणीही गुदमरू शकतो

सावली करूणाढगांची दे फिरू काळी
देह आशेवर बळी मग नांगरू शकतो

पेटला हट्टास तर मी जिंकतो नक्की
खेळला राखून आदर तर हरू शकतो

संपली आहे तुझ्या हृदयातली हिरवळ
अन्यथा (?) तेथे मला मी अंथरू शकतो

मी पसारा हा तुला रमवायला केला
नासवू बघशील तर मी आवरू शकतो

~ राजीव मासरूळकर
   मासरूळ, दि.8/5/19
   

Wednesday, 6 February 2019

मातीत हरवल्या कविता : आस्वादक समीक्षा

ग्रामीण अस्वस्थतेचा हुंकार अभिव्यक्त करणारी वास्तव लयबद्धता  : मातीत हरवल्या कविता

शहापूर ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद या शेतीमातीतून आलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या संतोष आळंजकर या नव्या दमाच्या कवीने 'मातीत हरवल्या कविता' या आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाद्वारे मराठी साहित्यक्षेत्रात दमदार पाऊल ठेवलं आहे. या कवितासंग्रहात एकूण 81 कविता असून काही कवितांना लौकिकप्राप्त नियत-अनियकालिकांत, दैनिकांत पूर्वप्रसिद्धी मिळालेली असल्याने या कवीचा परिचय महाराष्ट्राला झालेला आहेच. 'मातीत हरवल्या कवितां'च्या निमित्ताने तो अधिक दृढ होऊ घातला आहे.
चित्ताकर्षक मुखपृष्ठ, उत्तम मुद्रण व मुद्रितशोधण ,मजबूत बांधणी व माफक किंमत ही या कवितासंग्रहाची बाह्य वैशिष्ट्ये.
आपण अंतरंगात शिरू लागतो अन् अगदी मनोगतापासूनच कवी आपल्या मनात घर करू लागतो. 'पिढ्यानपिढ्या कुणबीपण खांद्यावर घेऊन राबराब राबणा-या माणसांभोवती बालपण' अनुभवलेल्या कवीच्या 'माथी वारसाहक्काने गावाच्या माथी लागलेला कुणबीपणाचा टिळा' लागलेला असल्याचं वर्णन कवी मनोज्ञपणे करतो आणि ग्रामीण जीवनातील समकालीन कालवाकालव नेमक्या शब्दांत उद्धृत करतो.
सुरूवातीच्या 3 कवितांतून कवी बालसुलभ प्रश्नांतून अवतीभवती घडणा-या नैसर्गिक व मानवांकित घटनांचं चौकस चित्रण उभं करतो.

कोण बैसला नभात जाऊन
कोण कुंचला बसला फिरवत
मातीच्या या पाटीवरती
हिरवे अक्षर बसला गिरवत

किंवा
पाखरांचे लक्ष थवे
कोण नेतो आभाळाला
कसा फुटतो जारवा
खोल रूतल्या पायाला

अशा शब्दांतून संवेदनशील बालमनाचा अविष्कार आपल्या मनाचा ठाव घेत राहतो व कवीच्या प्रतिभेची चुणुक दिसल्याशिवाय राहत नाही. मग पुढील कवितांतून 'कुणब्याच्या डोळ्यासमोर हिरवं सपान फुलवणारा मिरूग' येतो. 'पावशाचे गोड गाणे' सुरू होते. पाभर सजते. कवीला बापात विठूराया दिसू लागतो. 'कोळप्यासंगे काळ्या ढेकळांत रोज सावळे अभंग' रंगू लागतात. 'दोनपंखी वारकरी'ही 'शेताच्या पंढरी'त जमू लागतात. दुसरीकडे सखीला हिरव्या स्वप्नाचा 'वळीवस्पर्श' होतो. बीज टरारून आल्यावर कवी श्रावणसरींची आराधना करू लागतो.

यावं श्रावण सरींनी
निळ्या पहाळ्या बनून
द्यावी गर्भार ढगांची
कूस मोकळी करून

मग पावसाची सर येते. अंगणात 'लाज-याबुज-या पोरी भिजत धुंद नाचतात.' मग पुन्हा मायबाप देवाचं 'काळीज निबार' होतं. शेतक-यांची कोवळी हिरवी मनं करपू लागतात. टाहो फुटू लागतो..

रोज माझ्या शेतावर
काय येतो आभाळून
येथे रोजचं मरण
थेंब थेंब डोळ्यांतून

'दान द्यायचंच असेल तर मोकळ्या हाताने शिवाराची झोळी मोत्यांनी भरभरून दे' अशी आर्जवं सुरू होतात. 'कुणबीण कुणब्याच्या सदा आसपास' राहू लागते. तिला बाभूळझाडाचा भास होऊन भिती वाटू लागते.

थोडी चुकता नजर
ठोका चुके काळजाचा
पाही बाभूळझाडाला
कधी तळ विहिरीचा

अशी तिची अवस्था होऊन जाते. कवी कुणब्याला खचू नकोस म्हणून धीर देऊ पाहतो. कुणब्याचा पोरगा असलेला कवी बापाचीी व्यथा मांडू लागतो..

माझ्या बापाच्या शेतात
ढग फिरलेच नाही
त्याच्या प्राक्तनाचे भोग
कधी सरलेच नाही

आपण कवितांमागून कविता वाचत जातो आणि कवी आपल्याला शेती आणि एकूणच ग्रामीण जगण्याच्या लांबलचक चकव्या गुहेत सोडून मोकळा होतो.
पुढील कवितांतून अडाणी असूनही मुलांना शाळेत घालणारी, पहाटं उठून सडारांगोळी घालून जगण्याला रंग देणारी, दळण दळून दु:खाला वळण लावणारी आई येते. उदास दुपारी दारी वाळण घालून कपाळी हात लावून गुरंढोरं चिमण्यांना दूरदुरून हाकणारी, चिमण्यांना पाहून सोडून गेल्या पाखरांची सय काढत डोळे भरून आणणारी, कुडाच्या घरात एकटीच राहणारी म्हातारी येते. चांदणझाडाला हिंदोळा देत माहेरचं बालपण अंगणात गोळा होतं. पंख लावून उडालेल्या माहेरच्या सईजणी बाभळीच्या झाडावर खोपा बांधून नांदू लागतात. सरकारी सपान डोळ्यात सलणारी, हातात काळ्या पाटीऐवजी डोंबा-याची काठी असलेली भुकेली भटकी दरवेशी पालं येतात, पाठीवर चाबकाचे कितीही फटकारे बसले तरी कधीच बंडाचे इशारे न देणारे बैल येतात. गोफण वेग घेताच नजर चुकवून कधी भुर्रकन झाडावर तर कधी सर्रकन चिकळल्या कणसांच्या धाटावर बसणा-या हट्टी पाखरांचं शब्दचित्र येतं. कवीला इथल्या दु:खी जगण्यातलं गमक दिसून येतं नि तो म्हणतो :

दिसे वृषभांचं राज्य इथे
माणसं बांधली दावणीला
उगळ टाकून त्यांच्यापुढ्यात
बैलं गेली लावणीला!

अष्टाक्षरीचा हात सोडून 'मातीत हरवल्या कविता' मुक्त वळण घेऊ लागतात.
मग लागेबांधे करून लोणी खाणारे बाजारबसवे दलाल कवीला सलू लागतात. जातीपाती, धर्म, रंग, झेंडे इत्यादिंना बळी पडून अख्खं गाव जाळायला निघालेले हात दिसू लागतात. शेतीमातीत रमणारी, गणगोत जपत आभाळ पांघरणारी माणसं गर्दीत हरवून गेल्याचं लक्षात येऊन आपण दु:खी होऊन आत्मचिंतन करू लागतो. कवी आपल्याला झाडाझुडपांत दडलेल्या, माणुसकीने भारलेल्या, कोंबड्याची भूपाळी अन् पाखरांची भजनं असणा-या आणि आता नावातच उरलेल्या गावाची सफर घडवतो. कवी म्हणतो,

मातीच्या भिंतींना लाकडांचा धीर होता
मंदिराच्या शेजारीच पावणारा पीर होता
आल्यागेल्या झोळीसाठी ओंजळभर दाणे होते
अन् अंगणातल्या झाडावर चिमण्यांचे गाणे होते

वाचत वाचत आपण अंतर्मुख होत जातो. 'सपान' कवितेत 'फक्त एवढं साल जास्ती राबून सावकाराचं रिन फेडून एक इटाचं घर बांधायचं' मायबापाचं उरी कवटाळलेलं  सपान सावकाराची कोठी भरून खोपटातंच राहून जातं आणि वाचकाच्या पापण्या ओलावल्याशिवाय राहत नाहीत. 'जातं' कवितेत जात्याकडे एकटक पाहत जात्याशिवाय जगल्या सुखदुखाला भरडत  मनातल्या ओव्यांचं पीठ करत राहणारी आई भेटते आणि आपल्या काळजाला पीळ पाडते. सशाचं काळीज घेऊन आलेली ,फाटका संसार शिवायला कायम सुईदोरा बाळगणारी, कधीच नव्या लुड्यासाठी हट्ट न करणारी कवीची आजीही कवी हुबेहूब उभी करतो आपल्यासमोर. कवीला शेताच्या बांधावरून 'साद' घातल्यावर शिवार ओलांडून त्याच आर्ततेनं ओ येते, जित्राबंही आवाजाच्या दिशेने कान टवकारून बघतात तेव्हा हायसं वाटतं, पण शहरात आल्यावर माणसांच्या अफाट गर्दीची आणि त्यात आवाज हरवून जाण्याची भिती वाटते आणि आपण अस्वस्थ होऊ लागतो. 'गाव सोडताना दाराला लावलेलं कुलूप पुन्हा उघडता येत नाही कधीच!' अशी गावातून शहरात एकमार्गी वाटांनी स्थलांतरीत होणा-या माणसांची मनोवस्था चित्रित करून कवी आपलं मन विदीर्ण करतो. कवी धरणग्रस्तांची वाताहत कथन करतो, गोडगोड बोलून पोटात चोचा खपसून आतडे पळवणा-या वेगवेगळ्या रंगांच्या नि झेंड्यांच्या गावात येणा-या झुंडी चितारतो, सरकारी टँकरची वाट पाहणारी देवपाण्याचे झरे आटलेली पापण्यांची कपार दाखवत दुष्काळकळा शब्दबद्ध करतो, तरीही कोणत्याही हंगामात चौकाचौकात हसणा-या पांढ-याशुभ्र प्रतिमांचे वाभाडे काढत बॅनरबाजांवर हल्ला चढवतो आणि कष्टक-यांच्या हाती विळी, खुरपी, कोयते देत 'एल्गार' पुकारतो. बदलत्या गावाचं वास्तव चित्रण करून तेथील खदखद व्यक्त करतो. पेशाने शिक्षक असलेला हा खडू, फळा आणि लेकराबाळांत रमणारा कवी अष्टाक्षरी, मुक्तछंद, अभंग, गझलसदृष्य रचना व  गेय कवितांतून वाचकांच्या डोळ्यांसमोर गाव उभा करीत राहतो.
एकूणच 'मातीत हरवल्या कविता' या तशा हरवलेल्या नाहीतच. त्या शेणामातीत रूजून सशक्तपणे टरारून उगवून आलेल्या आहेत. त्यांना ग्रामीण लय, ग्रामीण शब्दांचं खतपाणी घालून वाचकाहाती देत कवी संतोष आळंजकरांनी या कवितासंग्रहाच्या निमित्ताने ग्रामीण साहित्यात बहुमोल भर घातली आहे  असे नि:संशय म्हणावेसे वाटते.
★★★
शेवटी या कवितासंग्रहातली माझ्या मनाचा आत्यंतिक ठाव घेणारी ग्राम्यसंस्कृतीच्या सुकाळी उत्सवाचे चित्रण करणारी मनोहर कविता देण्याचा मोह आवरत नाहीय. ती 'सुगी' या शिर्षकाची कविता अशी:

आले सुगीचे दिवस
विळे पाजळून ठेवा
चला चला रे रानात
हळदला रानमेवा

धाट पिवळे पिवळे
वर मोती लगडले
जणू देवाचे मापडे
शेत शिवारी सांडले

मनामनाला हुरूप
टिळा मातीचाच माथी
कसे कंबर कसून
चाले आथीवर आथी

भर उन्हात सोंगणी
तरी मनात चांदणे
पीक पाहता शिवारी
सुख मावेना पोटात

असे सुगीचे दिवस
नित येऊ दे रे देवा
तुझ्या देणा-या हाताचा
कोणा वाटू नये हेवा
★★★

~ राजीव मासरूळकर
   औरंगाबाद

Tuesday, 5 February 2019

उजेड


कुडाच्या घरात रहायचो तेव्हा
उजेड हवासा वाटायचा
अंधारून यायला लागलं की
वृंदावनात दिवा पेटायचा

घासलेट पीत काळी चिमणी
पिवळा उजेड सांडायची
सकाळसकाळी नाकं काळी
सगळी व्यथा मांडायची

चारदा उठून करायची माय
विझत्या चिमणीची वात वर
तेजाळून जायचे निद्रिस्त चेहरे
आभाळ यायचं शोधत घर

कूड मोडला काँक्रिट आलं
दिपवू लागला लख्ख उजेड
बंद करूनच बल्ब बेडचा
मी पांघरतो झोपेचं वेड !


~ राजीव मासरूळकर
   दि.04/02/2019
   रात्री 11:50 वा
   औरंगाबाद

Monday, 21 January 2019

ऑनलाईन दु:ख

: hi
:hello, Priti.
:ge
:good evening
:कसा आहेस
:मी मजेत. तू?
:मी ही
:ब-याच दिवसांनी भेटतीयेस. आणि तीही ऑनलाईन?
:हो ना
:आज कशी काय आठवण आली माझी
:गप.
:गप काय गप, सांग ना
:तून ऑनलाईन दिसला म्हणून
:ह्या.. खोटं. फेकू नकोस.
:ok, bye
: 🙄   बरं बरं.. बोल मग. काय चालूये?
:काही नाही
:असं कसं? काही तरी चालू असेलच की?
:टीव्ही चालू आहे.
: 😭  अगं, तुझं काय चालुये
: बोलतीये ना मी तुझ्याशी
:   🙄 ... बरं,  जेवण झालं?
:हो
:काय खाल्लं?
:खिचडी
: ऑ....?
:तू जेवला का
:हो
:काय खाल्ल
:वरण भात भाजी पोळी
: 😜
: हसते काय अशी?
:माझ्या खिचडीला का ऑ केलं मग
: 😩
:गंमत रे... रडतोस की काय
:नाही. अजून काय चाल्लं मग
:काही नाही रे
:सुखात आहेस ना तू....?
:ऑफ्कोर्स. का रे, असं का विचारलं?
:सहजच आपलं
:शक्यच नाही. काहीतरी कारण असेलच.
:नाही गं. खुशाली विचारली मी
:hummmm...
:🙄
:तू आहेस ना सुखात
: ......... हो
:वहिनी... कशी आहे?
:छानै ती. झोपलीये
:मुलगी?
:तीही मस्तै. झोपलीये तीही
:तुला येत नाहीये झोप?
:  ........... ............... ,तुझं कुटुंब काय म्हणतं?
:मजेत आहे. ते थोड्यावेळापूर्वीच आले ड्युटीवरून. जेवले. थकले होते. झोपले.
:मुलगा कसा आहे तुझा?
:छानै
:झोपला
:नै. टीव्ही पाहतोय. 10 वाजल्याशिवाय झोपत नाही तो
:हं..... तुला येत नाहीये झोप?
:humm...
:बरीयेस ना?
:झकास आहे रे मी
:मला नै वाटत तसं. खरं सांग
:अरे काहीच नाही रे. मस्त आहे मी
:आज का बोलावसं वाटलं माझ्याशी?
:सहजच
:आठवण आली होती माझी?
:गप रे
:खरं सांग
:असं काहीही नाहीये रे
:मग कसं आहे?
:काही नाही. जा. Bye, Gn
:ok ok.... विषय बदलून बोलूया का?
: 😏
: सॉरी. गंमत केली गं.
:😏
:बरं मला सांग. तुझ्या मैत्रिणी कशा आहेत?
:तुला काय करायचंय त्यांच्याशी
:अगं तसं नाही. विषय बदलायचा म्हणून सहज विचारतोय मी. तुम्ही तीन वर्गांनी मागे होत्या माझ्यापेक्षा, तरीही सोबत खेळायचो ना आपण त्यावेळी. म्हणून आठवलं. चिंकी, मनी, आर्ची.. कशा आहेत?
:मला नै माहित
:का गं? असं कसं?
: तुला काय करायचंय? मी नै बोलत त्यांच्याशी
:का? भांडण झालं होतं?
:नै... लै शहाण्याहेत त्या. बोलणं बंद केलं मी
:स्वभाव चांगलेहेत पण त्यांचे
:तुला कशाला इतका पुळका रे त्यांचा ? तुला बरी आठवण येते त्यांची? काय?
:नाही... आपलं सहजच.
:कोणी आवडत होती का रे त्यांच्यातली ..... छुपा रूस्तम... आं?
:छे गं.
:अंहं... काही तरी नक्कीच आहे. अशी थोडीच आठवण येते कुणाची
: जाऊ दे मग. तुला जे समजायचं ते समज.  😩😏
:रागावलास
:अंहं
:किती छान दिवस होते नै का रे ते?
:एकदम मस्त
:मज्जा करायचो आपण. लंगडी, चंफुल,सागरगोटे, दोरीवच्या उड्या,लपाछपी... काय काय खेळायचो आपण
:हो ना.
:मला अभ्यासातलं काही जमलं नाही तर मी यायचे तुझ्याकडे समजून घ्यायला. चित्रही काढून घ्यायचे तुझ्याकडून. आठवतं मला अजूनही
:हं
:खूप हुशार होतास तू शाळेत. हेवा वाटायचा मला तुझा. गल्लीत तुझ्या अभ्यासाचीच चर्चा असायची.
:हो का? आयला... आणि इतर मुलींना काय वाटायचं?
:इतर म्हणजे कोण नेमकी? स्पष्ट नाव सांग. मग सांगते
:🙄   तसं नै. मी आपलं जनरल विचारतोय. जाऊ दे. फिरकी नको घेऊ
: 😜😅
:मग काय म्हणतेस अजून
:कै नै
:फेसबुकवर आल्यापासून आज वेळ मिळाला का बोलायला
:नाही रे. वेळ असतोच. पण आज बोलावं वाटलं.
:बोल ना मग
:बोलतीचै की
:कसं कायै तिकडे वातावरण?
:कुठे? औरंगाबादला?
:हो
:छानै. थंडी आहे खूप. मी अंगावर दोन रजया घेऊन बोलतीये तुझ्याशी.
:भारीये मंग.
:कसलं भारी रे....? बरं, गावाकडे कसं आहे
:तसंचै. गारठून गेलोय थंडीत.
:बरंय. बोरं आले असतील ना गावाकडे भरपूर
:हो. खूपेत. तुला आवडतात बोरं?
:खूपच आवडतात. गावरान बोरं, काकडी बोरं. शेतात जाऊन बोरीच्या झाडाची बोरं पाडून खायचे मी लहानपणी. तुलाही दिलेले कितीकदा. आठवतं?
:आठवतं ना. अजून काय काय आवडतं तुला?
:आंबे, पेरू... त्या त्या ऋतूत आलेलं सगळं आवडतं मला. तुला?
:अरे वा... माझ्यासारखंच आहे मग तुझंही. मलाही तसंच आवडतं.
:खरंच? ऐ... रंग कोणता आवडतो रे तुला?
:सावळा
:ऐ मस्करी नको. खरं सांग.
:हो गं. कृष्ण नव्हता का सावळ्या रंगाचा. हे संपूर्ण विश्वही सावळंच तर आहे. म्हणून आवडतो मला सावळा रंग.
:किती छान बोलतोस तू? तुझ्या कविता वाचत असते अधुनमधून तुझ्या वॉलवर. छान लिहितोस.
:थँक्स. तुझा कोणता आहे आवडता रंग?
:मला गुलाबी आवडायचा आधी, पण आतापासून सावळा आवडायला लागलाय.
:अरे वा.... भारीचे मग.
:आवडता विषय
:तुला माहितीये ना? समजलं नाही की मी गणित सोडवून घ्यायला यायचे तुझ्याकडे. तू लगेच समजावून सांगायचास. तोच माझा आवडता विषय.
:माझाही. आवडतं गाणं?
: तू जब जब मुझ को पुकारे मै दौडी आऊ नदियाँ किनारे...
:वॉव.... लहानपणापासून हे गाणं माझंही आवडीचं आहे. तुला माहितीये ना... गल्लीच्या कोप-यावर शंकरची टपरी होती टेपरेकॉर्डर सुधारायची? तो कायम हे गाणं लावायचा मोठ्या आवाजात.... ए धरती चाँद सितारे........ व्वा
: मी ही तेच सांगणार होते.
:बाळ झोपलं का तुझं?
:हो रे. टीव्ही पाहता पाहताच झोपला बघ तो. अरे बाप रे 11 वाजलेत रात्रीचे.
 :हो ना.. मला झोप येतेय आता. नंतर बोलुयात का?
:झोपतोस?
:हो. सकाळी लवकर उठायचंय मला. उद्या शनिवारे ना? हाफ डे...
:ठीके. झोप मग. मी ही झोपते. Bye Gn
:Gn. Sd
:cu
: ..........
 ..........
  ..........
..............
  झोप ना. ऑनलाईन आहेस अजूनही. दुस-या कोणासोबत बोलतेस का?
: 🙄 .. गप रे. यादीतल्या सर्वांना अन्फ्रेंड केलंय मी.
:का?
:असंच
:असं कसं
:करावं वाटलं म्हणून.
:मग आता ऑनलाईन का आहेस केव्हाची?
:झोप येत नाहीये
:आत्ता तर येत होती
:😩 येतीय पण अन नाही पण
:का गं?
:माहित नै
: .........
 ......... काही बोलायचंय का तुला मनातलं?
:hummm...
:काही प्रॉब्लम असेल तर नक्की सांग. काही मदत हवी असेल तर ते ही सांग.
:काही विचारायचंय रे तुला
:विचार ना मग बिन्धास्त
:नाही, नको.
:अगं विचार गं.
:नको, तू रागावशिल.
:नाही रागावणार. विचार.
:आधी मला वचन दे. तू माझ्यावर रागावणार नाहीस.
:दिलं.
:मी सांगतीये ते कोणाला सांगणार नाहीस
:का गं? असं काये त्यात
:दे
:दिलं
:गैरसमज करून घेणार नाहीस?
:ठीकै. अजून काही?
:अंहं
:विचार मग आता
: ....................
  ....................
  .................... मी तुला आवडायची का रे?
:का गं, असं का विचारतेयस?
:तू सांग फक्त.
:hum.....
:सांग ना
:तसा काही विचार नव्हता केला मी तुझ्याबाबत.
:😩
:म्हणजे तुला काही वाटायचं का माझ्याबाबत
:हं
:काय
:प्रेम होतं रे माझं तुझ्यावर . अजूनही आहे...
:काय? ..... मग सांगितलं नाही कधी तू? मला कधी जाणवलं पण नाही तसं. तू..... तू दादा म्हणायचीस मला. मग मी पाहूच शकलो नाही तुझ्याकडे तसं...
:अरे कुणाला शंका येऊ नये म्हणून म्हणायचे मी तसं. काय होतं त्यानं. आतेभाऊ-मामेबहिण हे ही तसंच नातं असतं ना... होतात ना त्यांची लग्नं? खूप प्रेम आहे रे माझं तुझ्यावर....
:...... 😩
:जर मी त्यावेळी बोलले असते मनातलं, तर केलं असतं का तू माझ्यावर प्रेम
:.............. ही जर तर ची गोष्ट आहे प्रिती. आता बोलून काय उपयोग? खूप उशिर झालाय आता.
:तसं नाही रे. माझ्या मनाच्या समाधानासाठी का होई ना, सांग ना प्लिज. मी तर मनातून स्वत:ला तुलाच अर्पण केलं होतं. सांग ना
:हे बघ. माझं लग्न होऊन संसार सुरू आहे. तुझंही लग्न झालंय. आता काही अर्थ उरलाय का?
:मी रंगाने काळी आहे, म्हणून तू टाळत होतास ना मला?
:नाही गं. तू काळी नाहीचेस. सावळी आहेस आणि सावळा रंग माझा आवडीचाय.
:मग का आवडत नव्हते मी तुला
: .......
:मी त्याचवेळी सांगितलं असतं तर तू केलं असतं माझ्यावर प्रेम? केलं असतं लग्न माझ्याशी?
:..... तू वेडी झालीयेस का?
:हो. वेडीच होते मी आणि आजही आहे तुझ्या प्रेमात
:जीव घेणारेस का आज माझा?
:तुझा कशाला जीव घेऊ मी? जीव देऊ शकते तुझ्यासाठी.
:नवरा प्रेम नाही करत का तुझ्यावर?
:करतो रे. जीवापाड करतो. जपतोही मला.
:मग
:मन नाही भरत माझं
:दिसायला माझ्यासारखाच तर आहे तो. वाईट नाही काही.
:हो रे,  म्हणूनच विसरून गेले होते मी तुला लग्नानंतर काही वर्ष.
:मग आता का पुन्हा असं?
:पण सणावाराला माहेराला आले की आठवायचास तू. दिसायचासुद्धा.
:मला माहिती असतं तर नसतो दिसलो.
:वेड्या, तुला नाही कळणार माझ्या मनातलं. तू प्रेम केलं असतं तर कळलं असतं.
: ............ मग पुढे?
:मग अचानक फेसबुकवर तू दिसलास. तुला फॉलो करणं सुरू केलं. आज हिंमत करून बोलतीये.
:हे बघ, हे चूकीचं आहे सगळं. तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो आणि तू त्याची फसवणूक करतीये.
:फसवणूक नाही रे. मी काहीच कमी पडू देत नाही त्यांना.
:तुझा मुलगा आहे 2 वर्षांचा. तरीही तू माझ्यावर प्रेम करतेस?
:हो.... काय चूक करतेय मी. मनापासून प्रेम करतेय तुझ्यावर. एकतर्फीच करत होते. फेसबुकवर भेट झाली नसती तरी करतच राहिले असते तुला न सांगताच. त्यांच्यात तुला पाहत समर्पित करत आले आहे, पुढेही तेच केलं असतं. फेसबुकनं वेडी आशा जागवली. वाटलं विचारावं तुला... तुलाही कधी माझ्यावर प्रेम करावंसं वाटलं होतं का म्हणून. तुझ्या तोंडून "I love you" ऐकायला आतुरले होते मी. वेड लागलं होतं मला. चुकलंच माझं.
:..................... सॉरी गं. मला जाणवलंच नाही कधी तुझं प्रेम. तूही जाणवू नाही दिलंस कधी. आणि आता वेळ निघून गेली आहे.
: Ok....
 ......... पण भावनेच्या भरात मी हे काय करून बसले? प्लिज, तू हे कोणाजवळ बोलू नकोस. वरचे सगळे मॅसेज डिलीट कर. आणि प्लिज हे सगळं विसरून जा. मला ब्लॉक कर.
:तसं कशाला? मी प्रेम करत नसलो तरी एक मित्र म्हणून आपण बोलत राहू ना यापुढेही.
:नकोच. तू राहशील मित्र म्हणून. आजपर्यंतही राहत आलास, पण माझं तसं कुठे आहे? मी जुन्या आठवणी विसरू शकणार नाही. तुझ्या वॉलवर डोकावल्याशिवाय जमणार नाही मला. प्लिज ब्लॉक कर मला. इच्छा असूनही यापुढे मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही. तुझ्यासमोर कोणतं तोंड घेऊन उभं राहू मी? माझी मलाच लाज वाटतेय आता. गावाकडेही मी कधीच तुला तोंड दाखवू शकणार नाही. माफ कर मला आणि प्लिज विसरून जा सगळं. ऑफलाईन होण्याआधी सगळी चॅटींग डिलिट कर. मीही करते. बाय.गुड नाईट. Love u... 😘😭😩
: प्रिती........

(मनातल्या मनात) कसं सांगू तुला माझंही तुझ्यावर प्रेम होतं म्हणून? अफाट प्रेम होतं माझंही तुझ्यावर. पण सांगू शकलो नाही कधी. घाबरायचो मी जगाला. आपली जात वेगळी. दोघांच्या कुटुंबांत गरीबश्रीमंतीची मोठी दरी. तू यायचीस माझ्या घरी. मस्त बोलायचीस, हसायचीस. खेळायचीस माझ्यासोबत. स्पर्श व्हायचे... शहारायचो. अभ्यासातही हुशार होतीस तू. तुझ्या लग्नात तू मला नक्कीच शोधलं असशील. मुद्दाम आलो नव्हतो मी. तू फेसबुकवर दिसल्यावर कोण आनंद झाला होता मला. बोलण्याचीही इच्छा व्हायची. कित्येकदा तुझे फोटो बघायचो वॉलवर जाऊन.... सगळं सगळं आठवतंय, पण काय उपयोग? मी माझ्या बायकोमुलांसोबत प्रतारणा नाही करू शकत. तू ही  तुझ्या कुटुंबासोबत तसं करू नये म्हणून नाही म्हणालो. तू म्हणतेस तसं तुला ब्लॉक करणंच योग्य. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझ्यासमोर. अलविदा... मिस यू.

~ राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
   दि.21/01/2019 02:30 am

Wednesday, 9 January 2019

हिंमत असेल तरच...


डोळे होऊन जातात आपोआप
एक सुक्षदर्शक यंत्र
अहोरात्र होत राहतं
काळाचं विच्छेदन
आनंदाचं अमृत
नि दु:खाचं हलाहल
स्थितप्रज्ञपणे सहज पचवून
अवकाळी ऋतुंचा मारा सहन करत
वाढत जातो अनुभवगर्भ
आणि अचानक
शब्दांतून कधी धुमसू लागताात ज्वाला
तर कधी शब्दांचे होत राहतात विंचू-साप-इंगळ्या वगैरे
कधी हळव्या मनाभोवती भिरभिरणारी फुलपाखरं होऊन अवतरतात शब्द
तर कधी निखळ निर्मळ माणूस होऊन
निनादत राहतात...
मग
एक रस्ता तयार होत जातो
निबीड...काटेरी... तिव्र चढउतारांचा
निसरडा
ज्यावरून ढळू शकतो
आपलाच तोल अनेकदा
लागू शकते ठेच
आपल्या आत्म्याला
रक्तबंबाळ होऊ शकतो
स्वाभिमान वगैरे
तरीही चालत जावं लागतं
शब्दांची मशाल धरून
विश्वकल्याणरूपी औषधाच्या शोधात....
शिघ्र विकसित असूनही
शिघ्रपतनाचा आजार बळावलेल्या युगासाठी...

हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये
किंवा नाहीये कॉपीपेस्ट.. शेअर-फॉरवर्डचा फंडा
रक्त आटून आटून
जन्माला येत असतो
एकेक शब्द
हिंमत असेल
तरच लाग
कवितेच्या नादाला...

~ राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
    09/01/2019
    रात्री 11:00 वा

Saturday, 5 January 2019

दिवस ढकलत जगत आहोत हल्ली

दिवस ढकलत जगत आहोत हल्ली
आपल्या जगण्यात आपलं अस्तित्वच आढळत नाहिये मुळी
आपण आपणच आहोत का असा प्रश्न पडावा
इतकं अनोळखीपण यावं
ही कुठल्या धोक्याची घंटा आहे...?
घंटाच झालंय जगणं जणु
कुणीही यावं वाजवून जावं
कोरडेठाक झालो आहोत नुसतं
या कोरड्या कवितेतल्या कोरडपडल्या शब्दांसारखेच...
डोळ्यांसमोर
डोळ्यांतून मेंदूत शिरावं
असं काही घडतच नाहीये हल्ली
कि डोळ्यांचं सेंसरच बिघडलंय आपल्या?
किती दिवस झाले असतील
डोळ्यांत एखादा अश्रू यायला
आठवत नाही
अपघातबलात्कारखूनआत्महत्याभाषणंमोर्चेचर्चा
सगळं सगळं फालतूपणा या व्याख्येत लोटून मोकळं होता येतंय सध्या
डोक्याला टेन्शन नकोय बिल्कुल कशाचंच...
मोबाईलच्या स्क्रिनवर
झळकत राहतात
ख-याखोट्या मित्रमैत्रिणींचे
नातेवाईकांचे सहका-यांचे बरेवाईट मेसेजेस
डोळ्यांत नवी झळाळी यावी
इतकं जिवंत वाटतंच नाही काही
काहीतरी उत्तर द्यावं म्हणून
मृत स्मायलीज पाठवून होतात यांत्रिकपणे
(यांत्रिकपणाच्याही पुढची पातळी गाठली गेलीय
पण आपल्याला तो शब्द सुचायचा बाकीय अजून)
इतके मूक होत चाललो आहोत आपण दिवसेंदिवस
कुतुहल वाटावं असं काही दिसतच नाहीय
हे एकाकीपण
वैयक्तिक स्वातंत्र्याचं अपत्य आहे
कि ग्लोबलायझेशनचं?

दिवस ढकलत जगत आहोत हल्ली
ही कोणत्या युगाची नांदी आहे?

~ राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
    दि.05/01/2019