सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

शब्द आले पाहिजेत...

शब्द आले पाहिजेत

शब्द आले पाहिजेत
शब्द आभाळातून थेंब आल्यासारखे आले पाहिजेत
जमीनीतुन कोंब आल्यासारखे आले पाहिजेत
कळीचे फूल झाल्यासारखे आले पाहिजेत
पानांसारखे सळसळत,
उन्हाळ्यातल्या झाडांसारखे जळत आले पाहिजेत
शब्द आले पाहिजेत....

शब्द झुळूझुळू झ-यासारखे आले पाहिजेत
सुसाट वा-यासारखे आले पाहिजेत
फणसातल्या ग-यासारखे आले पाहिजेत
हिरव्या डोंगरद-यांसारखे आले पाहिजेत
शब्द आले पाहिजेत......

शब्द बंदुकीतल्या गोळीसारखे आले पाहिजेत
तव्यावरच्या पोळीसारखे आले पाहिजेत
आईच्या उसवलेल्या खोळीसारखे आले पाहिजेत
भिका-याच्या फाटक्या झोळीसारखे आले पाहिजेत
शब्द आले पाहिजेत......

शब्द चंद्राच्या शांत गुढ खळ्यासारखे आले पाहिजेत
आर्त सुरेल गळ्यासारखे आले पाहिजेत
पिकांसह डोलणा-या मळ्यासारखे आले पाहिजेत
निळ्याशार नितळ निर्मळ तळ्यासारखे आले पाहिजेत
शब्द आले पाहिजेत......

आलेले शब्द इंगळीसारखे अंगांगाला डसले पाहिजेत
नांगर होऊन हृदयाच्या आत आत फसले पाहिजेत
मुसळधार पावसातही इंद्रधनु होऊन हसले पाहिजेत
काळाच्या भाळावर इतिहास होऊन ठसले पाहिजेत

शब्द आले पाहिजेत .....
शब्द आले पाहिजेत......!!!!

~ राजीव मासरूळकर
दि.6/9/14
रात्री 8:00 वा

गर्दी

गर्दी

किती रंग आहेत गर्दीस या
दिसे दिव्य दुनियेतली ही बया

किती रूप मोठे
खरे काय खोटे
कधी पाय लाखो
कधी हात थोटे
कुठे क्रूर होई, कधी ये दया

किती चेहरे अन्
किती वेशभूषा
किती तत्वज्ञानी
हिचे धर्म, भाषा
कधी कुंभमेळा, कधी ही गया

कधी रांग होते
कधी भांग होते
कधी लाट तर ही
कधी हाट होते
चढे रंग केंव्हा घटतसे रया

दिशा एक नाही
दशा एक नाही
विरळते, मिसळते
वसा एक नाही
हिला फक्त शत्रू, न कोणी सया

कधी हासते तर
कधी हो रडारड
कधी मूक होते
कधी न्याय्य ओरड
कधी पेंगते देत ही जांभया

मनी दाटते ही
घनी साठते ही
धरा व्यापते तर
कधी विश्व होई
चराचर हिचे नाचते थयथया

~ राजीव मासरूळकर
    सिडको बस स्टँड,
    औरंगाबाद
     दि.02/09/2014
     दु. 2:30 वाजता

रमी

स्वप्नात ती आणि स्वप्नात मी
प्रेमात आहे कशाची कमी?

का रंग जपतोस तू एवढा?
वापर तुझा होत जुळते रमी

घेतोय मी मोकळा श्वास, ही
कोणी फुलांना दिली बातमी?

कायम ऋतूंनी दिलेला दगा
झालीत मग माणसे मोसमी

देवा, सुरू कर नवी योजना
'जन्मास या, घ्या : सुखाची हमी'

~ राजीव मासरूळकर
    दि.4+12=16

हे पक्ष्यांनो

हे पक्ष्यांनो...

जगण्यासाठी मिळालेत पर, हे पक्ष्यांनो
कुणी बांधले नभात छप्पर, हे पक्ष्यांनो

शेतक-याला कष्टाचे लाभू द्या दाणे
किडे, अळ्यांनी भरले वावर, हे पक्षांनो

जे दिसते ते तसेच नसते, पारखून घ्या
वरून दिसते हिरवे गाजर, हे पक्ष्यांनो

आसपासच्या झ-यात असते जिवंत पाणी
कशास फिरता शोधित सागर, हे पक्ष्यांनो

कु-हाड, वणवा, अतिवृष्टी, दुष्काळ सोसता
कुठे लपविता नयनी पाझर, हे पक्ष्यांनो

जात नव्हे, हे पंखच तुमचे पक्के लक्षण
तुम्हा न लागो मानवी नजर, हे पक्ष्यांनो

~ राजीव मासरूळकर
   दि.8/12/2016
   रात्री 11:35 वाजता

खरपूस

माणूस नाही

गोडवा संपून गेला, ती चिपाडे, ऊस नाही
क्रूरतेने वागतो जो , तो पशू , माणूस नाही !

मायभू आधार देते , कास्तकाराच्या पिकांना
सावलीचे सोंग घेतो तो खरा पाऊस नाही !

पापपुण्याला विरक्तीला जरासा अर्थ देऊ
दान गरजूलाच देऊ, देव वा साधूस नाही

घण जरा आवर, समीक्षा स्पर्शुनी शब्दांस तू कर
लागला चटका न तर म्हण, ही गझल खरपूस नाही

जिंकल्या लाखो लढाया, घाव छातीवर मिरवले
ही कशी आता निरवता... स्पंदनी धुडगूस नाही.... ?

- राजीव मासरूळकर
  दि.10/12/2013

तिच्या मायला

#मराठीगझल_राजीवमासरूळकर_7

गझल : तिच्या मायला

मनात नुसती होते ठसठस.... तिच्या मायला
प्रेमाविण हे जगणे भंकस...... तिच्या मायला

मुका बोलतो, लुळा डोलतो, खुळा ज्ञान दे
बॉटल नसते नुसती फसफस.... तिच्या मायला

स्वार्थाआडुन उपकाराचे केळ कशाला....?
मेलो तर मेलो बेवारस... तिच्या मायला

असो बघोणे, तवा, ग्लास वा तांब्या कोणी
पत्नी असते दणकट सांडस..... तिच्या मायला

मरणा-यालाही जगण्याचे स्फुरण चढावे
गझल पकडते ती दुखरी नस..... तिच्या मायला!

~ राजीव मासरूळकर
   सिल्लोड, जि. औ'बाद
   दि.31/10/2014
   रात्री 11:45 वाजता

उगव ना आज थोडासा उशीरा यार चंद्रा

उगव ना आज थोडासा उशीरा, यार चंद्रा
निशेचा पूर्ण होऊ दे जरा शृंगार, चंद्रा

धरेवर जन्म, मृत्यू, मोह, माया, सर्व आहे
कशासाठी फिरत आहेस गोलाकार चंद्रा?

जिच्यावर प्रेम तू करतोस ती सूर्यास ध्याते
तिला बहुतेक जडला मानवी आजार, चंद्रा!

तुझ्या मातीस साधा माणसाने स्पर्श केला
किती डोळे तुझे झालेत पाणीदार, चंद्रा!

युगांपासून नुसते स्वप्न तू बघतोस, राजा
कधी होणार आहे सांग हिरवागार, चंद्रा?

~ राजीव मासरूळकर