सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Wednesday, 10 May 2017

गर्दी

गर्दी

किती रंग आहेत गर्दीस या
दिसे दिव्य दुनियेतली ही बया

किती रूप मोठे
खरे काय खोटे
कधी पाय लाखो
कधी हात थोटे
कुठे क्रूर होई, कधी ये दया

किती चेहरे अन्
किती वेशभूषा
किती तत्वज्ञानी
हिचे धर्म, भाषा
कधी कुंभमेळा, कधी ही गया

कधी रांग होते
कधी भांग होते
कधी लाट तर ही
कधी हाट होते
चढे रंग केंव्हा घटतसे रया

दिशा एक नाही
दशा एक नाही
विरळते, मिसळते
वसा एक नाही
हिला फक्त शत्रू, न कोणी सया

कधी हासते तर
कधी हो रडारड
कधी मूक होते
कधी न्याय्य ओरड
कधी पेंगते देत ही जांभया

मनी दाटते ही
घनी साठते ही
धरा व्यापते तर
कधी विश्व होई
चराचर हिचे नाचते थयथया

~ राजीव मासरूळकर
    सिडको बस स्टँड,
    औरंगाबाद
     दि.02/09/2014
     दु. 2:30 वाजता

No comments:

Post a Comment