सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Tuesday, 27 June 2017

किशोर काळेंनी मातीत जिरवलेला घाम : बांडा हंगाम

बांडा हंगाम

अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेल्या किन्ही(फत्तेपूर) ता. जामनेर या जळगाव जिल्ह्यातील मराठवाडी दुष्काळी हवा लागलेल्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, शेतक-यांचा संघर्ष बघत, अनुभवत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्ताने सध्या विदर्भात बुलडाणा येथे स्थायिक झालेल्या *कवी किशोर भगवान काळे* यांचा शेतक-यांची व्यथा मुखर करणारा 87 कविता असलेला पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे *बांडा हंगाम*!

अस्सल ग्रामीण विशेषत: शेतकी तावडी शब्दधन घेऊन आलेली ही समृद्ध ग्रामीण कविता आहे. कवितेतलंं मला फारसं कळत नाही असं मनोगतात कवी म्हणतो, पण ते खरं नाही. ती कवीची विनम्रता आहे फक्त.
शेतीमातीशी कवी इतका एकरूप झाला आहे, कि जणू तो आपली आत्मकथाच कवितांतून डोळ्यांसमोर उभी करतोय असं वाटत राहतं वाचताना.

तसं पाहिलं तर या काव्यसंग्रहाला *प्राचार्य डॉ. किसन पाटील, जळगाव* यांची सविस्तर 16 पानांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी कवीच्या ग्रामीण तावडी बोलीबाबत, शेतकी शब्दसंग्रहाबाबत, प्रत्येक कवितेवर सांगोपांग उहापोह आपल्या प्रस्तावनेत केला असल्यानं आपण वेगळं काय लिहिणार असा प्रश्न मनात होताच. परंतु कवी किशोर काळे यांनी जाणीवपूर्वक कवितासंग्रह पाठवून अभिप्राय कळविण्याचा आग्रह धरला होता. म्हणून आस्वाद घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

*बांडा हंगाम मधील बाप :*
'बांडा हंगाम'मध्ये अनेक कवितांतून कवी किशोर भगवान काळे यांनी गावागावात घरोघरी आढळणारा शेतकरी बाप आपल्या खास शैलीत उभा केला आहे. अनेक ग्रामीण उपमारूपकांतून हा बाप वाचकांना आपलासा करून जातो. बापाचं शेतीभोवती गुरफटलेलं व्यथाविश्व रेखाटताना
त्यात डोळे खोल गेलेला, वांझोट्या हंगामात शिवाराचा झालेला उन्हाळा किलवाण्या नजरेनं पाहत राहिलेला बाप येतो. पावसाळा तोंडावर आला तरी विरत नसलेल्या; वखराला, रोट्यालाही दाद न देणा-या इरेला पेटलेल्या ढेकळांना कुटण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून तो हातात 'मोगरी' घेतो.

हवामान खातं नेहमीप्रमाणंच चुकीचा अंदाज व्यक्त करत राहतं. हंगाम आणखीच बांडा होत जातो.
*प्रमुख पाहुणे वेळेवर न आल्यानं*
*उडावा बोजबारा*
*एखाद्या साहित्यसंमेलनाचा*
*तसंच होतं शेतक-याचं*
*पाऊस वेळेवर न आल्यानं*
दुबार पेरणीची वेळ येते. शेतकरी बाप कर्जाच्या ओझ्याखाली दबू लागतो. 'आयुष्य मिरचीच्या ठेच्यासारखं कोरडं खट्ट' होत जातं. जमवलेली पुंजी, बायकोच्या अंगावरचं किडूकमिडूक जमिनीत पेरून बटाईनं शेटजीची शेती कसताना हा बांडा हंगाम येतो तेंव्हा, हवालदिल होऊन
*हातात तांब्याभर पाणी घेऊन*
*तो चेकाटत असतो ढगांकडे पाहून*
*घ्या रे कोल्ड्या ढगाडाहो*
*घोटभर पाणी प्या*
*नल्डा सुकला अशिन तुमचा*
मग या बापाला दिलासा द्यायला मोफतच्या टोलेजंग व्यासपिठावरून समोर केवळ कापसाच्या गंज्याच दिसणारे, चहातून गायब झालेली साखर भाषण करताना तोंडातून ओघळणारे पुढारी येतात. हे माफ... ते माफ , मालाला गच्च भाव अशी 'गंदीबात' शिवी वाटणारी आश्वासनं तोंडावर मारून निघून जातात. 'देवाधर्माच्या नावांनं थोतांड'ही घडत राहतं ठिकठिकाणी. म्हाता-या बैलाशी 'सायड' करत नाही कुणी, तसं एकाकी होत जातं जगणं. पाऊसही त्याच्या पडलेल्या नशिबाशी युती करून घेतो. 'गणितात हुशार असलेला बाप टुघ्नी लागून' आयुष्याच्या गणिताला शरण जातो. 'स्वत:च्याच विषयात अभ्यासाच्या कैक आवृत्त्या करूनही नापास ठरतो.' शेतकरी होऊन जगणं हे औत ओढण्याइतकं सोपं नाही हे समजून घेऊन बैलही दानचा-याला जागू लागतात. पाऊसरूपी 'फॅमीली डॉक्टर' काही केल्या वेळेवर येत नाही. आलाच तर 'बैलाच्या थेंब थेंब मुतासारखा' येतो. मुलीची सोयरीक, मुलाची फी साठी कटकट, सावकाराचा तगादा सुरू होतो. समुद्र नाहीच मिळाला तरी चालेल, पण
*आपलेपणानं*
*दोन थेंब देऊन*
*आतून बाहेरून*
*चिंब करणा-या ढगांसाठी*
ईश्वराचा धावा सुरू होतो.

*माणसाने द्यावी माणसाला उभारी*
*पण माणूसच सावज इथे माणूसच शिकारी*

*ढोरा पोरांच्या चा-यासाठी*
*भुईदासाचे रोम जळे*
*थेंबासाठी हैराण तो...*
*बगळ्यांच्या ताब्यात तळे*
अशी अवस्था होऊन जाते. घोषणांची झुल अंगावर चढवून आश्वासनांच्या नाथा टोचून घेऊन आमिषाच्या चाबुकानं मुरलेल्या भाद्या बैलासारखं खाली मान घालून लोकशाहीचं गाडं हाकलं जातं.

 *"शेती ही पिकविण्यासाठी असते, विकण्यासाठी नाही"* , हे हृदयाच्या ठोक्याठोक्यात बिंबवलेलं असतं त्यांनी. पण
'सोईरपणातल्या सौद्यांचे सोहळे पार पाडून पोरीचे हात पिवळे करण्यासाठी विकावी लागते त्याला शेती.' कुणाला विकतो?
*ना गाळला घाम कधी*
*ना अंगाला माती आहे*
*काळ्याचं पांढरं करण्या*
*नावे त्यांच्या शेती आहे*
अशा काळा पैसा लपविण्याचा घाट घातलेल्या पांढरपेशा, भ्रष्ट धनदांडग्यांना शेती विकली जाते. खरा शेतकरी बाप भुमीहीन शेतकरी बनून त्याच मातीत राबत राहतो. हातात केवळ रूमण्याचे मुठ्ठे अन् त्यानं हातावर पडलेले घट्टेच राहून जातात.

*'बा'चं जीणं जीर्ण*
*धुडक्याचा बोळा*
*मनामधी तरी*
*मातीचा उमाळा* अशा प्रकारे कवी शेतकरी बापाचं हुबेहूब चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभं करतो.

तसाच बारवर 'दर्यादिली' दाखवत मित्रांसोबत चखण्यात घरदार चघळणारा अन् मद्यात सातबारा रिचवणारा बापही कवीने जोरकसपणे रेखाटलेला आढळतो.

*बांडा हंगाम मधील माय* :

या कवितासंग्रहात माय फारशी आढळत नसली तरी ती संघर्षरत बापासोबत परिस्थितीशी लढा देताना सतत जाणवत राहते. हताश बाप वाळलेल्या पिकाकडे किलवाण्या डोळ्यांनी पाहत बसल्यावर लेकराच्या रूपात भविष्यातले कैक हंगाम दाखवणारी खंबीर माय इथं बघायला मिळते. चूल फुंकत डोळ्यांतून ओघळणा-या आसवांवर भाकरी थापणारी, लाज झाकण्यासाठी चिंध्या चिंध्या जोडून लुगडं नेसणारी, अडाणी असूनही बापाच्या चेह-यावरचे भाव वाचणारी, पेरणीसाठी अंगावरचं किडूकमिडूक देणारी , दम्यासाठी दवाखान्याची आस धरून बसलेली मायही कवी मांडून जातो. जमीन नावाची माय तर आहेच आहे.

*आजोबा*

बांडा हंगाममध्ये गावात हमखास आढळणारा *आजा*ही एकदोन कवितांतून लक्ष वेधून घेतो. ताटात पडलेलं उष्ट किंवा उकिरड्यावर गेलेले चा-यातील धांड्यातील सग पाहून आज्याच्या आवाजाला धार येते. मग तो त्यानं पचवलेले बरसादीतले उन्हाळे पोटतिडकीनं सांगत सुटतो. काटकसरतीत जगण्याचं तत्वज्ञान मांडत बसतो. मोटारीपेक्षा मोटंच बरी म्हणणारा आजा पीटरकडे पाहून म्हणतो, "जाळा तेल, करा भाकरीला भोकरं महाग."

*मुलगा*
बांडा हंगाममधील बहुतांश कवितांचा निवेदक म्हणून शेतक-याचा मुलगा बनून कवी आपल्यासमोर येतो. तो बापासोबत, आईसोबत, आज्यासोबत घडणा-या घटनांचा जणू साक्षीदारच आहे. तो संवेदनशील आहे. तो शेतकरी बापाच्या आयुष्याची तुलना कवीसंमेलनातून हताशपणे परतणा-या कवीशी करतो. आज्याच्या काटकसरीची कथा समंजसपणे सांगतो. ढुंगणावर ठिगळं असलेली चड्डी घालणारा, पेरणीआधी बापासोबत पैशांसोबत दम देणा-या सावकाराकडे जाणारा, बाजारात डोळे खोल गेलेला बाप तब्बेतीनं गोल असलेल्या लोकांना भेटल्याचं निरीक्षण नोंदवणारा मुलगा येथे आढळतो. मायबाप नशिबाचं गा-हाणं सांगत असताना
*"बाबा, मले नही शिवता येणार*
*आपलं फाटकं आभाय..*
*पण मी लावून घीन माह्या*
*फाटक्या चड्डीले थिगाय*
*मक्याच्या थैलीचं मी*
*बनवून घीन दप्तर*
*रद्दीतल्या वहीत*
*लिहिन प्रश्न उत्तर*
*बाबा, सांग ना कधी जागीन*
*भजनामधला विठू?*
*बंद होतीन पेपरात येणारे*
*लटकलेल्या माणसांचे फोटू?*
असा आत्मविश्वासाची भाषा बोलत व्यवस्थेला प्रश्न विचारणारा मुलगाही कवी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत रेखाटून जातो. त्याचबरोबर बापाला बाप झाल्याचं पाप वाटावं असं मोठं झाल्यावर वागणारा, नोकरी लागल्यावर भाऊ, मायबापांना टाळणारा, विभक्त कुटुंबपद्धतीला शरण गेलेला मुलगाही कवी ताकदीने शब्दांत उतरवतो.

यासोबतच अनेक कवितांतून कवीने बैलांबाबत कृतज्ञता व बैलांची शेतक-याबाबतची कृतज्ञता शेतीशी संबंधीत विस्मृतीत गेलेल्या अनेक वस्तूंच्या उल्लेखांसह अभिव्यक्त केली आहे. अस्सल ग्रामीण शब्दांतून ग्रामीण व भौगोलिक वातावरणनिर्मिती साधली आहे. एक संपूर्ण गावगाडाच काव्यसंग्रहातून उभा केला आहे. सावकार, राजकारणी व्यक्ती, शिवराय आदिंना पाचारण केले आहे. शेतक-याचं शेतीमातीशी व भवतालाशी जोडलं गेलेलं अवघं आयुष्य चितारण्याचा यशस्वी प्रयत्न कवीने केला आहे. बहुतांश कविता ही छंदमुक्त स्वरूपात असून एक गीतरूपात तर तीन अभंगरचनेच्या स्वरूपात प्रकटलेल्या आहेत. बांडा हंगाममध्ये शेतक-यांच्या आयुष्याची नकारात्मक बाजू मांडत असताना काही प्रेरणादायी कविताही कवी रचून जातो. शेतक-यांच्या उत्थानासाठी शिवरायांना पुन्हा जन्मण्याचे साकडेही घालतो. एकदोन कवितांतून शृंगाररसालाही हात घालतो.

एकूण शेतक-याचं भलं व्हावं या उदात्त हेतूनं शेतक-यांची होणारी अस्मानीसुलतानी होरपळ रेखाटण्याचा कवीचा प्रयत्न अत्यंत यशस्वी झाला आहे असंच म्हणावंसं वाटतं. किशोर भगवान काळे हा नवा ग्रामीण कवी मराठीला मिळाला हे अभिमानानं सांगावसं वाटतं.

आकर्षक सुसंगत मुखपृष्ठ व मलपृष्ठ, कागदाचा उत्तम दर्जा, अचूक अक्षरजुळवणी, उत्कृष्ठ बांधणी व डॉ.किसन पाटील यांची पाठराखण यांमुळे या कवितासंग्रहाचे संग्राह्यमुल्य निश्चितच वाढले आहे यात शंका नाही.

बांडा हंगाम हे शिर्षक जरी नकारात्मक असलं तरी कवी पावसाबाबत, हंगामाबाबत सकारात्मक आहे. याच भावनेतून तो आवाहन करतोय,

*तुझ्यावर सा-या*
*कुणब्याची धौस*
*पूरव ना हौस*
*पेरणीची*||

~ राजीव मासरूळकर
   गटशिक्षणाधिकारी
   पं.स.सोयगाव जि.औरंगाबाद

बांडा हंगाम (कवितासंग्रह)
कवी- किशोर भगवान काळे Kishor Kale
अथर्व प्रकाशन,धुळे
एकूण पृष्ठसंख्या - 112
किंमत - रू.150/-

Thursday, 15 June 2017

पश्चाताप


हे पृथ्वीमाये,
तुला कधी प्रश्नच पडला नाही -
"मी माणूस जन्मालाच घातला नसता तर ?"

या पांढऱ्‍या पायांनी
का तुडवून घेते आहेस तू
स्वतःचं स्वयंभू, सोनेरी कपाळ ?

तू याला पंचतत्वांतून जन्मी घातलंस,
रानावनांतून वाढवलंस,
उधळून दिलास तुझा
प्रचंड वेदना सहन करून साठवलेला
स्वयंनिर्मित
पोटभर खजिना याच्यावर . . . . ,
रक्ताचं लेकरू म्हणून सांभाळंस याला तू,
सृष्टीची शोभा दाखवलीस,
निर्झराचं गीत ऐकवलंस,
भरभरून मेंदू दिलास याच्या डोक्यात . . . . . .

आणि आज . . . .
तुझा सर्वात मोठा शत्रू कोण
म्हणून विचारलं
तर काय उत्तर देशील . . . . . ?
'माणूस'च ना . . . . . ?

तू रागावतच नाहीस याच्यावर
असंही नाही म्हणत मी
क्रोधानं तुझं थरथरणंही अनुभवलंय !
पण
पुन्हा तू शांत झालीस की
हे पृथ्वीमाये,
वाटतं -
तू
माणसाला जन्म दिल्याचा पश्चाताप करीत
अश्रू ढाळीत बसली आहेस . . . . . !

- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो"
२००६ मध्ये प्रकाशित

Friday, 2 June 2017

यावे सूर्यदेवा


या हो सूर्यदेवा, या हो सूर्यदेवा ।
सोनसळी किरणांचा वाजवित पावा ।।

उंच बंगल्यांआधी झोपडीत माझ्या या ।
समतेचा ममतेचा गंध ऊधळीत या ।
या, तुम्हीच धरतीवर शांतीरोप लावा ।।

जळजळत तुम्ही या जातीपाती जाळा ।
खळाळत वाहूनि न्या मनातल्या मळा ।
प्रकाशातल्यांचा तव धर्म एक व्हावा ।।

अनंत उर्जाव्रत ल्यालेले महर्षि तुम्ही ।
अनंत अक्ष दक्ष यक्ष ज्ञानयोगी तुम्ही ।
चराचरात स्पंदनात तुमचाच धावा ।।

या हो सूर्यदेवा, या हो सूर्यदेवा ।।

 - राजीव मासरूळकर

सोहळा :- एक निसर्गकविता


दूर पसरल्या आडव्यातिडव्या धुसरधुसर डोंगररेषा
पक्ष्यांच्या पंखांत मिसळल्या सैरावैरा दाही दिशा
घुंगूर बांधून झाडीमधुनि खट्याळ वारा नाचतसे
उदासीन मम मनास अलगद स्पर्शून जाती मोरपिसे
.
नव्या वधुची हळदी साडी उन तसे हे अल्लड नवखे
नदीत देई स्वतःस झोकून चांदी होऊन पुन्हा लकाके
उंचावरूनि उडी घेऊनि दुधात मिसळे इंद्रधनु
कातळ काळा खोदीत बसला कुणी तपस्वी ऋषी जणु
.
अशात दुरवर मृग्जळी खडीचा तुझ्या साडीचा पदर उडे
धावून थांबे सूर्य क्षितिजी जणु तव अधरि मम अधर गडे
संध्याराणी बाहुपाशि दे ज्वलंत आलिंंगण सूर्यास
हिरवी झाडी भरात निर्मी कातर काळा कुंतलभास
.
असा सोहळा शितलतेच्या शांतिदुताच्या आगमनी
महात्म्यासही वाटे सार्थक जीवन धन्य महा गमनी !
.
-राजीव मासरूळकर

कविता असते एक रसायन


कविता आहे एक रसायन !
सुखदुःखाचे आवेशाचे
मानवतेचे करी नित पुजन
कविता आहे एक रसायन !

जीवन जेव्हा पडते झडते
रडते अन् एकाकी पडते
तेव्हा हो कवितेचे सृजन
कविता असले एक रसायन !

कळितून जेव्हा फूल उमलते
भ्रमर तयाभोती भिरभिरते
कविता येते मरंद होऊन
कविता बनते एक रसायन !

मेघ बावरे मनास व्यापून
आभाळाला आणते दाटून
कविता छेडे मल्हारी धून
कविता असले अजब रसायन !

रूग्णाला ये वैद्याचा गुण
कुणी न फेडे आईचे ऋण
अशी कविता अशीच झिरपण
कविता स्त्रवते तेच रसायन !

स्वातंत्र्याची हो गळचेपी
अधिकारी गोचीड रक्तपी
कविता करते रणआक्रंदण
कविता असली एक रसायन !

मानवतेने करी प्रशासन
प्रेमाचे तिज पुरे प्रलोभन
कविता ऑक्सिजन हायड्रोजन
कविता आहे एक रसायन !

- राजीव मासरूळकर

पाऊस शोषणाचा...



पाऊस शोषणाचा पाऊस घोषणांचा
रक्ताळल्या मनाचा पाऊस भक्ताळल्या गणांचा
पाऊस वासनांचा पाऊस दूषणांचा
लाटल्या धनाचा पाऊस फाटल्या क्षणांचा . . . . . . .

आतड्यांना पिळणाऱ्‍या यातनांचा पाऊस
कातळाला चिरणारा आक्रोशांचा पाऊस
पाऊस माझ्या नितळ निर्मळ आसवांचा भुकेला
पाऊस माझ्या गोरगरीब कासवांचा भुकेला . . . .

भाषणांचा पाऊस शासनांचा पाऊस
रिक्त बंदुकी फैरींंसारखा आश्वासनांचा पाऊस
धर्मआंधळ्या, जातआंधळ्या अमानुषांचा पाऊस
माणसातल्या पिसाटलेल्या जनावरांचा पाऊस
पिसाळलेला पाऊस बोकाळलेला पाऊस
सोकावलेला पाऊस हपापलेला पाऊस . . . .

मधाळ रसाळ ओठांमधून
झुळझुळणारा पाऊस
श्वासांमधला घासांमधला प्रेमाचा पाऊस
दैवतांचा पाऊस दानवांचा पाऊस
रौरवात सडणाऱ्‍या मानवांचा पाऊस
पाऊस माझा अधूनमधून भूरभूरणारा
पाऊस माझा अधूनमधून हुरहुरणारा . . . . .

पाऊस माझ्या
खेड्यामधल्या माऊलीच्या
डोळ्यांमधून झिरपणारा
पाऊस माझ्या शेतामध्ये राबणाऱ्‍या
उघड्याबंब देहामधून
रक्तासारखा निथळणारा
कळ्या असून मळ्यावर
राबणारा पाऊस
हात पाय डोके असून
रस्त्यावरती स्वार होऊन
अनंग भनंग हात
पसरवणारा पाऊस . . . . . .. . . . !

पाऊस सतत वाढतोच आहे
पाऊस सतत चढतोच आहे
लक्षावधी हातांनी
पाऊस सतत लढतोच आहे !

एक दिवस पाऊस सगळा
असा तसा जाईल थांबून
कारण तेव्हा माझी तुमची
पृथ्वी गेली
असेल भंगून . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर

दिनचर्या


नद्या वाहती गळ्यात लेवून मंजुळ घुंगूरमाळा
नव्या डहाळ्यांवरती भरती नव्याच पाखरशाळा
लक्ष पित अश्वांवर आरुढ पूर्वराज मग येई
कळ्यांस चुंबून कोमल अधरे हसू तयांचे पाही
पहाटवारा वेडा सुटतो स्पर्शत चराचराला
अन् सर्वत्र चलाचलांच्या धावपळीचा पोळा

कलकल वळवळ शिव्याशाप अन् चळवळ मारामारी
काळही बघतो भांबावून ते थांबवून एकतारी
दुपार होता स्वेदसिंंधुला उधान भरती येते
त्यात अधांतरी अर्धी पृथ्वी गटांगळ्या खाते
संध्यासमयी सुटतो ताजा गृहआकर्षक वारा
चिमण्यांसाठी घेऊन चारा येती वत्सलधारा
काळोखाची जाड घोंगडी घेऊन अंगावरती
काळ, कळा अन् स्वप्ने लेवुन भविष्यचक्रे फिरती !

- राजीव मासरूळकर

सायंकाळ


थकलेल्या धावुन धावुन
छायांना येते ग्लानी
उरलेले चारच क्षण हे
उन्हाच्या येते ध्यानी

कळसावर फडकत झेंडा
मरगळून होतो शांत
हसणारी द्वाड फुलेही
कोमेजुन बसती सडत

त्यागून भूजंगी लाटा
सागरही होतो सुस्त
अन् पाऊलवाटा होती
अर्धांंगवायूने ग्रस्त

देहावर भक्कम होतो
मग सांधेवातही स्वार
दिक्काला भेदणारी
दृष्टीही खाते मार

तरि अंधाराशी घेती
सारेच जोडुनि नाळ
जन्मण्या नव्याने बसती
कवटाळून सायंकाळ !

-  राजीव मासरूळकर

अविवेकाची नागीण


पृथ्वीखालून सळसळून
नाग
झाला अदृश्य
तेव्हा झाला
सर्वांगाचा थरकाप
आणि
मेंदूच्या ठिकऱ्‍याठिकऱ्‍या . . . !

पण नाग नव्हताच तो . . . . . . . .
ती होती
विषारी वेटाळ्यांची
पृथ्वीव्यापी
अविवेकी नागीण . . .  !
कारण . . . . . .
नागीण जेव्हा सळसळते
तेव्हा तिला नसतो चेहरा
असतं फक्त कमनीय शरीर
मणक्यामणक्यात डुख धरून बसलेलं . . . . .
अंधारासाठी आसुसलेलं  . . . . . . . . !

पृथ्वीखालून सळसळून
नागीण झाली अदृश्य
आणि
अवतरली भूवर
पसरली सैरभैर . . . .
बसली
कणामनांना विळखा घालून . . . .
पर्वताएवढा फणा काढून
असंख्य अस्वस्थ फुत्कार टाकत . . . . .  !

ती संपेल
तेव्हाच संपू शकेल
उजेडाचा ध्यास असलेल्या
पृथ्वीची अंधारकथा....!

-राजीव मासरूळकर

पीळ


मेघांना फुटता पंख
मारिती डंख
पोपटी पक्षी
ढग् छेडी संथ सतार
क्षितिजापार
धरेच्या वक्षी !

क्षितिजावर उडते धुळ
नभीचे फूल
लाल लखलखते
जिव्हास्रा सुटते लाळ
आतड्यां पीळ
विश्व वखवखते !

लेवून सावळे कोट
तमाचे लोट
मार्ग आक्रमती
सृष्टीचे मनहर घाट
विखारी घोट
प्राशूनि शमती !

- राजीव मासरूळकर

बलात्कार


नग्न नदीस मागती भोग
काळेगोरे मेघ
मारती डोळे
रानाला पडते भूल
नदी त्रिशूल
साहते चाळे

नाकारती पाहून धाव
दाविती भेव
कडाडून वीजा
नदीही नाही भीत
दाखवी दात
वाकडे कि "जा"

मेघांचे फिरते डोके
वाढती ठोके
साहे ना अंगार
कोसळती होऊन थेंब
ओतूनि दंभ
करती बलात्कार

ओढुनि सर्व मेघांना
मोडुनि माना
नदी सळसळते
मेघांना अंश नि अंश
करूनि दंश
सागरा मिळते !

- राजीव मासरूळकर

तृप्ती


पावसात थेंब थेंब
झाड झाले चिंब चिंब
गगनाचे प्रेम् अगाध
झाड लुब्ध स्तब्ध मुग्ध

थेंब चुंबी पान पान
झाडाला नाही भान
खोडावर फिरवतात
अनुरागी थेंब हात

झाड साहे मुकपणे
वर्षावेग आलिंंगणे
चित्ती पूर्ण मधुर मोद
गात्र गात्र तृप्त धुंद

प्रेम सारे रितवून
मेघ गेले हरवून
टपटपे लक्ष लक्ष
झाडाचे विरही अक्ष !

- राजीव मासरूळकर

सांगावा


सांगावा गोठून गेला
का मोरपिसांच्या ओठी?
वाळूतून उसळे पाणी
त्या डोह आटल्या राती!

कोसळली अंधारावर
वाऱ्‍याची अजस्र लाट
बेभानल्या दिशाही अन्
थरथरली राकट वाट

क्रोधाचे उठले मेघ
म्यानीतून काढीत वीज
अवसानघातकी वेडे
टरटरून उठले बीज

सरसरून आले काटे
अंधारमाखल्या देही
भेसूर भुंकती भूते
बेभान दिशांनी दाही

तरी रसरसलेल्या तुझिया
ओठांतून फुटले मंत्र
दवबिंदूंनी थरथरले
गवताचे गात्र न गात्र

सांगावा परतून आला
त्या मोरपिसांच्या ओठी
वाऱ्‍याला सुटला गंध
हळूवार पेटल्या वाती !

- राजीव मासरूळकर

पावसा रे.... जमिनीचे आवाहन


जमीन :
पावसा रे थांब ना रे
येऊ दे मज तुज सवे रे
मज लागली तुझी रे तृषा
मनोभावे पुजीले तुज ईशा
किती वाट पाहिली तुझी मी रे
तू आलासी किती उशीरा रे
मन व्याकूळ व्याकूळ झाले रे SहोS
पावसा रे SS

थांब ना रे प्रियकरा रे
शेतकरीही टाळती रे
मज नापीक म्हणती सारे
नांगरणी न करती कुणी रे
तू खूप खूप इथे बरसून जा
अथवा मज सोबत घेउन जा
मग मी राणी नि तू राजा SहोSS
साजना रेSS

पावसा रे आणखी रे
मजवरी तू बरस ना रे
निर्वस्त्र रे किती मी चालू
मज नेसू दे हिरवा शालू
फुलतील कळ्या डुलतील फुले
येतील मुले झुलतील झुले
कुणी पेरील तर पिकतील मळे SहोS
ओ सजना रेSS

या जना तू सांग ना रे
चांदण्या वा पेर ना रे
नाही येत मुले म्हातारे
चरण्याही न गुरे वासरे
मी पिकवीन सोने मोती रे
फुलपाखरे येतील त्यावर रे
कोकीळही गाईल मधुर स्वरे SहोS
पावसा रे SS

पाऊस :
ओ धरे गं धीर धर गं
झेल मजला हस जरा गं
मी ऐकली तुझी गं व्यथा
जाहलो मी तुझा सर्वथा
तू बोलव येईल वेगाने
पिकवीन तुजवरती मी सोने
सोडून रडणे तू गा गाणे SहोS
गं सजनी गं SS
ओ हो ओ हो हो हो

- राजीव मासरूळकर
  ऑगस्ट 2002

पडझड


आभाळमोठी श्वासांमधली
विचारवेडी धडपड
व्यथाव्यथांतील मनोकथांतील
भूकंपव्याली पडझड

पण परंतु गटारजंतू
रटरटणारी रडपड
झिणझिणणारी थरथरणारी
निरर्थप्याली चरफड

वांझविषैली झांज सुरैली
श्याममनोहर गडगड
दुभंगलेल्या पंखांमधली
पहाडफोडी फडफड

आस्तित्वातील नास्तित्वातील
वळवळणारी धुळवड
अबोलतेतील अलिप्ततेतील
कळवळणारी परवड !

- राजीव मासरूळकर

सुखात रूजते नाशाचे बीज


गड्या उद्याची करशील तजवीज ?
सुखात रूजते नाशाचे बीज !

भुक्या न देता धन साठवले
सुखादुःखातही ते न आठवले
येई वारसां खाता माज
सुखात रूजते नाशाचे बीज !

विद्वानाने उचलून वीडा
सुरवंटाची शमविली पीडा
हीच धरायुची खरी झीज
सुखात रूजते नाशाचे बीज !

गतिमांद्य दे गणक संगणक
यंत्र तंत्र शैथिल्य शारीरिक
समजून घे तू घामाचे चीज
सुखात रूजते नाशाचे बीज !

दुःख जन्म दे सत्कार्याला
दुःखच नेते समानुभूला
सुखलोलूप दे सोडून लाज
सुखात रूजते नाशाचे बीज !

सदा होतसे शक्तीचा जय
कष्टातून हो शक्तीचा उदय
सुखास जाळो दुःखाची वीज
सुखात रूजते नाशाचे बीज !

- राजीव मासरूळकर

प्रश्नोत्तरं


प्रश्नाला नसते डोके
आणि उत्तराला स्वतःचे पाय !
तरीही उद्दाम प्रश्न
मुद्दाम काढतात डोके वर. . . . .
हजारो हस्तिपदी प्रकांड प्रश्न
उत्तरांच्या डोक्यावर
करतात तांडवनृत्य
विनयी उत्तरांना आणतात जेरीस . . . . .
तुफान गारपिटीत
निष्पर्ण व्हावेत वृक्ष
तशीच निरूत्तर होतात
उत्तरं. . . . . . .
पण
जखमा कुरवाळत बसायला
उत्तरं माणसं असतात थोडेच . . . . . . . . . . ?
उन्हात रापलेलं बीज
अंकुरतंच पावसाळ्यात
काळ्याकुट्ट कातळाच्या फटीतूनही . . . . . . . . . . . . . !
अपरिहार्य उत्तरांनाही फुटतात
तेजस्वी शब्दांकुर . . . .
मग गळून पडते
प्रलयंकारी प्रश्नाचे
प्रमादी डोके
शाश्वत उत्तरांच्या
निर्मळ निराकार पायांशी . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर

काय करावे?

काय करावे . . . . . . ?

दिशाच येता अंगावरती धावून
कुठार होऊन
मी कुठे पळावे ? काय करावे . . . . . . . . . ?
कि व्हावे मांजर . . . . . . . . . ?
खूप साहिले म्हणून सत्वर
दिशादिशांच्या सैल गळ्यांचे
घोटच घ्यावे . . . . . ?
काय करावे . . . . . ?

घराघरांना फुटता तोंडे
फुटू लागता काची भांडे
दिसू लागता नाच नागडे
मी कुठे पळावे ? काय करावे. . . . . ?
कि व्हावे धरणी . . . . ?
झणी उठावे कंप पावुनी
पुन्हा एकदा पूर्ण जगाला
हडप्पापरी गडप करावे . . . . . . . . . ?
काय करावे . . . . ?

मी थेंंब होऊनि ढगातुनि बरसावे
मी व्हावे धरणी हिरवळीतुनि गावे
मी मुक्या कापल्या फांदीतुनि रडावे
मी ओठी दीनांच्या हसू पेरूनि जावे !

- राजीव मासरूळकर

काजळी


अनादिकाळापासूनच
धगधगतेय
आमच्या सनातनी हृदयांत
तेजोमय विश्वनिर्मितीच्या प्रयत्नात
प्रचंड धूर ओकणारी
एक ज्योतिर्मय धिंडोळी !
देव्हाऱ्‍याकडे मात्र
लक्षच नाही आमचं . . . .. . . . .
वाहतेय आमच्या नसानसांमधून
त्यात साचलेली
हळव्या तंतुंची कर्मठ काजळी !
कपाळावर बुक्का लावून
बनवतोय आम्ही तिलाच पवित्र . . . . . ..
फुंकर घालून उडवण्याऐवजी
तेच काजळ घालतोय डोळ्यांत
आणि बनलोत आंधळं .. . . . . . . . . .
अंधारच बनलाय आमच्यासाठी खरा प्रकाश !
.
ईश्वरीय भाषा बोलणारे
भगवे दूभाषेच जर
असतील अंधकारमय आत्मे
आणि सत्य असेल
माणसाची कपड्यांतली नग्नता . . . . . . . . .
तर
शेंदूर फासल्या दगडालाही का म्हणावं देव . . . . . . . . ?
.
-राजीव मासरूळकर