एवढा माझ्यावरी उपकार कर
वेदने, घावात एका ठार कर
एक नाही, दोन नाही, चार कर
पण लपुन नव्हे, समोरुन वार कर
मी कुठे पाहू नये, जाऊ नये
तू सखे असला तुझा 'अवतार' कर
दूर नाही फार येथुन सुखझरा
फक्त पर्वत दु:खभरला पार कर
वेल मी नाजूक तुज स्वीकारते
खोड कडुनिंबा तुझे सुकुमार कर
जाळुनी तुज थाटली झगमग इथे
विझ... धरे, अन् पुर्णत: अंधार कर
निरस झाले फार जीवन हे सुखी
कर कधी कुरकुर, कधी तक्रार कर
जिंकणे नव्हे, लढा देणे खरे
चल, पुन्हा सुरुवात तू दमदार कर
~ राजीव मासरूळकर
No comments:
Post a Comment