सुस्वागतम्! आत्मगंध ब्लॉगला भेट देणा-या सर्व साहित्यिक मान्यवरांचे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक,वाचक रसिकांचे राजीव मासरूळकरतर्फे हार्दिक स्वागत!

Monday, 27 November 2017

घरचे, घराचे शेर


घरात सध्या काही चालू नाही
घरात सध्या टीव्ही चालू आहे

माणसे सर्रास खोटे बोलती सगळीकडे
फक्त मोबाईल विश्वसनीय येथे बोलतो

किती कंटाळला पंखा इथे लटकून उफराटे
छताला मोह वा-याचा परंतू सोडवत नाही

हासरा आहे किती फोटो घराचा
पण घराला हासताना पाहिले का

वरून फुलले आहे भारी फुलासारखे
कपाट आतुन कपड्यांनी गुदमरले आहे

प्रेम दाटले नाही ब-याच दिवसांपासुन
बेडरूमला किती प्रतिक्षा त्या जोडीची

किचन त्रासते शिंका मारुन
तरी तोच तो ठसका उठतो

आभाळाचा शावर पडला बंद तरी
बदाबदा नळ बाथरूमचा कोसळतो

कुणीतरी एखादे आणा ओडोनिल
टॉयलेटला पार्क व्हावयाचे आहे

घड्याळ नुसते पळते आहे
घर तर जिथल्या तेथे आहे

~ राजीव मासरूळकर
    दि.27/11/2017

Sunday, 5 November 2017

एकटा कोणीच मालामाल नाही

गझल

एकटा कोणीच मालामाल नाही
सुख तुझे टिकणार सालोसाल नाही

पांढ-या पेशींत मोठी वाढ झाली
रक्त आता राहिलेले लाल नाही

कान भिंतींचेच चुकचुकतात हल्ली
शुभअशुभ सांगत कुणाला पाल नाही

आसवे शोषून झाला शुष्क, काळा
हा कुण्या सुंदर प्रियेचा गाल नाही

लागते थंडी छळूू अन् वाटते की
देह आत्म्याची गरमशी शाल नाही

~ राजीव मासरूळकर

Sunday, 22 October 2017

गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

शह्यराच्या पलिकडं गेल्ही हाये धाव
गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

कुड कुठी दिसत नही
दिसत नही झोपडी
घरं झाले सिमीटचे
माणसं झाले खडी
माय झाली मम्मी
बाप झाला पप्पा
काळजामधी राह्यला नही
आपुलकीचा कप्पा
जिठीतिठी दिसत हाये भारी बडेजाव
गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

गावामधी ओपन झाली
येक इंग्लिस स्कुल
तव्हापसून मराठीची
बत्ती झाली गुल
पोरं लागले ईबीसीडी
म्हणायले ठेक्यात
घुसत कुठी काय व्हतं
गोंधळभरेल डोख्यात
पप्पाचा पन वाढत व्हता समाजात भाव
गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

गावामधलं बदलुन गेल्हं
सगळं वातावरन
किंमत गेल्ही शब्दाची
गढूळ राजकारन
खरी गोष्टं खोटी झाली
खोटी झाली खरी
शाह्यणे लोकंच चढू लाग्ले
कोर्टाची पाह्यरी
देवळामधल्या देवाचाबी घसरुन गेल्हा भाव
गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

जेच्यातेच्या हातामधी
आला मोबाईल
घरात बसल्या बसल्या नुस्तं
धडकू राह्यलं दिल
कोन्ही गेम खेळत बसतं
कोन्ही करतं व्हाट्सप
मनामधलं बोलणं झालं
लय लय सोपं
कोन खेळे कोन्ता तं कोन कोन्ता डाव
गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

घरोघरी गाड्या आल्ह्या
माणसं गेल्हे दूर
बरसातीले माणसासारकाच
कुठी येथो पूर?
मजुराह्यले गरज राह्यली
नही मजुरीची
शेतीवाल्या मानसायची
झाली मोठी गोची
आता कोन्त्या गावामधली गोष्ट सांगू राव?
गाव आता कुठी राह्यलं हाये गाव?

~ राजीव मासरूळकर
   दि.22/10/2017
   सायं.6:30 वाजता

Thursday, 19 October 2017

दिवाळी असावी

🎇💥🌠✨🎆💥🌅✨🎇
          शुभ दीपावली

_*गरीबाघरी गोड थाळी असावी*_
_*तिथेेही सुखाची दिवाळी असावी*_

_*पिकू शेत सोन्यापरी दे विठोबा*_
_*कृपा नेहमी पावसाळी असावी*_

_*सदा कष्ट इमानदारीत करतो*_
_*मुखावर तयाच्या झळाळी असावी*_

_*वठू लागला वृक्ष दारापुढे का*_
_*घराला नको ती डहाळी असावी*_

_*मिळो कामसू धन्यता सांजवेळी*_
_*नवी प्रेरणाही सकाळी असावी*_

~ *राजीव मासरूळकर*
🌅💥🎆✨🌠💥🎇✨🎆

शुभ दिवाळी

🎆🌹🌠🌷💥🌼🎇💐🎆

चला,
दिव्याच्या वातीसारखं जळून
जगाला उजेड देऊया
फटाक्यासारखं क्षणात उध्वस्त होऊन
संपायचं नाहीय आपल्याला...
मनं, घरं, देवळं, ज्ञानमंदीरं
उजळून टाकूया सगळं काही
आपल्यातल्या चांगुलपणानं,
माणूसपणानं...!

बालगोपालांच्या मनातला
आनंद होऊया,
लक्ष्मीपूजनासह
गृहलक्ष्मीचंही पूजन करूया,
आईबहिणींच्या डोळ्यांतली
ओवाळणी होऊया...

दिवाळी करूया,
दिवाळं नव्हे......

आणि राहावतंच नसेल
फटाके फोडल्यावाचून
तर
लावून टाका एखाददोन बॉम्ब
आपल्यातल्या जातीधर्मांच्या,
गरीबश्रीमंतीच्या
धोकादायक भिंतींखाली...
बिनधास्त....

बघा, हे सगळं जमलंच तर!

आपणास शांत, तेजोमय, दुषणमुक्त, प्रदुषणमुक्त दीपोत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा!

~*राजीव मासरूळकर*

🎆🌹🌠🌷🎇🌼🌠💐🎆

Sunday, 15 October 2017

नि:संग

आपण करू लागलो नियमित
आपलं काम
प्रामाणिकपणानं
कि काळ बिथरतो
आणि
घोंगावत येतं कामचुकार वर्तमानाचं विस्फोटक वादळ....!
उगारले जातात खोचक प्रश्न
आपल्या सचोटीवर
आणि सार्वजनिकरित्या केलं जातं
भावना बोथट करणारं
बिभत्स चारित्र्यहनन...
तेव्हा
कापून काढावेसे वाटतात
नभापलिकडे झेपावू बघणारे
मनाचे कल्पक पंख
नको तिथे डोकावणा-या,
हवे तिकडे कानाडोळा करणा-या
या डोळ्यांमध्ये घालावेसे वाटतात टोकदार खिळे
ऐकलेल्या अफवांची तात्विक चिरफाड करणा-या
आपल्याच कच्च्या कानांच्या भिंती
लिंपाव्याश्या वाटतात
उकळत्या लाेहरसाने
सोलून काढावीशी वाटते अंगावरची ही स्पर्शातूर
चित्ताकर्षक त्वचा
छाटून टाकावेसे वाटतात
हव्यासामुळे हपापलेले
स्वत:चेच हात.... पाय.... जीभ... लिंगही...
उतरवून टाकावासा वाटतो स्वत:तला सगळा माज
ज्ञानाचा... पैशाचा... यशाचा... पदाचा.... प्रतिष्ठेचा
तोडून टाकावीशी वाटतात
स्वार्थासाठी टिकलेली भंपक नातीगोती
उधळून द्यावेसे वाटते सगळे स्थावर जंगम
किड्यामुंग्यांवरती
आणि व्हावंसं वाटतं नि:संग....
ढगामधून कोसळणा-या
दगडामधूनही पाझरणा-या
नदीमधून खळाळणा-या
स्वच्छ स्वच्छंदी पाण्यासारखं.....

पण..........
आपल्या या शांत निर्मळ पाण्यात
माणसं
स्वत:ची पापं धुणारच नाहीत
याचा काय नेम?

~ राजीव मासरूळकर
    सावंगी, औरंगाबाद
    दि.12/10/17 09:45 pm

Wednesday, 4 October 2017

तरही गझल: कोरडी भाकरी मिळाल्यावर

ओळ सौजन्य:-  डॉ.कैलास सोमनाथ गायकवाड

ओल धावे जिभेकडे भर भर
(कोरडी भाकरी मिळाल्यावर)

एक विश्वास आसरा देतो
एक अफवा करू बघे बेघर

मीच आलो इथे न पहिल्यांदा
काटलेले कुणी किती चक्कर!

फक्त स्पर्धा इथे सुरू आहे
कोण दिसते कुणाहुनी सुंदर

आत फुलपाखरू कसे आले?
शिंपले अंतरी कुणी अत्तर?

~ राजीव मासरूळकर
   दि.30/09/2017
   विजयादशमी 1:00am

Sunday, 27 August 2017

दिखावा चालला आहे

सुखादु:खात आनंदी म्हणे जगणे कला आहे
किती जगतो खरे आपण? दिखावा चालला आहे

तुझ्यामाझ्यावरी आहे नजर बारीक सगळ्यांची
जणू त्यांना तुझामाझा सुगावा लागला आहे

उबळ वातावरण पाहून येते माणसाला का?
जुना छातीत दडलेला कितीसा खोकला आहे?

तमा आहे कुठे कोणास कोणाच्या मनाची, पण
तमा हातात कोणाच्या कुणाचा दाखला आहे...

बरा होतो दगड निश्चिंत रस्त्याच्या कडेला मी
कुणी देवा मला शेंदूर नाहक फासला आहे?

~ राजीव मासरूळकर

Saturday, 26 August 2017

काय असे घडते, बाप्पा?

बाप्पा....

केवळ दहा दिवस आल्याने काय असे घडते बाप्पा?
किती जनांची भक्ती माणुसकीवरती जडते बाप्पा?

तुझे भक्त बघ कसे नाचती डीजेवर ढोसुन दारू
दरवर्षी हे बघत राहणे तुज का आवडते बाप्पा?

तुझ्याच नावे जमा वर्गणी खिशात जाते कुण्या कुण्या
जुगार, भ्रष्टाचार, प्रदूषण तुझ्यामुळे नडते, बाप्पा!

तू असल्यावरसुद्धा येथे जातधर्म तरतात कसे?
बलात्कार, हिंसाचाराने काळिज फडफडते, बाप्पा !

येताना पाऊस आणता आला तर बघ दरवेळी
तुझे आगमन शेतक-याच्या पथ्यावर पडते, बाप्पा!

दहा दिवस तू रहा मजेने... शीला, मुन्नी, झिंगाट हो
तू गेल्यावर इथे कुणाचे काही का अडते, बाप्पा?

~राजीव मासरूळकर
   25/08/2017 10:00 pm
   सावंगी, औरंगाबाद

Sunday, 20 August 2017

आयुष्या...


कधी होतोस गहिरा गूढ तू आकाश आयुष्या...
कधी तू चालती फिरती निरर्थक लाश आयुष्या...

तुझी व्यसने, तुझी स्वप्ने, तुझे जगणे फकिरीचे...
जगासाठी किती आहेस तू अय्याश आयुष्या...!

चुकीने मी तुला अन् तू मला भेटायला आलो
तुला भेटायला होती हवी ती... काश ... आयुष्या...

भुकेचे राज्य मिटवाया जिवाची पेरणी करतो
कसा त्याच्या गळ्याला लावशी तू पाश आयुष्या...?

तुला चर्चेत वा वलयात कायम राहणे आहे
तुझ्या हट्टात आहे जाण सत्यानाश... आयुष्या!

तुला वगळून मी नाही, मला वगळून तू नाही
कसा तू लावला हा सापळा... शाबाश आयुष्या!

~ राजीव मासरूळकर
   दि.20/08/2017
   सावंगी, औरंगाबाद

Thursday, 17 August 2017

प्रत्येकाचे नाक शेंबडे

गझल

असो कितीही मोहक रुपडे
प्रत्येकाचे नाक शेंबडे

वस्त्र झाकते शरीर वर वर
मन फिरते आतून नागडे

ढग आहे की आहे गेंडा?
शिव्या घाल वा घाल साकडे...

कपाट भर कपडे शहराला
घरी मायचे विटले लुगडे

किती बांधल्या पक्क्या भिंती
का फुटले घर? कशाचे तडे?

सत्य जमावच रस्त्यावरचा
खोटी शाळा, विसंगत धडे!

~ राजीव मासरूळकर
   16/8/2017
   सोयगाव, औरंगाबाद

Saturday, 5 August 2017

काजळावर का जळावी काजळी?

होत आहे रोज चर्चा वादळी
कोण ही भरणार आता पोकळी

दूरदृष्टी लाभली आहे जरी
माणसाची भूक आहे आंधळी

जाहली रस्त्यावरी  गर्दी किती
चंद्र आला फुलवुनी गाली खळी

शस्त्र बाळगतात काट्यांचे जरी
हळदुल्या नाजूक असती बाभळी

धर्मजातींतील जाळा भांडणे
काजळावर का जळावी काजळी?

~ राजीव मासरूळकर

Monday, 17 July 2017

चुंबळ


पानमळ्यात माती टाकायला
घर मजूरीनं जायचं
पायात चप्पल वगैरे नसायची
डोक्यावर चुंबळ मात्र असायचीच असायची...

नदीकाठच्या खदानीतून
धावतपळत
डोक्यावरून माती वाहून नेताना
वारंवार निसटणारी चुंबळ
रागारागानं घट्ट करून
ठेवायचो डोक्यावर
टोपल्यातली माती दांडात टाकली
की मातीसह चुंबळ पडायची पुन्हापुन्हा दांडात...

मग माय करून द्यायची
जुन्या लुगड्याच्या पदराची
एक सैलसर चुंबळ प्रेमानं
ती दिवसभर
डोकं शांत ठेवायची

चुंबळ बनवणं
तशी एक
अनुभवसिद्ध कलाच...
जेवढी सैल बनवावी
तेवढी घट्ट बसते डोक्यावर
ओझं मग वाटंतच नाही ओझं...
घट्ट बनवली
तर निसटत राहते वारंवार
डोक्यावरून खाली
अन् ठरत राहते डोकेदुखी...

काटक्यांचा भारा असो वा असो बोजड मोळी
भाजीभाकरी अन् विळ्याखुरप्यांनी भरलेलं टोपलं असो
वा असोत पाण्यानं भरलेली हंड्यांची उतरंड...
चुंबळ उचलते ओझ्यातला खारीचा वाटा...
बाई संसाराचा भार उचलते तशीच अगदी...

मोठं झाल्यावर ऐकायला मिळालं
अमुक एक मोठा मुलगा म्हणे
एकांतात
चुंबळीसोबत करतो संभोग.......

बाई खरंच चुंबळ असते....?
जुन्यानव्या वस्त्रांत गुंडाळून
हवा तसा पीळ द्यायला......?

की
बाईचंच चुंबळीसोबत
जुळतं असं नातं
की
बाई जगत राहते आयुष्यभर
एक सैलसर चुंबळ होऊन.....?

~ राजीव मासरूळकर
   दि.17/07/2017
   09:15 AM

Sunday, 16 July 2017

चोळी

कित्येक दिवस झाले लिहिल्या न चार ओळी
भरली नसेल माझी अनुभवविहीन झोळी

येते सुजाण माझ्या स्वप्नात लोकशाही
नेता नसेल खोटा... जनता नसेल भोळी

शिकलो... पगार, पत्नी आहे मुले सुखी... पण
फसलो, जणू फसावा जाळ्यात आप्त कोळी

प्रल्हाद कोण आहे...? सारे हिरण्यकश्यप!
सांगा कुणाकुणाची करणार आज होळी?

शहरामधील सगळे रस्ते उदास दिसती
हसते किती निखळ ती गावामधील बोळी

राहू शकेल कोणी एकेकटा सुखाने
फिरवून चार माथे बनवा नवीन टोळी

कर्ता पुरूष येथे दारू पिऊन मरतो
कंबर कसून बाई जगते विकून मोळी

कसला विकास आहे? होतेय नग्न पृथ्वी...
झाकेल लाज ऐसी आणू कुठून चोळी?

~ राजीव मासरूळकर
   दि.15/07/2017
   09:30 pm

Tuesday, 27 June 2017

किशोर काळेंनी मातीत जिरवलेला घाम : बांडा हंगाम

बांडा हंगाम

अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेल्या किन्ही(फत्तेपूर) ता. जामनेर या जळगाव जिल्ह्यातील मराठवाडी दुष्काळी हवा लागलेल्या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, शेतक-यांचा संघर्ष बघत, अनुभवत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्ताने सध्या विदर्भात बुलडाणा येथे स्थायिक झालेल्या *कवी किशोर भगवान काळे* यांचा शेतक-यांची व्यथा मुखर करणारा 87 कविता असलेला पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे *बांडा हंगाम*!

अस्सल ग्रामीण विशेषत: शेतकी तावडी शब्दधन घेऊन आलेली ही समृद्ध ग्रामीण कविता आहे. कवितेतलंं मला फारसं कळत नाही असं मनोगतात कवी म्हणतो, पण ते खरं नाही. ती कवीची विनम्रता आहे फक्त.
शेतीमातीशी कवी इतका एकरूप झाला आहे, कि जणू तो आपली आत्मकथाच कवितांतून डोळ्यांसमोर उभी करतोय असं वाटत राहतं वाचताना.

तसं पाहिलं तर या काव्यसंग्रहाला *प्राचार्य डॉ. किसन पाटील, जळगाव* यांची सविस्तर 16 पानांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी कवीच्या ग्रामीण तावडी बोलीबाबत, शेतकी शब्दसंग्रहाबाबत, प्रत्येक कवितेवर सांगोपांग उहापोह आपल्या प्रस्तावनेत केला असल्यानं आपण वेगळं काय लिहिणार असा प्रश्न मनात होताच. परंतु कवी किशोर काळे यांनी जाणीवपूर्वक कवितासंग्रह पाठवून अभिप्राय कळविण्याचा आग्रह धरला होता. म्हणून आस्वाद घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

*बांडा हंगाम मधील बाप :*
'बांडा हंगाम'मध्ये अनेक कवितांतून कवी किशोर भगवान काळे यांनी गावागावात घरोघरी आढळणारा शेतकरी बाप आपल्या खास शैलीत उभा केला आहे. अनेक ग्रामीण उपमारूपकांतून हा बाप वाचकांना आपलासा करून जातो. बापाचं शेतीभोवती गुरफटलेलं व्यथाविश्व रेखाटताना
त्यात डोळे खोल गेलेला, वांझोट्या हंगामात शिवाराचा झालेला उन्हाळा किलवाण्या नजरेनं पाहत राहिलेला बाप येतो. पावसाळा तोंडावर आला तरी विरत नसलेल्या; वखराला, रोट्यालाही दाद न देणा-या इरेला पेटलेल्या ढेकळांना कुटण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून तो हातात 'मोगरी' घेतो.

हवामान खातं नेहमीप्रमाणंच चुकीचा अंदाज व्यक्त करत राहतं. हंगाम आणखीच बांडा होत जातो.
*प्रमुख पाहुणे वेळेवर न आल्यानं*
*उडावा बोजबारा*
*एखाद्या साहित्यसंमेलनाचा*
*तसंच होतं शेतक-याचं*
*पाऊस वेळेवर न आल्यानं*
दुबार पेरणीची वेळ येते. शेतकरी बाप कर्जाच्या ओझ्याखाली दबू लागतो. 'आयुष्य मिरचीच्या ठेच्यासारखं कोरडं खट्ट' होत जातं. जमवलेली पुंजी, बायकोच्या अंगावरचं किडूकमिडूक जमिनीत पेरून बटाईनं शेटजीची शेती कसताना हा बांडा हंगाम येतो तेंव्हा, हवालदिल होऊन
*हातात तांब्याभर पाणी घेऊन*
*तो चेकाटत असतो ढगांकडे पाहून*
*घ्या रे कोल्ड्या ढगाडाहो*
*घोटभर पाणी प्या*
*नल्डा सुकला अशिन तुमचा*
मग या बापाला दिलासा द्यायला मोफतच्या टोलेजंग व्यासपिठावरून समोर केवळ कापसाच्या गंज्याच दिसणारे, चहातून गायब झालेली साखर भाषण करताना तोंडातून ओघळणारे पुढारी येतात. हे माफ... ते माफ , मालाला गच्च भाव अशी 'गंदीबात' शिवी वाटणारी आश्वासनं तोंडावर मारून निघून जातात. 'देवाधर्माच्या नावांनं थोतांड'ही घडत राहतं ठिकठिकाणी. म्हाता-या बैलाशी 'सायड' करत नाही कुणी, तसं एकाकी होत जातं जगणं. पाऊसही त्याच्या पडलेल्या नशिबाशी युती करून घेतो. 'गणितात हुशार असलेला बाप टुघ्नी लागून' आयुष्याच्या गणिताला शरण जातो. 'स्वत:च्याच विषयात अभ्यासाच्या कैक आवृत्त्या करूनही नापास ठरतो.' शेतकरी होऊन जगणं हे औत ओढण्याइतकं सोपं नाही हे समजून घेऊन बैलही दानचा-याला जागू लागतात. पाऊसरूपी 'फॅमीली डॉक्टर' काही केल्या वेळेवर येत नाही. आलाच तर 'बैलाच्या थेंब थेंब मुतासारखा' येतो. मुलीची सोयरीक, मुलाची फी साठी कटकट, सावकाराचा तगादा सुरू होतो. समुद्र नाहीच मिळाला तरी चालेल, पण
*आपलेपणानं*
*दोन थेंब देऊन*
*आतून बाहेरून*
*चिंब करणा-या ढगांसाठी*
ईश्वराचा धावा सुरू होतो.

*माणसाने द्यावी माणसाला उभारी*
*पण माणूसच सावज इथे माणूसच शिकारी*

*ढोरा पोरांच्या चा-यासाठी*
*भुईदासाचे रोम जळे*
*थेंबासाठी हैराण तो...*
*बगळ्यांच्या ताब्यात तळे*
अशी अवस्था होऊन जाते. घोषणांची झुल अंगावर चढवून आश्वासनांच्या नाथा टोचून घेऊन आमिषाच्या चाबुकानं मुरलेल्या भाद्या बैलासारखं खाली मान घालून लोकशाहीचं गाडं हाकलं जातं.

 *"शेती ही पिकविण्यासाठी असते, विकण्यासाठी नाही"* , हे हृदयाच्या ठोक्याठोक्यात बिंबवलेलं असतं त्यांनी. पण
'सोईरपणातल्या सौद्यांचे सोहळे पार पाडून पोरीचे हात पिवळे करण्यासाठी विकावी लागते त्याला शेती.' कुणाला विकतो?
*ना गाळला घाम कधी*
*ना अंगाला माती आहे*
*काळ्याचं पांढरं करण्या*
*नावे त्यांच्या शेती आहे*
अशा काळा पैसा लपविण्याचा घाट घातलेल्या पांढरपेशा, भ्रष्ट धनदांडग्यांना शेती विकली जाते. खरा शेतकरी बाप भुमीहीन शेतकरी बनून त्याच मातीत राबत राहतो. हातात केवळ रूमण्याचे मुठ्ठे अन् त्यानं हातावर पडलेले घट्टेच राहून जातात.

*'बा'चं जीणं जीर्ण*
*धुडक्याचा बोळा*
*मनामधी तरी*
*मातीचा उमाळा* अशा प्रकारे कवी शेतकरी बापाचं हुबेहूब चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभं करतो.

तसाच बारवर 'दर्यादिली' दाखवत मित्रांसोबत चखण्यात घरदार चघळणारा अन् मद्यात सातबारा रिचवणारा बापही कवीने जोरकसपणे रेखाटलेला आढळतो.

*बांडा हंगाम मधील माय* :

या कवितासंग्रहात माय फारशी आढळत नसली तरी ती संघर्षरत बापासोबत परिस्थितीशी लढा देताना सतत जाणवत राहते. हताश बाप वाळलेल्या पिकाकडे किलवाण्या डोळ्यांनी पाहत बसल्यावर लेकराच्या रूपात भविष्यातले कैक हंगाम दाखवणारी खंबीर माय इथं बघायला मिळते. चूल फुंकत डोळ्यांतून ओघळणा-या आसवांवर भाकरी थापणारी, लाज झाकण्यासाठी चिंध्या चिंध्या जोडून लुगडं नेसणारी, अडाणी असूनही बापाच्या चेह-यावरचे भाव वाचणारी, पेरणीसाठी अंगावरचं किडूकमिडूक देणारी , दम्यासाठी दवाखान्याची आस धरून बसलेली मायही कवी मांडून जातो. जमीन नावाची माय तर आहेच आहे.

*आजोबा*

बांडा हंगाममध्ये गावात हमखास आढळणारा *आजा*ही एकदोन कवितांतून लक्ष वेधून घेतो. ताटात पडलेलं उष्ट किंवा उकिरड्यावर गेलेले चा-यातील धांड्यातील सग पाहून आज्याच्या आवाजाला धार येते. मग तो त्यानं पचवलेले बरसादीतले उन्हाळे पोटतिडकीनं सांगत सुटतो. काटकसरतीत जगण्याचं तत्वज्ञान मांडत बसतो. मोटारीपेक्षा मोटंच बरी म्हणणारा आजा पीटरकडे पाहून म्हणतो, "जाळा तेल, करा भाकरीला भोकरं महाग."

*मुलगा*
बांडा हंगाममधील बहुतांश कवितांचा निवेदक म्हणून शेतक-याचा मुलगा बनून कवी आपल्यासमोर येतो. तो बापासोबत, आईसोबत, आज्यासोबत घडणा-या घटनांचा जणू साक्षीदारच आहे. तो संवेदनशील आहे. तो शेतकरी बापाच्या आयुष्याची तुलना कवीसंमेलनातून हताशपणे परतणा-या कवीशी करतो. आज्याच्या काटकसरीची कथा समंजसपणे सांगतो. ढुंगणावर ठिगळं असलेली चड्डी घालणारा, पेरणीआधी बापासोबत पैशांसोबत दम देणा-या सावकाराकडे जाणारा, बाजारात डोळे खोल गेलेला बाप तब्बेतीनं गोल असलेल्या लोकांना भेटल्याचं निरीक्षण नोंदवणारा मुलगा येथे आढळतो. मायबाप नशिबाचं गा-हाणं सांगत असताना
*"बाबा, मले नही शिवता येणार*
*आपलं फाटकं आभाय..*
*पण मी लावून घीन माह्या*
*फाटक्या चड्डीले थिगाय*
*मक्याच्या थैलीचं मी*
*बनवून घीन दप्तर*
*रद्दीतल्या वहीत*
*लिहिन प्रश्न उत्तर*
*बाबा, सांग ना कधी जागीन*
*भजनामधला विठू?*
*बंद होतीन पेपरात येणारे*
*लटकलेल्या माणसांचे फोटू?*
असा आत्मविश्वासाची भाषा बोलत व्यवस्थेला प्रश्न विचारणारा मुलगाही कवी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत रेखाटून जातो. त्याचबरोबर बापाला बाप झाल्याचं पाप वाटावं असं मोठं झाल्यावर वागणारा, नोकरी लागल्यावर भाऊ, मायबापांना टाळणारा, विभक्त कुटुंबपद्धतीला शरण गेलेला मुलगाही कवी ताकदीने शब्दांत उतरवतो.

यासोबतच अनेक कवितांतून कवीने बैलांबाबत कृतज्ञता व बैलांची शेतक-याबाबतची कृतज्ञता शेतीशी संबंधीत विस्मृतीत गेलेल्या अनेक वस्तूंच्या उल्लेखांसह अभिव्यक्त केली आहे. अस्सल ग्रामीण शब्दांतून ग्रामीण व भौगोलिक वातावरणनिर्मिती साधली आहे. एक संपूर्ण गावगाडाच काव्यसंग्रहातून उभा केला आहे. सावकार, राजकारणी व्यक्ती, शिवराय आदिंना पाचारण केले आहे. शेतक-याचं शेतीमातीशी व भवतालाशी जोडलं गेलेलं अवघं आयुष्य चितारण्याचा यशस्वी प्रयत्न कवीने केला आहे. बहुतांश कविता ही छंदमुक्त स्वरूपात असून एक गीतरूपात तर तीन अभंगरचनेच्या स्वरूपात प्रकटलेल्या आहेत. बांडा हंगाममध्ये शेतक-यांच्या आयुष्याची नकारात्मक बाजू मांडत असताना काही प्रेरणादायी कविताही कवी रचून जातो. शेतक-यांच्या उत्थानासाठी शिवरायांना पुन्हा जन्मण्याचे साकडेही घालतो. एकदोन कवितांतून शृंगाररसालाही हात घालतो.

एकूण शेतक-याचं भलं व्हावं या उदात्त हेतूनं शेतक-यांची होणारी अस्मानीसुलतानी होरपळ रेखाटण्याचा कवीचा प्रयत्न अत्यंत यशस्वी झाला आहे असंच म्हणावंसं वाटतं. किशोर भगवान काळे हा नवा ग्रामीण कवी मराठीला मिळाला हे अभिमानानं सांगावसं वाटतं.

आकर्षक सुसंगत मुखपृष्ठ व मलपृष्ठ, कागदाचा उत्तम दर्जा, अचूक अक्षरजुळवणी, उत्कृष्ठ बांधणी व डॉ.किसन पाटील यांची पाठराखण यांमुळे या कवितासंग्रहाचे संग्राह्यमुल्य निश्चितच वाढले आहे यात शंका नाही.

बांडा हंगाम हे शिर्षक जरी नकारात्मक असलं तरी कवी पावसाबाबत, हंगामाबाबत सकारात्मक आहे. याच भावनेतून तो आवाहन करतोय,

*तुझ्यावर सा-या*
*कुणब्याची धौस*
*पूरव ना हौस*
*पेरणीची*||

~ राजीव मासरूळकर
   गटशिक्षणाधिकारी
   पं.स.सोयगाव जि.औरंगाबाद

बांडा हंगाम (कवितासंग्रह)
कवी- किशोर भगवान काळे Kishor Kale
अथर्व प्रकाशन,धुळे
एकूण पृष्ठसंख्या - 112
किंमत - रू.150/-

Thursday, 15 June 2017

पश्चाताप


हे पृथ्वीमाये,
तुला कधी प्रश्नच पडला नाही -
"मी माणूस जन्मालाच घातला नसता तर ?"

या पांढऱ्‍या पायांनी
का तुडवून घेते आहेस तू
स्वतःचं स्वयंभू, सोनेरी कपाळ ?

तू याला पंचतत्वांतून जन्मी घातलंस,
रानावनांतून वाढवलंस,
उधळून दिलास तुझा
प्रचंड वेदना सहन करून साठवलेला
स्वयंनिर्मित
पोटभर खजिना याच्यावर . . . . ,
रक्ताचं लेकरू म्हणून सांभाळंस याला तू,
सृष्टीची शोभा दाखवलीस,
निर्झराचं गीत ऐकवलंस,
भरभरून मेंदू दिलास याच्या डोक्यात . . . . . .

आणि आज . . . .
तुझा सर्वात मोठा शत्रू कोण
म्हणून विचारलं
तर काय उत्तर देशील . . . . . ?
'माणूस'च ना . . . . . ?

तू रागावतच नाहीस याच्यावर
असंही नाही म्हणत मी
क्रोधानं तुझं थरथरणंही अनुभवलंय !
पण
पुन्हा तू शांत झालीस की
हे पृथ्वीमाये,
वाटतं -
तू
माणसाला जन्म दिल्याचा पश्चाताप करीत
अश्रू ढाळीत बसली आहेस . . . . . !

- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो"
२००६ मध्ये प्रकाशित

Friday, 2 June 2017

यावे सूर्यदेवा


या हो सूर्यदेवा, या हो सूर्यदेवा ।
सोनसळी किरणांचा वाजवित पावा ।।

उंच बंगल्यांआधी झोपडीत माझ्या या ।
समतेचा ममतेचा गंध ऊधळीत या ।
या, तुम्हीच धरतीवर शांतीरोप लावा ।।

जळजळत तुम्ही या जातीपाती जाळा ।
खळाळत वाहूनि न्या मनातल्या मळा ।
प्रकाशातल्यांचा तव धर्म एक व्हावा ।।

अनंत उर्जाव्रत ल्यालेले महर्षि तुम्ही ।
अनंत अक्ष दक्ष यक्ष ज्ञानयोगी तुम्ही ।
चराचरात स्पंदनात तुमचाच धावा ।।

या हो सूर्यदेवा, या हो सूर्यदेवा ।।

 - राजीव मासरूळकर

सोहळा :- एक निसर्गकविता


दूर पसरल्या आडव्यातिडव्या धुसरधुसर डोंगररेषा
पक्ष्यांच्या पंखांत मिसळल्या सैरावैरा दाही दिशा
घुंगूर बांधून झाडीमधुनि खट्याळ वारा नाचतसे
उदासीन मम मनास अलगद स्पर्शून जाती मोरपिसे
.
नव्या वधुची हळदी साडी उन तसे हे अल्लड नवखे
नदीत देई स्वतःस झोकून चांदी होऊन पुन्हा लकाके
उंचावरूनि उडी घेऊनि दुधात मिसळे इंद्रधनु
कातळ काळा खोदीत बसला कुणी तपस्वी ऋषी जणु
.
अशात दुरवर मृग्जळी खडीचा तुझ्या साडीचा पदर उडे
धावून थांबे सूर्य क्षितिजी जणु तव अधरि मम अधर गडे
संध्याराणी बाहुपाशि दे ज्वलंत आलिंंगण सूर्यास
हिरवी झाडी भरात निर्मी कातर काळा कुंतलभास
.
असा सोहळा शितलतेच्या शांतिदुताच्या आगमनी
महात्म्यासही वाटे सार्थक जीवन धन्य महा गमनी !
.
-राजीव मासरूळकर

कविता असते एक रसायन


कविता आहे एक रसायन !
सुखदुःखाचे आवेशाचे
मानवतेचे करी नित पुजन
कविता आहे एक रसायन !

जीवन जेव्हा पडते झडते
रडते अन् एकाकी पडते
तेव्हा हो कवितेचे सृजन
कविता असले एक रसायन !

कळितून जेव्हा फूल उमलते
भ्रमर तयाभोती भिरभिरते
कविता येते मरंद होऊन
कविता बनते एक रसायन !

मेघ बावरे मनास व्यापून
आभाळाला आणते दाटून
कविता छेडे मल्हारी धून
कविता असले अजब रसायन !

रूग्णाला ये वैद्याचा गुण
कुणी न फेडे आईचे ऋण
अशी कविता अशीच झिरपण
कविता स्त्रवते तेच रसायन !

स्वातंत्र्याची हो गळचेपी
अधिकारी गोचीड रक्तपी
कविता करते रणआक्रंदण
कविता असली एक रसायन !

मानवतेने करी प्रशासन
प्रेमाचे तिज पुरे प्रलोभन
कविता ऑक्सिजन हायड्रोजन
कविता आहे एक रसायन !

- राजीव मासरूळकर

पाऊस शोषणाचा...



पाऊस शोषणाचा पाऊस घोषणांचा
रक्ताळल्या मनाचा पाऊस भक्ताळल्या गणांचा
पाऊस वासनांचा पाऊस दूषणांचा
लाटल्या धनाचा पाऊस फाटल्या क्षणांचा . . . . . . .

आतड्यांना पिळणाऱ्‍या यातनांचा पाऊस
कातळाला चिरणारा आक्रोशांचा पाऊस
पाऊस माझ्या नितळ निर्मळ आसवांचा भुकेला
पाऊस माझ्या गोरगरीब कासवांचा भुकेला . . . .

भाषणांचा पाऊस शासनांचा पाऊस
रिक्त बंदुकी फैरींंसारखा आश्वासनांचा पाऊस
धर्मआंधळ्या, जातआंधळ्या अमानुषांचा पाऊस
माणसातल्या पिसाटलेल्या जनावरांचा पाऊस
पिसाळलेला पाऊस बोकाळलेला पाऊस
सोकावलेला पाऊस हपापलेला पाऊस . . . .

मधाळ रसाळ ओठांमधून
झुळझुळणारा पाऊस
श्वासांमधला घासांमधला प्रेमाचा पाऊस
दैवतांचा पाऊस दानवांचा पाऊस
रौरवात सडणाऱ्‍या मानवांचा पाऊस
पाऊस माझा अधूनमधून भूरभूरणारा
पाऊस माझा अधूनमधून हुरहुरणारा . . . . .

पाऊस माझ्या
खेड्यामधल्या माऊलीच्या
डोळ्यांमधून झिरपणारा
पाऊस माझ्या शेतामध्ये राबणाऱ्‍या
उघड्याबंब देहामधून
रक्तासारखा निथळणारा
कळ्या असून मळ्यावर
राबणारा पाऊस
हात पाय डोके असून
रस्त्यावरती स्वार होऊन
अनंग भनंग हात
पसरवणारा पाऊस . . . . . .. . . . !

पाऊस सतत वाढतोच आहे
पाऊस सतत चढतोच आहे
लक्षावधी हातांनी
पाऊस सतत लढतोच आहे !

एक दिवस पाऊस सगळा
असा तसा जाईल थांबून
कारण तेव्हा माझी तुमची
पृथ्वी गेली
असेल भंगून . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर

दिनचर्या


नद्या वाहती गळ्यात लेवून मंजुळ घुंगूरमाळा
नव्या डहाळ्यांवरती भरती नव्याच पाखरशाळा
लक्ष पित अश्वांवर आरुढ पूर्वराज मग येई
कळ्यांस चुंबून कोमल अधरे हसू तयांचे पाही
पहाटवारा वेडा सुटतो स्पर्शत चराचराला
अन् सर्वत्र चलाचलांच्या धावपळीचा पोळा

कलकल वळवळ शिव्याशाप अन् चळवळ मारामारी
काळही बघतो भांबावून ते थांबवून एकतारी
दुपार होता स्वेदसिंंधुला उधान भरती येते
त्यात अधांतरी अर्धी पृथ्वी गटांगळ्या खाते
संध्यासमयी सुटतो ताजा गृहआकर्षक वारा
चिमण्यांसाठी घेऊन चारा येती वत्सलधारा
काळोखाची जाड घोंगडी घेऊन अंगावरती
काळ, कळा अन् स्वप्ने लेवुन भविष्यचक्रे फिरती !

- राजीव मासरूळकर

सायंकाळ


थकलेल्या धावुन धावुन
छायांना येते ग्लानी
उरलेले चारच क्षण हे
उन्हाच्या येते ध्यानी

कळसावर फडकत झेंडा
मरगळून होतो शांत
हसणारी द्वाड फुलेही
कोमेजुन बसती सडत

त्यागून भूजंगी लाटा
सागरही होतो सुस्त
अन् पाऊलवाटा होती
अर्धांंगवायूने ग्रस्त

देहावर भक्कम होतो
मग सांधेवातही स्वार
दिक्काला भेदणारी
दृष्टीही खाते मार

तरि अंधाराशी घेती
सारेच जोडुनि नाळ
जन्मण्या नव्याने बसती
कवटाळून सायंकाळ !

-  राजीव मासरूळकर

अविवेकाची नागीण


पृथ्वीखालून सळसळून
नाग
झाला अदृश्य
तेव्हा झाला
सर्वांगाचा थरकाप
आणि
मेंदूच्या ठिकऱ्‍याठिकऱ्‍या . . . !

पण नाग नव्हताच तो . . . . . . . .
ती होती
विषारी वेटाळ्यांची
पृथ्वीव्यापी
अविवेकी नागीण . . .  !
कारण . . . . . .
नागीण जेव्हा सळसळते
तेव्हा तिला नसतो चेहरा
असतं फक्त कमनीय शरीर
मणक्यामणक्यात डुख धरून बसलेलं . . . . .
अंधारासाठी आसुसलेलं  . . . . . . . . !

पृथ्वीखालून सळसळून
नागीण झाली अदृश्य
आणि
अवतरली भूवर
पसरली सैरभैर . . . .
बसली
कणामनांना विळखा घालून . . . .
पर्वताएवढा फणा काढून
असंख्य अस्वस्थ फुत्कार टाकत . . . . .  !

ती संपेल
तेव्हाच संपू शकेल
उजेडाचा ध्यास असलेल्या
पृथ्वीची अंधारकथा....!

-राजीव मासरूळकर

पीळ


मेघांना फुटता पंख
मारिती डंख
पोपटी पक्षी
ढग् छेडी संथ सतार
क्षितिजापार
धरेच्या वक्षी !

क्षितिजावर उडते धुळ
नभीचे फूल
लाल लखलखते
जिव्हास्रा सुटते लाळ
आतड्यां पीळ
विश्व वखवखते !

लेवून सावळे कोट
तमाचे लोट
मार्ग आक्रमती
सृष्टीचे मनहर घाट
विखारी घोट
प्राशूनि शमती !

- राजीव मासरूळकर

बलात्कार


नग्न नदीस मागती भोग
काळेगोरे मेघ
मारती डोळे
रानाला पडते भूल
नदी त्रिशूल
साहते चाळे

नाकारती पाहून धाव
दाविती भेव
कडाडून वीजा
नदीही नाही भीत
दाखवी दात
वाकडे कि "जा"

मेघांचे फिरते डोके
वाढती ठोके
साहे ना अंगार
कोसळती होऊन थेंब
ओतूनि दंभ
करती बलात्कार

ओढुनि सर्व मेघांना
मोडुनि माना
नदी सळसळते
मेघांना अंश नि अंश
करूनि दंश
सागरा मिळते !

- राजीव मासरूळकर

तृप्ती


पावसात थेंब थेंब
झाड झाले चिंब चिंब
गगनाचे प्रेम् अगाध
झाड लुब्ध स्तब्ध मुग्ध

थेंब चुंबी पान पान
झाडाला नाही भान
खोडावर फिरवतात
अनुरागी थेंब हात

झाड साहे मुकपणे
वर्षावेग आलिंंगणे
चित्ती पूर्ण मधुर मोद
गात्र गात्र तृप्त धुंद

प्रेम सारे रितवून
मेघ गेले हरवून
टपटपे लक्ष लक्ष
झाडाचे विरही अक्ष !

- राजीव मासरूळकर

सांगावा


सांगावा गोठून गेला
का मोरपिसांच्या ओठी?
वाळूतून उसळे पाणी
त्या डोह आटल्या राती!

कोसळली अंधारावर
वाऱ्‍याची अजस्र लाट
बेभानल्या दिशाही अन्
थरथरली राकट वाट

क्रोधाचे उठले मेघ
म्यानीतून काढीत वीज
अवसानघातकी वेडे
टरटरून उठले बीज

सरसरून आले काटे
अंधारमाखल्या देही
भेसूर भुंकती भूते
बेभान दिशांनी दाही

तरी रसरसलेल्या तुझिया
ओठांतून फुटले मंत्र
दवबिंदूंनी थरथरले
गवताचे गात्र न गात्र

सांगावा परतून आला
त्या मोरपिसांच्या ओठी
वाऱ्‍याला सुटला गंध
हळूवार पेटल्या वाती !

- राजीव मासरूळकर

पावसा रे.... जमिनीचे आवाहन


जमीन :
पावसा रे थांब ना रे
येऊ दे मज तुज सवे रे
मज लागली तुझी रे तृषा
मनोभावे पुजीले तुज ईशा
किती वाट पाहिली तुझी मी रे
तू आलासी किती उशीरा रे
मन व्याकूळ व्याकूळ झाले रे SहोS
पावसा रे SS

थांब ना रे प्रियकरा रे
शेतकरीही टाळती रे
मज नापीक म्हणती सारे
नांगरणी न करती कुणी रे
तू खूप खूप इथे बरसून जा
अथवा मज सोबत घेउन जा
मग मी राणी नि तू राजा SहोSS
साजना रेSS

पावसा रे आणखी रे
मजवरी तू बरस ना रे
निर्वस्त्र रे किती मी चालू
मज नेसू दे हिरवा शालू
फुलतील कळ्या डुलतील फुले
येतील मुले झुलतील झुले
कुणी पेरील तर पिकतील मळे SहोS
ओ सजना रेSS

या जना तू सांग ना रे
चांदण्या वा पेर ना रे
नाही येत मुले म्हातारे
चरण्याही न गुरे वासरे
मी पिकवीन सोने मोती रे
फुलपाखरे येतील त्यावर रे
कोकीळही गाईल मधुर स्वरे SहोS
पावसा रे SS

पाऊस :
ओ धरे गं धीर धर गं
झेल मजला हस जरा गं
मी ऐकली तुझी गं व्यथा
जाहलो मी तुझा सर्वथा
तू बोलव येईल वेगाने
पिकवीन तुजवरती मी सोने
सोडून रडणे तू गा गाणे SहोS
गं सजनी गं SS
ओ हो ओ हो हो हो

- राजीव मासरूळकर
  ऑगस्ट 2002

पडझड


आभाळमोठी श्वासांमधली
विचारवेडी धडपड
व्यथाव्यथांतील मनोकथांतील
भूकंपव्याली पडझड

पण परंतु गटारजंतू
रटरटणारी रडपड
झिणझिणणारी थरथरणारी
निरर्थप्याली चरफड

वांझविषैली झांज सुरैली
श्याममनोहर गडगड
दुभंगलेल्या पंखांमधली
पहाडफोडी फडफड

आस्तित्वातील नास्तित्वातील
वळवळणारी धुळवड
अबोलतेतील अलिप्ततेतील
कळवळणारी परवड !

- राजीव मासरूळकर

सुखात रूजते नाशाचे बीज


गड्या उद्याची करशील तजवीज ?
सुखात रूजते नाशाचे बीज !

भुक्या न देता धन साठवले
सुखादुःखातही ते न आठवले
येई वारसां खाता माज
सुखात रूजते नाशाचे बीज !

विद्वानाने उचलून वीडा
सुरवंटाची शमविली पीडा
हीच धरायुची खरी झीज
सुखात रूजते नाशाचे बीज !

गतिमांद्य दे गणक संगणक
यंत्र तंत्र शैथिल्य शारीरिक
समजून घे तू घामाचे चीज
सुखात रूजते नाशाचे बीज !

दुःख जन्म दे सत्कार्याला
दुःखच नेते समानुभूला
सुखलोलूप दे सोडून लाज
सुखात रूजते नाशाचे बीज !

सदा होतसे शक्तीचा जय
कष्टातून हो शक्तीचा उदय
सुखास जाळो दुःखाची वीज
सुखात रूजते नाशाचे बीज !

- राजीव मासरूळकर

प्रश्नोत्तरं


प्रश्नाला नसते डोके
आणि उत्तराला स्वतःचे पाय !
तरीही उद्दाम प्रश्न
मुद्दाम काढतात डोके वर. . . . .
हजारो हस्तिपदी प्रकांड प्रश्न
उत्तरांच्या डोक्यावर
करतात तांडवनृत्य
विनयी उत्तरांना आणतात जेरीस . . . . .
तुफान गारपिटीत
निष्पर्ण व्हावेत वृक्ष
तशीच निरूत्तर होतात
उत्तरं. . . . . . .
पण
जखमा कुरवाळत बसायला
उत्तरं माणसं असतात थोडेच . . . . . . . . . . ?
उन्हात रापलेलं बीज
अंकुरतंच पावसाळ्यात
काळ्याकुट्ट कातळाच्या फटीतूनही . . . . . . . . . . . . . !
अपरिहार्य उत्तरांनाही फुटतात
तेजस्वी शब्दांकुर . . . .
मग गळून पडते
प्रलयंकारी प्रश्नाचे
प्रमादी डोके
शाश्वत उत्तरांच्या
निर्मळ निराकार पायांशी . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर

काय करावे?

काय करावे . . . . . . ?

दिशाच येता अंगावरती धावून
कुठार होऊन
मी कुठे पळावे ? काय करावे . . . . . . . . . ?
कि व्हावे मांजर . . . . . . . . . ?
खूप साहिले म्हणून सत्वर
दिशादिशांच्या सैल गळ्यांचे
घोटच घ्यावे . . . . . ?
काय करावे . . . . . ?

घराघरांना फुटता तोंडे
फुटू लागता काची भांडे
दिसू लागता नाच नागडे
मी कुठे पळावे ? काय करावे. . . . . ?
कि व्हावे धरणी . . . . ?
झणी उठावे कंप पावुनी
पुन्हा एकदा पूर्ण जगाला
हडप्पापरी गडप करावे . . . . . . . . . ?
काय करावे . . . . ?

मी थेंंब होऊनि ढगातुनि बरसावे
मी व्हावे धरणी हिरवळीतुनि गावे
मी मुक्या कापल्या फांदीतुनि रडावे
मी ओठी दीनांच्या हसू पेरूनि जावे !

- राजीव मासरूळकर

काजळी


अनादिकाळापासूनच
धगधगतेय
आमच्या सनातनी हृदयांत
तेजोमय विश्वनिर्मितीच्या प्रयत्नात
प्रचंड धूर ओकणारी
एक ज्योतिर्मय धिंडोळी !
देव्हाऱ्‍याकडे मात्र
लक्षच नाही आमचं . . . .. . . . .
वाहतेय आमच्या नसानसांमधून
त्यात साचलेली
हळव्या तंतुंची कर्मठ काजळी !
कपाळावर बुक्का लावून
बनवतोय आम्ही तिलाच पवित्र . . . . . ..
फुंकर घालून उडवण्याऐवजी
तेच काजळ घालतोय डोळ्यांत
आणि बनलोत आंधळं .. . . . . . . . . .
अंधारच बनलाय आमच्यासाठी खरा प्रकाश !
.
ईश्वरीय भाषा बोलणारे
भगवे दूभाषेच जर
असतील अंधकारमय आत्मे
आणि सत्य असेल
माणसाची कपड्यांतली नग्नता . . . . . . . . .
तर
शेंदूर फासल्या दगडालाही का म्हणावं देव . . . . . . . . ?
.
-राजीव मासरूळकर

Monday, 29 May 2017

तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले


तळ्याकाठी किती पाणी , तरी झडले...
जसे हे झाड, माझेही तसे घडले !

मनाचा पोहरा विहिरीतटी ठेवुन
सभोती रान हिरवे हंबरुन रडले !

तुझ्या हातून माझा हात सुटला अन्
तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले !

परीक्षा पास झाले खूप शाळेच्या
खऱ्‍या प्रश्नांस उत्तर द्यावया अडले !

मनूजा, गर्भ अंधारी सदा वाढे
प्रकाशा काय दुःखाचे तुझ्या पडले ...?

- राजीव मासरूळकर
दि १९.०२.२०१३
दुपारी १.१५ वाजता

साले

2012 मध्ये गांधी घराण्याच्या (सरकारी) जावयाच्या भ्रष्टाचार प्रकरणानंतर सुचलेली ही कविता शेतक-यांना 'साले' म्हणणा-या दानवेंनाही तितकीच लागू पडते.......


करी राजकारण , मनी मोह ल्याले
लकी ड्रॉ , लिलावावरी देश चाले !

लवे , हात जोडे , बसे वाकळीवर
बघा ते खजीना लुटायास आले !

मते मोजुनी जे खिसा ओतताती
कळो ते जगाला विकाया निघाले !

समाजाप्रती ना कुणा काज चिंंता
खरे कार्यकर्ते तळाशी बुडाले !

खिळे नोकरांना विळे पामरांना
सग्यासोयऱ्‍यांना मिळे लांब भाले !

नको खंत राजीव मांडू विरोधी
तुला देशद्रोही ठरवतील साले !

- राजीव मासरूळकर
7.10.2012, 9.55PM
rajivmasrulkar@gmail.com

प्रार्थना


गुणगुणावे गीत आणिक
खळखळावे हास्यही
थंड व्हावा क्रोध माझा
अन् जळावे दास्यही !

चूल माझी चूक माझी,
दुःख माझे भूक माझी
काम, मत्सर, द्वेष जावा
अन् गळो आलस्यही !

तृप्ततेची हाव, स्वार्थ,
लोभही सारा जळो
प्रौढपण यौवन ठरावे,
सळसळावे बाल्यही !

भय नको मज कोणतेही
ना हो सीमा उंबरा
कर्म आधी मी करावे
मग करावे भाष्यही !

चाचरावी जीभ माझी
मागण्या कोणास काही
हात मागे ना सरावा
कुणि मागता सर्वस्वही !

- राजीव मासरूळकर
rajivmasrulkar@gmail.com

बाप्पास

बाप्पा ,
यंदा मान्सून आला
तसाच गेला आणि तूसुद्धा तसाच चाललास .
पिकांकडे पाहून शेतकऱ्‍यांचा उरात जाळ भडकतोय . कर्जाचे डोंगर हाडं पोखरताहेत त्यांचे .
जनावरांच्या चाऱ्‍याचा प्रश्न मिटला तरी पिण्याचं पाणी हातपाय खोरायला लावणार असं दिसतं .
तू जातोय बाबा मोठ्या जल्लोषात , पण
बघ जाता जाता एवढं विघ्न टाळता आलं तर .
आता तरी पाऊस पाड !

तू बुद्धीचा देव ! जगभरातल्या अव्वल ४०० विद्यापिठांच्या यादीत भारताचं एकही विद्यापीठ नाही हे निश्चितच सुखकारक नाही ना ?
जाता जाता आम्हाला थोडीतरी बुद्धी दे !

दररोज लाखो कोटींचे घोटाळे होताहेत , काही उघडही होताहेत ! देशाचा एकंदरीत कारभारच लिलाव आणि लकी ड्रॉ पद्धतीनं चालला आहे .
तुझ्या विचारांकडे दुर्लक्ष करून केवळ तू नवसाला पावतोस या एकाच लालसेपायी तुझ्यासमोर रांग लागते , हे तुला पहावतं तरी कसं ? भारतीय भ्रष्टाचाराचं मूळ असलेली नवसपद्धती तूच पुढे नेत राहशील तर हर्षद मेहतांपासून कलमाडी किँवा कालपर्यंत उघड झालेल्या नावकऱ्‍यांना दोष तरी कसा द्यावा आम्ही ?
जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ देश चालवत असूनही आमचा रूपया गडगडला आहे . आर्थिक विकास थांबला आहे . FDI चं गाजर चघळूनही गोड लागेलंसं वाटत नाहीय . सत्तेचा डोलारा कधी कोसळेल याचा काही नेम नाही . येणाऱ्‍या काळात आम्ही राजकीय स्थैर्य गमावून बसणार अशी शंका घेण्यासारखं वातावरण आहे .

आमच्या पुण्यनगरीतली चिल्लर पार्टी आधुनिक भारतीय समाजाचं नवं थिल्लर रूप समोर उभं करीत आहे .
मोबाईल , कंप्युटर , इंटरनेटचा वापर भलत्याच भानगडींसाठी करून आमची नवी पिढी स्वातंत्र्याचे ढेकर देत आहे .

ऑलंपिक स्पर्धांत १२१ कोटींमधून ६ माणसं पदक मिळवतात हे मागील इतिहास पाहता अभिमानास्पद वाटत असलं तरी खंडप्राय देशातील खरब खंडीभर जनता बघता लज्जास्पदच नाही काय ?
कालच आमचा क्रिकेट संघ तुझ्या कृपाछत्राखाली खेळूनही चारी मुंड्या चित झाला हे त्यातल्या त्यात ताजं उदाहरण !

बाप्पा ,
कृषी क्षेत्रात , सामाजिक , आर्थिक , राजकीय , क्रीडा , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात भारत केवळ लोटांगण घेत आहे . जनता तर केव्हाच आडवी झाल्यासारखी वाटतेय .

जाता जाता याकडेही थोडी नजर फिरवून जा रे बाबा  ! ! ! !

तुझाच आंधळा भक्त ,
राजीव .
दि.29/09/2012
मनमोहन सिंग सरकारचा पडतीचा काळ

गाव


कुठे कुडाच्या पोकळ भिंती
कुठे विटांवर ढवळी माती
कुठे छतांवर करडे पाचट
कुठे बडे घर वासे पोचट !

उंबरठ्यावर उभा कुणाच्या
गळफासाचा जुनाच दोर
तरी पंगाड्या शौकीनांच्या
व्याख्यानांना चढतो जोर !

रणरणत्या उन्हात, धसांच्या -
शेती कुणाची पदरं भिजती
पिंपळपारांवरी विड्यांचा
गर्द धूर घेतो विश्रांती !

वक्तृत्वाच्या दाढीवाले
बोकडबुवा यांचे नेते
मेंढरमानी चालत जाती
"नियती", म्हणती, "तिकडे नेते."

साधुत्वाच्या राखेखाली
कुठे धगधगे तृष्ण निखारा
कित्येकांचे पोट रिकामे
मंदीरांचा भरे गाभारा !

कुठे असे अन् कुठे तसे पण
दिसे जरासे जे आपलेपण
दगडालाही घाम फोडते
असले माझ्या गावचे जीवन !

- राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो"
rajivmasrulkar@gmail.com

पोटाचे अभंग

।। पोट ।।

खूप साहिलेले
गरीबीचे रोज
तरी आहे बोज
पोटावर ।।

काम आणि राम
डोळे पाही वर
हात पोटावर
ठेवोनिया ।।

आमचेच हात
आम्हा नाही जड
हातांचे दगड
झाले तरी ।।

पोठ आणि पाठ
झाले एकजूट
तरी हरिपाठ
म्हणू आम्ही ।।

कापून भाकरी
बांधले मंदीर
तरीही उंदीर
भिडलेले ।।

कसे विसरावे
पोट एक सत्य
पोटाचे अपत्य
भगवान ।।

- राजीव मासरूळकर
(पुर्वप्रकाशित काव्यसंग्रह "मनातल्या पाखरांनो"मधून)

प्रवाही


तारूण्याला जाळून घ्यावे, नशाच देशी ओतून घ्यावी
प्राचीन अर्वाचीन नी पहिल्या धारेचीही कोळून प्यावी
मुरवून देहामध्ये अस्सल झिंग, मातीला माथा द्यावा
पावित्र्याचा फाडून बुरखा, रंग जिन्याचा जाणून घ्यावा !

कर्तव्यांसह हक्कांचे मुद्देही टांगावे वेशीला
रात्रंदिन झिंगून जपावे सत्य इमानाला शीलाला !
चढता चढता हळूहळू ती उतरत जावी हवी नकोशी
आयुष्याच्या अधोगतीला काळ ठरावा अंतिम दोषी !

थेंब नुरावा बाटलीत अणुरेणूंनी कल्लोळ करावा
दिशाहीन डोळ्यांच्या देखत हातांनाही कंप सुटावा
रेडेवाल्या गुराख्याकडे थेंब मागुनी मिळो न काही
तल्लफ सोडून अगम्यतेच्या मार्गे व्हावे स्वतः प्रवाही !

- राजीव मासरूळकर
दि . ५ सप्टेंबर २०१२
रात्री ९:०० वाजता

जगणं...

जगणं . . . . . . . .
वटवाघळासारखं
उलटं लटकून ,
सोडून गेलेल्या
पिलांसाठी
चित्कारत भटकून,
दशदिशांचा वेध घेत
आंधळ्यासारखं
उडणं . . . . . . .

जगणं . . . . . . . !

गटारातल्या अळ्यांसारखं
वळवळत,
अंधारवाटा चिवडत,
सगळा दुर्गंध पोटात घेऊन
वेश्येसारखं
कळवळत
सडणं . . . . . . .

जगणं . . . . . . . !

बैल होऊन
ओटीपोटी
चिकटलेले गोचिड
कुरवाळत,
चिमूटभर अनुभव,
मुठभर पत्रावळ्यांच्या
बुजगावण्यांसमोर
लाळ गाळत
रांगणं . . . . . . .

जगणं . . . . . . !

आपल्याच माणसांची
पोटं तुडवून,
छात्या बडवून,
डोक्यांची शिडी करून
शिखर गाठणं,
हजारो शाखांवर लिलया पसरून,
महावृक्ष वाळवून,
दुर्धर आजारांचं औषध होऊन,
अमरवेलासारखं
माणूसकीला
ठगणं . . . . . . .

जगणं . . . . . . !

आभाळाकडे हात पसरून,
पाय घट्ट मातीत रोवून,
धरतीची छाती फोडत . . . .
चाक नसलेला गाडा ओढत . . . .
किड्यामुंग्यांसारखं झटून,
स्वतःच स्वतःला
लचके तोडणाऱ्‍या श्वापदांना वाटून,
आदिम भावना जपत . . . .
निरर्थासाठी खपत . . . .
शापीत शिक्षा
भोगणं . . . . . .

जगणं . . . . . . !

देहहोमाच्या मातीत
गोड फळांची झाडं
उगवत,
फाटलेल्या लक्तरांना
स्वप्नांची अस्तरं जोडत,
जात्याखाली भरडून
पिठासारखा उजेड देत,
कोशामध्ये कोंंडून घेऊन
ढगाळ डोळे सावरत,
भेगाळलेल्या हातपायांनी
भविष्यरेशिम विणत विणत
कोशाच्याच सरणामध्ये
झिजून
विझून
सरणं . . . . . . . . . . !

जगणं . . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
दि १६.०७.२०१२ सायं ६.०० वा
पानवडोद ता सिल्लोड जि औरंगाबाद

सरडेदादा

सरडेदादा ,
किती सापेक्ष बघतोस तू साऱ्‍या जगताकडे
इथल्या जीवघेण्या धांदलीचा आवंढा गीळत . . . . .. . .

कुठं काही खुट्ट झालं तरी
रस्ता बदलणारा तू
ठरलास ना रक्तपिपासू . . . . .. . ?

अरे ,
फुकाची केळीसुद्धा
लुटलेल्या लोण्यासोबत गिळणाऱ्‍या
या श्वेतवर्णी शर्विलकांना काय माहित
चार दिवस वाळलेले कडवट कुटके
घसा कसे रक्तबंबाळ करीत जातात म्हणून . . . . . . . . .
तरीही तू शांतच
तुझे दगडी डोळे बघतात सापेक्ष
मान न कलवता
वादळात गुरफटलेल्या पाचोळ्यागत जगताकडे . . . . . .. . . !

सरडेदादा ,
जेव्हा येतात तुझ्याकडे
पांढऱ्‍या वेशातले काळे बगळे
आपापले ध्वज घेऊन
हात जोडून
भावनिक साद घालत
आभाळभर आश्वासनं देत
तेव्हा
ठरतोस तू
रंगबदलू . . . . . .
आणि
गारद गारद्यांची
शेंबडी शेंडेफळंसुद्धा
काठ्यांचे फास करून
घोटू पाहतात तुझा गळा . . . .. . . .
करू पाहतात तुझा चेंदामेंदा . . . . . . . . . . !

म्हणे तुझं रक्तच थंड
हिमालयातल्या हिमासारखं
गार गोठलेलं . . . . . .
नव्हे ,
तुझे श्वासच गोठलेले
एका घनगर्द हिरव्या वर्तुळात . . . . . . .
अरे ,
समाधिस्त भासणारे धुर्त बगळेसुद्धा
नेमका नेम साधून
वर्तुळातलेच मासे टिपतात
हे काय तुला ठाऊक नाही . . . .. . . . ?

म्हणूनच म्हणतो ,
सोड तुझा तो रंगबदलू भ्याडपणा ,
फोड ते कवच
तूच आवळलेलं
तुझ्याभोवतीच घट्ट . . . . . . .. .
आणि सांग जगाला ओरडून
तुझं अस्तित्व . . . . .
तुझं कर्तृत्व . . . . . .
तुझं महात्म्य . . . . . . . !

आणि लक्षात ठेव ,
जर आलेच तुझ्याकडे
लोकशाहीचे
हुकुमशाही खोजे
दडपशाहीचे कुपमंडूक दंडुके घेऊन
दमदाटी करत
तर
दाखवू नकोस त्यांना
तुझी पोपटपिवळी पाठ
नाहीतर . . . . . .
टपून बसलेलं हे लुटारू जग
काळ्या मातीने पोसलेल्या छात्यांना
षंढ ठरवून
तुझं पिंंगट पोट
तुडवल्याशिवाय राहणार नाही......
लक्षात ठेव . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

पाऊसधारा

हा हा वारा
या पाऊसधारा
हा वारा या पाऊसधारा
वाहून मज नेती कुठे ?
घेऊन मज जाती कुठे ?

लुसलुसणाऱ्‍या गवतावर
पडती थेंब जणु दहिवर
त्यातून वारा वाहे भरारा
पाहून मजला हसू फुटे !

झुळझुळणाऱ्‍या झऱ्‍याकडे
बळे ओढती मजला गडे
मंजुळ मंजुळ गीत आणखी
डोळ्यांचे पारणे फिटे !

उंच उंच हिरवा डोंगर
क्षितिजापलिकडे फिरवी नजर
आभाळाचे चुंबन घेण्या
पुढती सगळे सुख थिटे !

"पक्ष्यांनो, आणखी भिजा,
या, पाणी उडवू , किती मजा !
अभ्यासाची घरकामाची
कटू सजा ना इथे भेटे !"

"चिंंब चिंब भिजण्याचे असे
कुणी लावले तुला पिसे ?"
माळावरची फुले पाहुनि
आईचा मग रूसवा सुटे !

हा हा वारा या पाऊसधारा !

हा हा वारा या पाऊसधारा ! !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

बरेच झाले

दुःखाने मी कधी न चळलो बरेच झाले
माझा मी ही मलाच कळलो , बरेच झाले !

अवतीभवती गुच्छ फुलांचे खूप लगडले
अवचित मीही सुगंधाळलो , बरेच झाले !

साद घालण्या समोर आल्या लंपट वाटा
काट्यांमधून मी भळभळलो , बरेच झाले !

पाऊस येता झडून गेला मोरपिसारा
मी ही थेंंबांसंगे ढळलो , बरेच झाले !

पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले !

- राजीव मासरूळकर
दि .२.६.१२
रात्री १०.१५ वाजता

Saturday, 27 May 2017

कवी

कवी

ग्रामीण कवी
चारचाकीत बसून
कवीसंमेलनासाठी
शहरातून
गावात येतो...
दारिद्र्याच्या
शेतीमातीच्या
आत्महत्येच्या
त्यावर होणा-या राजकारणाच्या
त्याच त्या
चार कविता ऐकवतो
अन् जागवतो आशावाद...
गोळा झालेलं गाव
करतं टाळ्यांचा कडकडाट...
शहरापेक्षा
गावातच मिळतो मोठा प्रेक्षकवर्ग
अन् मिळते मोठी दाद
असं पुन:पुन्हा मनावर गोंदवून
कवीसंमेलनानंतरचा
पाहूणचार आटोपून
मानधन नको, तर
गाडीत तेल भरायला का होईना
गावानं दिलेलं पाकीट
जड अंत:करणानं
खिशात कोंबून
आल्या चारचाकीतूनच
शहराकडे निघून जातो
ग्रामीण कवी.....

गावही मग
झालं गेलं विसरून
शेतीमातीत गुंग होऊन
जगत राहतं
आपल्याच गतीत..

~ राजीव मासरूळकर
   27/5/2017 02:20 pm

Tuesday, 23 May 2017

कोणीही जीवलग नाही


कोणीही वैरी नाही, कोणीही जिवलग नाही
या श्वासांमध्ये माझ्या थोडीही लगबग नाही

आभाळ निळ्या बुरख्याचे लपवून उन्हाळे बसले
अन् पृथ्वी पंखांखाली घेईल असे खग नाही

श्वासांच्या पैलतिरावर अंधार पसरला आहे
हृदयाची धक् धक् नाही, पैशांची झगमग नाही

बापाच्या डोळ्यांमध्ये हर्षाने आले पाणी
जन्मात एवढे हळवे मज दिसलेले ढग नाही

चल, एक नवे जग शोधू, माणूस जगवण्यासाठी
हे देवधर्मजातींचे जगण्यालायक जग नाही!

~ राजीव मासरूळकर
   04/02/2016
   सावंगी, औरंगाबाद

Monday, 22 May 2017

थेंबामधेच सागर


रागातही असे कर
तोंडात ठेव साखर

विज्ञान, धर्म सांगे
थेंबामधेच सागर

जगतात चंद्र तारे
ठेवून योग्य अंतर

कायम हवी मला ही
हृदयामधील थरथर

भिंती नसो , न दारे
अंबर असो खरे घर !

- राजीव मासरूळकर
दि २० ऑक्टो २०१३
सायं ७.१५ वाजता

वाटत वाटत


चढणे नव्हे चढणे, तळवे चाटत चाटत
जगणे नव्हे जगणे, पैसा लाटत लाटत

आसपास तव असता गंधित दरवळ, वावर
दूर जराही कुठेच नाही जावे वाटत

प्रकाशनाच्या आधी खडतर दिवस असे की
पुस्तक आयुष्याचे आले पुरते फाटत

त्याने बघून केले जेंव्हा मज दुर्लक्षित
तेंव्हापासून नाही मी ही नाचत थाटत

दुःख करत आलो मी गोळा दुखीजनांचे
जाता यावे शेवटास, सुख वाटत वाटत

- राजीव मासरूळकर
दि १९ऑक्टो२०१३
रात्री११.३०वाजता

माणसांतले तारे आपण


मोहरती मातीचे कण कण
सरसरून ये जेंव्हा श्रावण !

भेट आपली होणे नाही
माणसांतले तारे आपण !

झुंज जीवनाची जिवघेणी
श्वासांना काळाचे वेसण !

पूर्ण जाहला जन्मसोहळा
सुख गेले दुःखाला तारण !

घर बांधाया जागा नाही
तरी मनातुन फुलले अंगण !

रुपयाला किंमत नाही ना ?
मग का भासे त्याची चणचण ?

स्वप्नांचे सोने घडवाया
रामाचाही होतो रावण !

मुले पोचती बड्या पदी पण
बापाची संपे ना वणवण !

डाग कुकर्माचा रे जालिम
निष्प्रभ त्यावर सगळे साबण !

-राजीव मासरूळकर
दि १९ ऑक्टो २०१३
सायं ७.०० वाजता

विश्वसम्राट मन


दिवसातून कित्येकदा
मेंदूच्या आडमुठ्या आदेशानुसार
रामकृष्णहरी जपत
माझ्या जबाबदार हातांच्या
पंचशील बोटांच्या
टोकदार
निर्मळ
नैतिक
नखांनी
ओरबाडून काढतो मी
माझ्याच चेह-यावर
क्षणाक्षणाला
निर्लज्जपणे
चढून बसणारे
षड्रिपुबहाद्दर मुखवटे............
पण
माती असून
मातीचाच विटाळ
मानणारी माझी नखं
होतातच
कधी ना कधी मलीन
संवेदना पुकारतात जिहाद
सैल होतं मेंदूसारख्या महान इन्द्रियाचं नियंत्रण
अन्
भावभावनांना क्रुसावर चढवून
निराकाराचा अंधार कवटाळत
देहाच्या सिंहासनावर बसून
राज्य करत बसतं.... यथेच्छ.....
मुखवट्यांसाठी आसुसलेलं
विश्वसम्राट मन.............!

- राजीव मासरूळकर
पानवडोद, जि. औरंगाबाद
दि.13/12/2013
सायं 5:00 वाजता

आहे तसाच आहे


माझेच आरशाला मन देत काच आहे
बघतो मला जसा मी आहे तसाच आहे

आभाळ, चंद्र, तारे, पाऊस... सांगती की
भय, शस्त्र, पिंजरे, घर, कुंपण उगाच आहे

वय, आरसे, मुखवटे, मन, कामही बदलले
मी एकटाच होतो, मी एकटाच आहे

प्रेमात एक होती दोन्ही मने .... खरे .... पण
तू वेगळीच आहे, मी वेगळाच आहे

श्रद्धा, उपासना अन् भक्ती मनात शोभे
नैवेद्य, नवस, नारळ नापाक लाच आहे

- राजीव मासरूळकर
1/1/2014

बाजार


बाजार भरला
मी गेलो
पाहिलं :

एक गोरीगोमटी विशीतली
तारूण्याने रसरसलेली
नटूनथटून बसलेली
गोड आवाजात बोंबलली :
"इज्जत घ्या इज्जत ऽ ऽ ऽ !",
अर्धा बाजार धावला
इज्जतीवर तुटून पडला . . . . !

एक तिशीतला मिशीतला
कमरेत वाकलेला
हाव-या डोळ्यांचा
हळुच कुजबुजला :
"ईमान घ्या ईमान ऽ ऽ ऽ !",
काहीन्नी मिचकावले डोळे
अन् ईमानावर तुटून पडले . . . . !

एक दोरेवाला ढेरीवाला
धोतरवाला टिळेवाला
बेसूर ओरडला :
"ईश्वर घ्या ईश्वर ऽ ऽ ऽ !",
उरलेसुरले धावले
ईश्वरावर तुटून पडले . . . !

माझ्या लक्षात आलं
मी इश्क न्यायला आलेलो !
उल्हासित होऊन
मी आरोळी ठोकली :
"अरे, इश्क आहे का कुणाकडे, इश्क ऽऽऽऽऽऽ ?"
सगळा बाजार
माझ्याकडे बोट दाखवून
खदाखदा हसायला लागला . . . . . . !

- राजीव मासरूळकर
'मनातल्या पाखरा*नो'
तुका म्हणे प्रकाशन, बुलडाणा
मार्च 2006

मही माय म्हने


मही माय म्हने मले, जाय वावरात मेल्या
तुह्या येवढाल्या पो-ही निंंदाखुरपाले गेल्ह्या

मह्यायेवढा झाला आता कामंधंदे पाह्य जरा
गाव गुरोनं सोडुन दे, बंद कर येरझारा

तुही रांड आल्यावर मले कडंकडं खात जईन
'आयतं खऊ सांड मह्या गळ्यात गुतोला', म्हनत जईन

रोज रोज धुन्यामंधी कपडे टाकतू भाराभर
मह्या फाटक्या लुगड्याह्यची जरा तरी लाज धर

पोरीची जात आस्ता तं येधुळ दोन्तीन जंदले आस्ते
धगड्याच्या धाकात रहून दगडंधोंडे रांधले आस्ते

मायवर मव्ह फिरलं डोखं, म्हनलो, चाललो वावरात
सगळा गहू भिजवून येथो, संद्याकाळी हुईन रात

जाय मह्या राज्या, म्हनत माय झाली थंडी
पुन्हाक म्हने, लवखर येझू, करून ठुते अंडी !

- राजीव मासरूळकर
मनातल्या पाखरांंनो
मार्च2006

सफाई


शहरातून
गावात आलो...

गावात हिंडतांना
कावऱ्‍याबावऱ्‍या शहरी नजरेत
भरल्या
दोन-तीन गावठी विश्वसुंदऱ्‍या . . . . .

मनातला बेडूक
स्वतःच्याच डबकी-विश्वात
उड्या मारत
राहिला ओरडत ड्राँव . . . ड्राँव . . . . .

शेतावर आलो
अन् लक्षात आलं,
ज्या काळ्या मातीत
हिरवी हिरवी पिकं डोलायला हवी होती,
तिथं
गर्द पिवळं तण माजलं होतं . . .

माय निंदत होती . . .

नकळतच
हाती खुरपं घेऊन
मी ही निंदू लागलो

जसजसं तण साफ होत होतं . . .
तसतसं मनही साफ होत होतं . . . . . !

~ राजीव मासरूळकर
'मनातल्या पाखरांनो'
मार्च २००६

देव माझ्या काय हृदयातून गेला?


चंद्रताऱ्‍यांच्या मनी वाहून गेला
सूर्य अंधारास लाडावून गेला

जिंदगी हरिणाप्रमाणे धावली . . . पण
काळ वाघासारखा खाऊन गेला !

जाहली मंदीर मस्जीदीत गर्दी
देव माझ्या काय हृदयातून गेला . . . ?

"पांग फिटतो बघ उकिरड्याचा खरोखर",
चेहरा माझा कुणी वाचून गेला !

शोध घेतो मी कधीचा कोण येथे
जग असे निःस्वार्थ साकारून गेला ?

~ राजीव मासरूळकर

अभिव्यक्त व्हायचे आहे

मज सागरात जगण्याच्या वाहून जायचे आहे
अन् पाण्याहुन नीतळसे अभिव्यक्त व्हायचे आहे

मी कुठे कवी साहित्यिक, मी साधासूधा माणुस
मज रक्ताला रक्ताशी जोडून घ्यायचे आहे

मी पंख छाटले माझे दृष्टीच्या दिव्य करांनी
मज मातीवर मातीचे गुणगान गायचे आहे

तू निर्दय पाउस होउन जातोस वेळ का चुकवुन
तुज हृदयातिल थरथरते आभाळ द्यायचे आहे

तू डोळ्यातिल मेघांना आवरून धर थोडेसे
मज विरहग्रीष्मात आधी, न्हाऊन घ्यायचे आहे !

- राजीव मासरूळकर
दि १.८.२०१३
दुपारी. १.०० वाजता

भेटण्यास ये तू


सखे आग आहे
तुझी देहबोली
गुलाबाची लाली
ओठांवर ।।

नाकावर राग
देह जसा नाग
अत्तराची बाग
सदाफुली ।।

तुझे शब्द येती
जणू सूर येती
मला दूर नेती
स्वप्नदेशी ।।

तुझ्या वागण्याला
रेखीवता अशी
पडतसे फशी
पाहणारा ।।

तुझे गुण गाणे
नव्हे माझा हेतू
भेटण्यास ये तू
सांजवेळी ।।

- राजीव मासरूळकर
  दि.18.10.2011

शब्दयज्ञ


वास्तवाच्या रानाचं भान
शब्दाशब्दातून व्यक्त करणारे
आपण . . . . .

सत्य असत्य ,
चांगलं वाईट ,
ओंगळ भोंगळ ,
दिव्य, लांछन
सगळं सगळं मांडण्याचा
ठरवून पण . . . . . .

धरित्रीला गांजणारं ,
बियाण्यांची अडवणूक करणारं
ढेकूळ न् ढेकूळ
चुरा करणारी
हाती घेतलेली
सच्चेपणाची तिफण . . . . . . .

अवतीभवती माजलेलं तण . . . .
पेटलेलं रण . . . . . .
काळाची
मेंदूत चाललेली घणघण . . . . . .
कधी ताजमहल
कधी दलदल
कधी उदय . . .
कधी प्रलय . . .
करताहोत
पाऱ्‍यासारख्या चंचल
अन् ज्वालामुखीसारख्या अस्वस्थ
शब्दांत गुंफण . . . . !

भविष्याच्या लाखो पिढ्यांसाठी
स्थितप्रज्ञ होऊन
चालवलाय आपण
हा ज्वलंत शब्दयज्ञ . . . . .

हे सकलजनकल्याणकर्त्या
अजरामर शब्दांनो,
उजळून टाका यातून
मानवाचा क्षण अन् क्षण . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर

चिरंतन


काय माझे नाव आणिक कोणता हा गाव आहे ?
कोठल्या रे स्थानकाते ही अनामिक धाव आहे ?

कोणता अमरत्वदायी मंत्र माझे श्वास जपती ?
सागराच्या मध्यभागी की उलटली नाव आहे ?

रोज माझे भिष्मशब्दच उर्मटांचे भक्ष्य होती
षंढ शीखंडीच येथे जिंकतो का डाव आहे?

चंद्रकोरीची प्रभाही का बळी जाते तमाला
चोर येथे जो खरोखर, तोच इथला राव आहे !

कापडांना, कागदांना बेहिशेबी भाव येथे
माणसाची भावना अन् वेदना बेभाव आहे !

नंददीपाच्या जिभेला सुक्ष्म काळी चीर गेली
तीच माझ्या मर्मस्थानीचा चिरंतन घाव आहे !

- राजीव मासरूळकर

कळी

गुलाबकळीसम
तुझे ओठ ते
तव ओठांवर
नजर गोठते

डोळ्यांमधल्या
पाण्यामधुनी
अनुरागाची
घुमती गाणी

गालावरच्या
खळीत वाटे
विश्वभरातील
सौख्यच दाटे

कच(सं)भारातून
बट सुटलेली
भासे मज जणु
अमृतवेली

तुझा देह हा
विजेसारखा
पावसासवे
जाहला सखा

तुझ्या मिठीची
ऊब आगळी
मम मौनाची
फुलुन ये कळी !

- राजीव मासरूळकर
दि १४.१.२०१३
रात्री ९.४० वाजता

जगून घे जरा


खळाळतो उफाळतो थरारतो जसा झरा
असेेच तू प्रसन्नसे नरा, जगून घे जरा !

रडूनही हसायचे, फसूनही हसायचे
हरायचे मरायचे नि दुःख पांघरायचे
क्षणोक्षणी तरी सुखात ठेव बांधवा, उरा
असेेच तू प्रसन्नसे नरा, जगून घे जरा

मुठीत काळ घ्यावया तुझ्यात आत्मशक्ति रे
न देव दानवात सत्य, मानवा तुझे खरे
भिती कशास फोल ती ? स्वभाव टाक लाजरा !
असेेच तू प्रसन्नसे नरा जगून घे जरा !

कशास राग लोभ मोह मत्सरास पोसशी ?
प्रकाशमान हो जसा कि शुक्ल पक्ष नी शशी !
भयान रात्र संपते नि सूर्य येतसे घरा !
असेेच तू प्रसन्नसे नरा, जगून घे जरा !

निराश पाश तोडुनी जगायचे जगायचे
पहाड लंघुनी कटू, पुढे पुढेच जायचे
नकोच आत्मघात! कर्म नेतसे दिगंतरा !
असेेच तू प्रसन्नसे नरा , जगून घे जरा ! ! !

- राजीव मासरूळकर
दि १०.१.२०१३
रात्री ११ वाजता

काटा


मना रक्ताळुनी गेला तुझ्या शब्दांतला काटा
तरी झाला तुझा माझा गणागोतात बोभाटा
कशाला भेटुनी तू पैनगंगेच्या तिरावरती
सरळ रस्त्यास माझ्या फोडला व्याकूळसा फाटा ?

जरी वाहून जल गेले तुझ्या प्रीतीनदीमधले
समुद्रासारख्या माझ्या मनी उसळे खुळ्या लाटा !
सुखाचे चार क्षण जडवून ठेवूया सखे हृदयी
खुले आभाळ भिरभिरण्या, खुल्या साऱ्‍या तुला वाटा !

राजीव मासरूळकर
सायं ७ वाजता
दि ३०.१०.१२

भाते


घरघर करुनी फिरत राहते घासाशिवाय जाते
जीवन जळते , वणव्यामध्ये जणु गवताचे पाते !

कुठली शिल्लक , ठेव , बचत नी कुठली आणेवारी
डोहामध्ये मीन बुडावा , कर्ज जीवाला खाते !

चेहऱ्‍यावरी चढवुन घेतो नवे मुखोटे खोटे
अंतर्हृदयातून निसटते पण जपलेले नाते !

प्रेम जाळते , छळते , कळते,जडते तरी कुणावर
जातो सोडुुन कृष्ण , राधिका तरी विराणी गाते !

अंध अपंगा , पॉलीशवाल्याला 'ना' म्हणती सगळे
नाव झळकते तिथे ओतती खिसे आजचे दाते !

अहिंसकांना शांतिदुतांना लोकशाहीस ठोकर
बलात्कार देशावर करती भारतभाग्यविधाते !

वाग्बाणांना आवर सावर वापर बुद्धी राजू,
मारतील मन आणि माणसे ठरतिल नुसते भाते !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
दि १३.१०.२०१२

शेवट

शेवट

लख्ख प्रकाशाकडे
पाहून पाहून
वैतागतात डोळे
डोकंही जातं पिकून .

घराबाहेर पडून
मिट्ट काळोखाकडे
बघावं एकटक
तेव्हा डोळे होतात शांत
गार वाऱ्‍याच्या स्पर्शानं
डोकंही थंडावतं
थाऱ्‍यावर येतं मन
हृदयाला फुटते नवी पालवी.

कसं हायसं वाटतं अंधारावर नजर फिरवतांना !
आपलासा वाटायला लागतो तो
एका क्षणात . . . .
कवटाळून घ्यावा असा . . . . . . !

प्रकाशानंतर अंधार
दिवसानंतर रात्र
सुरूवातीनंतर शेवट . . . . . .?

प्रकाशाकडून अंधाराकडे
सुरू असतो आपला प्रवास
हे मान्य करायला
जरा अवघडच...
पण
शेवट तर तसाच आहे ना सगळ्यांचा ?

- राजीव मासरूळकर

जगणे अनंत आहे...


झगडून वादळांशी जगणे अनंत आहे
हे गाव वेदनांचे मजला पसंत आहे !

संकल्पना जगाच्या आता किती बदलल्या
सगळे करून बसला , तो पुण्यवंत आहे !

सांगा कुठेय वस्ती त्या मुक्त पाखरांची ?
शोधात मी सुखाच्या फिरतो दिगंत आहे !

दिसतात आज सारे बाबा पिसाटलेले
भांडून सांगती की हो मीच संत आहे !

वाटा जुन्याच मिळती साऱ्‍या नव्या पिढ्यांना
ग्रीष्मासही म्हणवती , सुंदर वसंत आहे !

जिवनाकडून आता उरल्या न फार आशा
ती भेटलीच नाही , इतकीच खंत आहे !

जखमा तनामनाच्या ठसठस करून छळती
तितकेच वाटते मी आहे , जिवंत आहे !

जगतो कसाबसा तु वळवळ करून"राजू"
कसली गझल ? जगाला तू शब्दजंत आहे !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

Sunday, 21 May 2017

तू दिसल्यावर मला न सुचते काही... गीत

 तू दिसल्यावर मला न सुचते काही
     तू दिसल्यावर....!
तू दिसल्यावर मलाच भुलते मीही
     तू दिसल्यावर....! ।।धृ।।

फुलास लाजवणारा सुंदर चेहरा हसरा
     पूर्ण गझल तू, मी शेरातील एकच मिसरा
     वाह.. वाह ही दाद निघाली शाही
     तू दिसल्यावर.....!!!1!!

पहिला पाउस भिजवुन जावा तशीच भिजले
   वसंतातला पळस फुलावा तशी बहरले
   तुला टिपुन घेण्याची नयनी घाई... 
   तू दिसल्यावर ...! !!2!!

तुझ्या रेशमी डोळ्यांमध्ये भविष्य दिसले
   अता न वाटे काही कोणी असले नसले
   तुझ्याकडे वळतात दिशाही दाही.... 
   तू दिसल्यावर! !!3!!

सांग कधी तू भेटायाला येतो आहे
    हात कधी तू माझा हाती घेतो आहे
    मनही माझे मला जुमानत नाही... 
    तू दिसल्यावर!!! 4!!

दे चल हाती हात, साथ कायमची
   काळजात प्रज्ज्वलित असो फुलवात सुखाची
   परस्परांना देऊया प्रेमाची ग्वाही... 
   आज खरोखर!!! 5!!


~ राजीव मासरूळकर
   सिल्लोड, जि.औरंगाबाद
   दि.25/4/2015
   रात्री 11:30 वाजता

पावसा रे

बहाणे सोडुनी ये पावसा रे
मनाचे कोरडे झाले किनारे

कसे एकाच वेळी सांग ठेवू....
क्षुधा पोटात अन् ओठात नारे???

तुझ्या वेणीवरी गजरा बहरला
बघुन रस्त्यासही फुटले धुमारे

विनवते संकटांना माय माझी
मुलांचा बाप आल्यावरच या रे

~ राजीव मासरूळकर

मी खुला बाजार झालो...

गझल

उष्ण झालो गार झालो
मी खुला बाजार झालो

तोलले आभाळ सारे
पण भुईला भार झालो

पंख मी फैलावले अन्
माणसांनो , घार झालो

त्या फुलाने स्मित केले
मी उरी गंधार झालो

घेतली माघार थोडी
तोच फुसका बार झालो

मी खऱ्‍याचे ढोंग केले
ईश्वरी अवतार झालो

मी खरे बोलून गेलो
लोकहो , गद्दार झालो

घेतली स्वेच्छानिवृत्ती
मी घरी भंगार झालो

नेमका दुष्काळ पडला
अमृताची धार झालो

चुंबिले तू मज असे की
तत्क्षणी मी ठार झालो !

- राजीव मासरूळकर
दि.२९.६.२०१२
रात्री १०.३० वाजता
पानवडोद,ता सिल्लोड

मंत्रालयाला आग लागते तेव्हाची कविता...


आग आणि खुर्ची

घरात आग
दारात आग
नारीत आणिक
नरात आग
उजेडात आग
अंधारात आग
ज्वानीच्या ऐन
भरात आग
रानात आग
रणात आग
सृष्टीच्या
कणकणात आग
पाण्यात आग
गाण्यात आग
खणखणणाऱ्‍या
नाण्यात आग

आग अशीच पसरत चाललीय
कणापासून
मनामनापर्यंत ..........
साम्राज्यांचं धुपट निघालं,
किल्ले गेले,
वाडे जळाले....
मंत्रालयाचे तिला वावडे नाहीच......
फायली जळतील,
माणसं जळतील .....
पण
खुर्ची कधी जळते काय . . . . . . . . . . . . ?

खुर्ची हा आत्मा आहे
कृष्णाने सांगितलेल्या
भगवद्गीतेतल्यासारखा . . . . . . . .

हे लोकशाहीवाल्यांनो ,
खुर्ची कधी जन्मतही नाही
कधी मरतही नाही
खुर्चीवर बसणारेच मरतात फक्त !

जो खुर्चीला नाशरहित
अजन्म नित्य अव्यय
मानतो
तो इतरांना मारूनही
न मारणाराच !

जशी झाडं पिकलेली पानं त्यागून
नवी पालवी धारण करतात
खूर्चीही अशीच
माणसं बदलत राहते . . . . . . . . . !

खुर्ची शस्त्राने कापल्या जात नाही
आगीत जाळल्या जात नाही
पाण्यात बुडवून नष्ट केल्या जात नाही
सोसाट्याचा वाराही
तिला हलवू शकत नाही !
कारण . . . . . . . .
ती अच्छेद्य आहे
अदाह्य आहे
अक्लेद्य आहे
अशोष्य आहे . . . . . . . !

खूर्ची नित्य
सर्वव्यापी
अचल आणि
सनातन आहे !

म्हणूनच म्हणतो
खुर्चीला सलाम करा
खुर्चीवर बसणाऱ्‍याला सलाम करा . . . . .

कारण
घरात आग
दारात आग
नरनारींच्या
'दप्तरा'त आग . . . . . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
दि . २१.०६. २०१२
रात्री ९.४५ वाजता
Jun 22, 2012

का.....?

का पुन्हा पुन्हा
भरून येतं ऊर ?
कुणाच्या हा आठवांचा
अनामिक पूर ?
का कुणी पाठीमागे
असण्याचा भास ?
का मनी हसतं
कुणी दिलखुलास ?
का साग झडतो
झडझडून पानं ?
का येतं ओठी असं
हुरहुरभरलं गाणं . . . . ?

- राजीव मासरुळकर

निघालीस सखे कुठे?



निघालीस सखे कुठे विचारीत गाव ?
तुझ्या गालावर माझ्या ओठातले भाव !

पोटऱ्‍यांत आली बघ शेतातली पिके
सांग बरे , मातीही का साहते हे घाव ?

पंख झडलेल्या जरा मयुरांना सांग
सुर्याआड झोपलेल्या जलदांचा ठाव !

संध्याकाळ होत आली भोवताली सखे
चराचरी करीताहे प्रीत शिरकाव !

खराखुरा अंधःकार भिववितो गडे
खोट्या प्रकाशाचा आता तरी दिवा लाव !

- राजीव मासरूळकर

निसर्गरीत

दर संध्याकाळी
इथे येते
पाचपन्नास वानरांची
एक बावनबीर टोळी !

कुणाच्या हातात वाळलेल्या पोळ्या
कुणाच्या हातात भाकरीचे कुटके
कुणाच्या हातात मकेची कणसं
कुणाच्या हातात फळंफणसं
कुणाच्या पोटाला गुलाबी लेकरं
सगळ्याच तोंडून पोटभर ढेकरं !

ती इथे दररोज येतात
हात उगारणाऱ्‍यावर दात विचकत
कडुलिंबाच्या झाडावरून उतरून
शाळेच्या खिडक्यांमधून डोकावत
जाऊन बसतात वडाच्या फांद्यांवर
एकमेकांच्या पाठीवरील उवा खात !

सुट्टीच्या दिवशी
काही हळूच शिरतात
उघड्या खिडकीतून
शाळेच्या खोलीत
मुततात , विष्टतात बाकाबाकांवर
फळ्यावरील काळ्या अंधारात
जाऊ न देता थोडाही तोल
पाहतात आपला इतिहास भूगोल
आणि परत फिरतात समाधानी होऊन
कि कुणीच कुणावर विचकले नव्हते दात
कुणीच कुणाचा केला नव्हता घात
आणि कुणीच कुणावर केली नव्हती मात !

जगणं हाच त्यांचा अनुभव
अनुभव हेच त्यांचं जगणं !
कुणी जन्मल्याचा उत्सव नाही ,
कुणाच्या मरणाचं फारसं सोयरसुतक नाही !

ती इथे दररोज येतात
आडावरच्या बादलीमधलं पाणी पितात
शेवग्याचा पाला
ओरबाडून ओरबाडून खातात
आणि जाऊन बसतात
वडाच्या शेंड्यावर
वडाची लाल पोपटी
कोवळी कोवळी पानं खात !

मिळेल तसलं खाणं
वाटेल तिथं राहणं
वाटेल तेंव्हा एखादी शेपूट वर करणं
कळा आल्या की जनणं
काळ आला की मरणं !

मुखी कुठे वेद नाही
संस्कृतीचा खेद नाही
काळा गोरा भेद नाही
संपत्तीचा मेद नाही !

शाळेचा अभ्यास नाही
फैशनचाही फास नाही
प्रसिद्धीहव्यास ­ नाही
मुक्तीचाही ध्यास नाही !

देवाधर्मांचा सडा नाही
धर्मग्रंथांचा काढा नाही
पापांचा कुठे पाढा नाही
पुण्याचाही राढा नाही
पश्चातापाचा किडाही नाही
रांधा-वाढा-उष्टी काढा, नाहीच नाही !

विज्ञानाचा मंत्र नाही
वेळेच्या हातातलं यंत्र नाही
आधुनिक आधुनिक तंत्र नाही !

बोकाळलेल्या माणसाचे
हे आहेत मायबाप
दुःख, दैन्य, बेचैनीचे
बांधलेले माथी शाप !
माणसा, माणसा, शिक, शिक
विटला-बाटला आत्मा विक
बिघाड बुद्धी, कर ठीक
क्षमेला क्षमेची माग भीक
काळोखाकडे नेणाऱ्‍या या
शुभ्र मार्गा मार कीक !

ती इथे येतात
अनादिकाळापासूनच
टोळीटोळीने . . . . .
धरतीला धरून
अनंत जगण्याची निसर्गरीत
माणसाला शिकवण्यासाठी . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

http://m.facebook.com/groups/184609531574665?view=permalink&id=478505755518373&refid=18&_ft_=src.24%3Asty.308%3Aactrs.100002716249877%3Apub_time.1359253360%3Afbid.478505755518373%3As_obj.4%3As_edge.1%3As_prnt.11%3Aft_story_name.StreamStoryGroupMallPost%3Aobject_id.184609531574665%3Aobject_timeline_token_map.Array

रिक्तता...


रिकामी नजर, श्वासही हे रिकामे
रिकामे कसे शब्द सारे, जीवा?
रिकामेच गेह, रिकामाच देह
रिकामी निकामी कशी ही हवा?

न जाणीव ...न स्पर्श होई कुणाचा
कि घोट प्यालो मी हलाहलाचा
न मी अंतराळी, न भूमीवरीही
न पाय मज अन् न थारा कुणाचा
खरा सूर्य भासे जणु काजवा!

भरारा निरर्थक शब्द:धुराळा
अंतर्मनी गरगरे कु:पाचोळा
न साद कुठली, न छाया कशाची
निष्पर्ण खोडांचा फुटलाय पोळा
आणि पंख तुटलेला मी पारवा!

साठेबाज अश्रू, नफेखोर माया
यंत्रवत जगाचा बघे घास घ्याया
न मी कुणाचा, न कोणी कुणाचा
अनिश्चिततेचे सत्यनीर प्याया
लुटारूंची येथे सुरू वाहवा!!!

~ राजीव मासरूळकर

वार्धक्य

मलाच माझे असणे आता जाचत आहे
उसवुन गेली वाकळ पुन्हा टाचत आहे

मनात असते कायम भीती मोहरण्याची
निर्माल्याचा कचरा नुसता साचत आहे

डोळ्यांमधले रंगच गेले हरवून माझ्या
कारण देवा भगवद्गीता वाचत आहे

आसपास ही अतीभयावह मरणशांतता
स्मशान झाले जीवन मृत्यू याचत आहे

वेळ कशाला? मिठीत सत्वर ये यमदेवा
जीव तुझ्या स्वागते पोरका नाचत आहे !

जाताना का वळून मागे पाहतोय मी
देह एकटा अजूनही ... हे जाचत आहे !

- राजीव मासरूळकर
दि १०.१०.११
दु ३ वाजता

काहूर...

तू जवळ आहेस
असं क्षणोक्षणी वाटतं,
तरी का हे मनात
असं काहूर दाटतं?

झुलतो वारा, फुलतो मोगरा
तुझ्या आठवणीने येतो शहारा
उडते मेघ, पावसाची रेघ
तुझ्या केसांच्या गंधाने भेग
पडते मनाला
मृद्गंध झाल्यासारखं वाटतं!

पहाटे पहाटे तुला शोधता एकटे
मखमली स्पर्श तुझा धुक्यातून भेटे
उन्हातून,  पाखरांच्या चिवचिवीतून
तुझे बोल, तुझे सूर ऐकता दुरून
सावल्यांमधून तूच आल्यासारखं वाटतं!

नदीच्या किनारी,  रोज उदास दुपारी
कुणी गातसे विराणी, हुंदकेही येती कानी
जाई बेभानून मन, डोळे थकती धावून
शोधताना तुला तन जाई घामेजून
पैलतिरी फुलांतून तुला हसू फुटतं!

एकदाच सखे, फक्त एकदाच ये
भ्रमांना नि भासांना या खरे रूप दे
वा-यातून, ता-यांतून
पावसाच्या सरीतून
धुक्यातून, उन्हातून
सरीतेच्या पाण्यातून
नवीन अवतार घे.. . ...
वेगाने वेगाने ये.....

त्वेषाआवेशानं, श्वासाविश्वासानं
तुझंच व्हावंस वाटतं........!

तू जवळ आहेस
असं क्षणोक्षणी वाटतं
तरी का हे मनात
असं काहूर दाटतं .....?

~ राजीव मासरूळकर

आत्ममग्न काठ

मी
एक आत्ममग्न काठ
गहिवरून आलेल्या तळ्याच्या
अनावृत्त लाटेत
क्षणभर भिजणारा,
प्रवासी पक्ष्यांचे थवे
परत गेल्यावर
आठवणींच्या आगीत
विझणारा,
पहाडाची छाती असूनही
हवेच्या हळव्या झुळूकेत
कणाकणाने
झिजणारा,
पावसाळलेली पायवाट लेवून
काटेरी फुलांना कुरवाळत
कोरड पडलेल्या मनातच
थिजणारा . . . . . . . . . !

मी
एक आत्ममग्न काठ
श्वासांतून उसळणारे
हुंकार
कुंपणातच डांबून
अपरिहार्य त्सुनामीची
वाट बघत
स्वप्नवत आभासांत
रिझणारा . . . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
मासरूळ ता जि बुलडाणा
दि २८.७.१२
सायं ६.००वाजता

Saturday, 20 May 2017

झोपा आता! ....... गझल

थकले विटले असाल दिनभर , झोपा आता
ओढुुन घ्या दुःखाची चादर , झोपा आता

चमक रातची भुरळ घालते भरबाजारी
आयुष्यच बाजारू खेटर, झोपा आता

स्वप्नांचा धुरळा झालेला बघता दिवसा
सुख स्वप्नांचे भोगा मनभर, झोपा आता

यंत्रालाही हवीच थोडीशी विश्रांती
यंत्र न होतो तोच खरा नर , झोपा आता

आकाशाला लख्ख लगडल्या लाख चांदण्या
एक चांदणी तुम्हास सादर , झोपा आता

मरमर मरमर मरता फिरता कितीक वाटा
मरणे अंती एक धरोहर , झोपा आता !

- राजीव मासरूळकर
मु. पो. मासरूळ
ता. जि. बुलडाणा
दि १६.४.१२ रात्री १०.५० वाजता

कसा देव व्हावा अमर, माणसाचा?

गझल

दिसे चेहरा ना निडर माणसाचा
कसा देव व्हावा अमर, माणसाचा?

जरी दु:ख शाश्वत, तरी ही अपेक्षा
असो नित्य हसरा अधर माणसाचा

असे बीज पेरू, असे पीक घेऊ
जमीनीस यावा बहर माणसाचा

करू लागलो उत्खनन मी स्वत:चे
दिसू लागला मज पदर माणसाचा

जिथे आठवे स्वार्थहेतूच तेथे
पडे माणसाला विसर माणसाचा

इथे पेटलेली........ भुकेचीच होळी
जळू विकृती द्या: गजर माणसाचा

असा रंग खेळू धुलीवंदनाला
हरेकास यावा कलर माणसाचा

~ राजीव मासरूळकर

उत्पत्त्यार्थ


निर्जिवांची चिंंता
सजीवां सदैव ।
निर्जीवच जीव
सजीवांचे ।।

सजीव निर्जीव
दोघे सहजीवी ।
शब्द आणि कवी
सख्य जैसे ।।

देह आणि आत्मा
सजीव निर्जीव ।
भक्तास उणीव
ईश्वराची ।।

नकाराविना ना
सकारास अर्थ ।
खरा उत्पत्त्यार्थ
निर्जीवांत ।।

जड अणुरेणू
अतिवेगवानू ।
अचलानवाणू
चालवितो ।।

आभाळाचे अणू
ग्रहगोल भानू ।
संगणक मनू
गणू कैसे ? ।।

जरी निराकारा
जोडावेत हात ।
प्रवाहपतित
होऊ नये ।।

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

मृत्युच्या मोहात मी


विश्वकाळडोहात मी
मृत्युुच्या मोहात मी

त्वेषात मी द्वेषात मी
पूर्णातही लेशात मी
भूलयारोहात मी
मृत्युच्या मोहात मी

भक्तित मी भोगात मी
तेजात मी अन् मी तमी
मातीत मी लोहात मी
मृत्युच्या मोहात मी

मुर्खांत मी पुरूषोत्तमी
मुंगीतही मदमत्त मी
माझ्याचशी दो हात मी
मृत्युच्या मोहात मी !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा

www.facebook.com/मराठीकवितासमुह/

हासता मी


हासता मी, मोगऱ्‍याचे फूल तू होतेस राणी
हासता मी, गंधवेडी तू प्रिये गातेस गाणी !

गडगडोनी मेघ काळे बरसती हृदयात तुझिया
हासता मी, चेहऱ्‍यावर इंद्रधनुही ये फुलाया !

हासता मी, हासते डोळ्यांत तुझिया लख्ख पाणी
सांगते ते मम मनाला तव मनामधली कहाणी !

हासता मी, हासती तारे नभी वारे सभोती
आणि देती ओंजळीभर आठवांचे गूजमोती !

हासता मी . . . हासता तू . . . . हासती साऱ्‍या दिशाही
सांगती हे भास बा रे, तूच नाही ! तूच नाही !!

- राजीव मासरूळकर
दि २४.०७.२०१३
सकाळी ८.३० वाजता

लाख दु:खे मी उशाशी ठेवतो... गझल


लाख दुःखे मी उशाशी ठेवतो
आठवांना तव , उराशी ठेवतो

ठोकतो मी खूप गप्पा वैभवी
माय-बापाला उपाशी ठेवतो

शासनानूदान लाल्याचे मिळो
जाळतो ज्वारी, कपाशी ठेवतो

भरकटू देतो मनाला स्वैर मी
कैक हाताशी खलाशी ठेवतो

कोरडे जाती जरी सारे ऋतू
साथ केवळ पावसाशी ठेवतो

काम सोपे फार पैसा लाटणे
लाज बाजारी जराशी ठेवतो !

- राजीव मासरूळकर

काळसर्प

मनात उचंबळताहेत
अस्वस्थ काळसर्पाच्या
असंख्य जिभांसारख्या
रौद्र लाटा..
धुंडाळतोय मी
जगण्याच्या निबीड अरण्यातून
सुगंधित श्वासांच्या
निर्भीड वाटा !

- राजीव मासरूळकर
दि ११.०७.२०१३

दरी

दरी

दरी आहे .
दरी खूप खोल आहे .
खाली वाकून पहावं
तर गुडूप अंधार
ऐतिहासिक आंधळा अंधार . . . . . . . . . . . . . !

मी उभा आहे
दरीच्या अलिकडच्या कठड्यावर
पोळणाऱ्‍या उन्हाच्या धगीचाही थरकाप
इथल्या गवतभरल्या माणसांना . . . . . !

दरीचा पलिकडचा कठडा . . . .
कठडा कसला . . . . . ?
उंचच उंच मोहक डोंगर !
प्रेतांचे लचके तोडणाऱ्‍या
गिधाडासारखा उंच . . . . .
टोकाकडे पहावं
तर टोपीच पडते खाली !

कित्येक बळींनी झोकून दिलेत
आपले कष्टाळू देह
याच दरीत ,
कित्येक नववधू
पेटल्या उभ्याच
याच दरीच्या वणव्यात ,
बालपणीच फिरला
कित्येकांच्या कपाळावरून पिळवणुकीचा
नांगर -
याच दरीमुळे !
पलिकडच्या शिखरावर पोहोचण्याची
आशा ठेऊन
कित्येक उतरले दरीत ,
बनवले त्यांना याच दरीने
चोर, खूनी, दरोडेखोर . . . . .
कित्येकांना भिकारी . . . . . !

दरी उतरून
पलिकडच्या कठड्यावर पोहोचणं
महाकठीण काम . . . . !
कित्येकांची हाडे
पिचून पिचून
सापळेच उरलेत
या कामाने . . . . . . . .

अलगद
सहज उडी मारुन
त्या शिखरावर पोहोचता आलं असतं
तर . . . . . . . . . ?

किंवा
दोन्ही टोकांवर दोन पाय ठेऊन
जगता आलं असतं तर . . . . . . ?

याच गवताळ काठावरील
तमाम जनतेला दरीत फेकून,
एकावर एक चढवून,
त्यांची मस्तकं पायतळी तुडवीत,
मळक्या टोप्या उडवीत,
स्वतःच्या कापडांना
एकही डाग
न लागू देता,
स्वतःच्या हातांना एकही फोड
न येऊ देता
अलगद
सहज
आमच्यातूनच
पांढऱ्‍या पोशाखांतली काही धुर्त माणसं
पलिकडच्या शिखरावर पोचलेली . . . . . .
काही पोचण्याच्या प्रयत्नात असलेली . . . . . . . .

दरी सतत वाढतेच आहे -
मस्तकं तुडवणाऱ्‍या पायांवरच
पुन्हा माथे टेकतात म्हणून . . . . . . . . . !

दुसरीकडून माती आणून
ही दरी बुजावी म्हटलं
तर
पुन्हा एक नवीन दरी निर्माण होण्याचाच धोका मोठा !

कुणी धरतच असेल
तर करंगळी धरू द्यावी,
आवश्यकताच असेल
तर
तर्जनीने वाट दाखवावी,
करंगळी धरता धरता
मनगट पकडून
खांद्यांच्या पायऱ्‍यांवरून
डोक्यावर चढवून घेणं
खूप झालं . . . . . .
खूप झालं आता
भ्रष्ट पायांखाली
निष्पाप मस्तक तुडवून घेणं . . . . . . .. . . . !

माय म्हणवणाऱ्‍या मातीत
ही एवढी दरी . . . . . . ?
का . . . . . . . . . . . . . . ?
कशासाठी . . . . . . . . . ?

आपल्याच डोक्यावर बसून
आपलंच रक्त वरपणाऱ्‍या
या गुबगूबित बाळसेदार गोचिडांना
पलिकडचा चमचमणारा डोंगर
दरीत खचवायला भाग पाडणं
अत्यावश्यकच . . . . . !

दरी भरून निघालीच पाहिजे .. . . . . .
या ना त्या
किंवा कोणत्याही मार्गाने. . . . . . .
कोणत्याही परिस्थितीत . . . .. .
अगदी काहीही झालं
तरीही . . . . . . . . !

- राजीव मासरूळकर
सन २००६ मध्ये प्रकाशित"मनातल्या पाखरांनो" या कवितासंग्रहातून

Wednesday, 17 May 2017

पारा

पारा

मज स्पर्शुन जातो हळवा
संध्येचा विरही वारा
मेंदूतुन झिरपून जातो
तव आठवणींचा पारा...
तुज शोधित जातो तुझिया
अंधुकशा वाटेवरती
का रंग लपवती झाडे ?
काळोख उधळते पणती ...?

- राजीव मासरूळकर
17.01.2013 7.00PM

Thursday, 11 May 2017

हल्ली

**हल्ली** 

घडू जे नये ते घडे रोज हल्ली 
खरे कोपऱ्‍याला दडे रोज हल्ली ! 

फितूरी चहाडी मुजोरी लबाडी 
शिकाया मिळे हे धडे रोज हल्ली ! 

सुखाचे कुठे येथ गर्भार होणे ? 
तुटे मायचे आतडे रोज हल्ली !

कधी ना कुणाला कटू बोलला तो 
स्वतःला शिवी हासडे रोज हल्ली ! 

तुझ्या लाजण्याला कुठे अर्थ आता ? 
तुला पाहतो ना गडे (नागडे) रोज हल्ली ! 

कशाला हवे ईश्वरी पावसाळे ? 
सरी आसवांच्या पडे रोज हल्ली ! 

"विकासातुनी जा लयाला, मनूजा" 
थरारे धरा , ओरडे रोज हल्ली ! 

- राजीव मासरूळकर 
मासरूळ , ता जि बुलडाणा 
दि . ११.०९.२०१२ 
रात्री ९.३० वाजता

पाऊस उरातुन झरतो

पाऊस उरातुन झरतो

पाऊस धरेचा प्रियकर
पाऊस पिकांचा ईश्वर
पाऊस नभाचा उत्सव
सुखदु:खामधले अंतर

पाऊस उरातुन झरतो
उठवीत वादळे ओली
रक्तात भिनवतो माझ्या
सृष्टीची हिरवी बोली!

पाऊस जरा भिरभिरतो
काठावर आठवणींच्या
पाण्यात उमटते नक्षी
हृदयातील पुष्करणींच्या!

पाऊस ढगातच विरतो
सुकलेल्या ओठांमधला
पाऊस घोर तडफडतो
भुक ल्याल्या पोटांमधला .....

पाऊस थबथबलेला
झाडांच्या पानोपानी
पंखांतील गोठुन उर्जा.....
चोचींतील घोटुन वाणी......!

डोळ्यांतुन बरसुन सा-या
पाऊस जरासा उरतो
क्षितिजावर अवतरलेल्या
सूर्याला पाहुन झुरतो.....!

~ राजीव मासरूळकर
दि. 30/12/2005

साथ

'साथ'

साथ कळ्या खुडण्याची आली, लहर नव्हे
हे सुमनांचे स्मशान आहे, बहर नव्हे !

दुःखच झाले औषध रोगांवर सगळ्या
रोज प्राशुनी जगतो आहे, जहर नव्हे !

शोधत होतो माणसातला देव इथे
हे तर जंगल जनावरांचे, शहर नव्हे !

पृथ्वीमाते, कर उलथापालथ येथे
किती मातला माणुस, झाला कहर नव्हे ?

थांबा, क्रूर पशुंनो, मध्ये शिरू नका
शरीर हे 'राजिव'चे, ते खंडहर नव्हे !

~राजीव मासरूळकर
पानवडोद, जि. औरंगाबाद
दि. २५.११.२०१३
दुपारी १२.०५ वाजता

आभाळ द्यायचे आहे

आभाळ द्यायचे आहे

जगण्याच्या निखळ प्रवाही वाहून जायचे आहे
मज पाण्याहुन नीतळसे अभिव्यक्त व्हायचे आहे

मी कुठे कवी साहित्यिक, मी साधासूधा माणुस
मज रक्ताला रक्ताशी जोडून घ्यायचे आहे

तू डोळ्यातिल मेघांना आवरून धर थोडेसे
मज विरहग्रिष्मात आधी, न्हाऊन घ्यायचे आहे !

मी पंख छाटले माझे दृष्टीच्या दिव्य करांनी
मज मातीवर मातीचे गुणगान गायचे आहे

तू निर्दय पाउस होउन जातोस वेळ का चुकवुन
तुज हृदयातिल थरथरते आभाळ द्यायचे आहे !

- राजीव मासरूळकर
दि १.८.२०१३
दुपारी. १.०० वाजता

मी चुंबुन घेतो धरती

चुंबून घेतो धरती !

पाहून प्रियेचा चेहरा स्मित फुलते भलते गाली
पहाटेच्या प्रहरी तसली क्षितिजाच्या ओठी लाली !

सामावून घेती झाडे आपल्यातच आभाळाला
धुक्यातून उगवून येते पाचुंची डोंगरमाला !

चकचकती चांदी लेवून झुळझुळती झर्झर निर्झर
सृष्टीच्या कंठी फुटती मधु धुंद सुरांचे पाझर !

शेतांचे हिरवे शालू वाऱ्‍यावर सळसळतांना
प्रीतीत मोहरुन जाती ढोलीतील राघूमैना !

पाहुन हे सगळे सगळे डोळ्यांना येते भरती
सांडून भान ओठांचे मी चुंबून घेतो धरती !

- राजीव मासरूळकर

एक टेकडी

एक टेकडी

गावकडेला विरक्त निर्जन एक टेकडी रेखिव ठाशिव
तिच्या शिरावर तिच्यासारखे एकट राकट पडके देउळ
दोन तरूंचे दोन हात ती पसरुन नभास बघते आहे
इतिहासाला ठसवुन पचवुन स्वतः स्वतःला ठगते आहे !

पिकापिकांतुन गवतफुलांतुन धावत येतो शीतल वारा
हाच सखा नित जवळी राहुन शीण तिचा घालवतो सारा
अधुनमधुन ती हलते डुलते खुलते फुलते या वाऱ्‍यास्तव
नंतर बसते अविरत झेलत निरर्थकाचा मुजोर विस्तव !

ओढ तिला पण असते कायम स्वैर खगांची, श्याम ढगांची
हजार क्रोधित जिभा दाखवित कडाडणाऱ्‍या लख्ख विजांची
झिमझिम रिमझिम टपटप सरसर रपरप थडथड जलधारांची
तळहातांवर घेता घेता वितळत जाणाऱ्‍या गारांची
खळाळ पाझर झऱ्‍या नद्यांची, गवततुऱ्‍यांची, कळ्याफुलांची
चरता चरता हुंदडणाऱ्‍या, हंबरणाऱ्‍या जित्राबांची
खऱ्‍याखुऱ्‍या उघड्या शाळेतील झिम्मा . . . फुगड्या . . . सवंगड्यांची . . . . !

खिन्न मनाने युगे युगांते तपस्विनी ती तपली आहे
जखमांवरती जखमा लेवुन खपल्यांसंगे खपली आहे

मानुषतेच्या
वरती आहे
तिचे राहणे . . . .
काळोखाच्या
पुढती आहे
तिचे पाहणे . . . .

खोटी हिरवळ, लटका पाझर- तिला कधी ना जमले आहे
विसावण्या त्या पायथ्यास जग मनामधुन डगमगले आहे
झाडी गेली, पक्षी गेले, तिथे खायला नाहित दाणे
जुळून आले तिचे न् माझे बेसुर भेसुर जीवनगाणे !

हल्ली नियमित संध्याकाळी तिच्याकडे मी जाउन बसतो
हताशशी ती माझ्यामध्ये तिला स्वतःला खोदत बसते
मी ही नकळत तिच्यात माझे उदास मीपण शोधत बसतो !

- राजीव मासरूळकर
दि. २९ जून २०१३

सांग...

सांग . . . . .

वाळवंटी पायखुणा अजूनही पाहतेस
प्रेमाचे हे विरही क्षण सांग कशी साहतेस ?

पहाटेचे उन जसे फुलला तुझा चेहरा
बोलावून बाहेर मला देते तुझा शहारा
सांग माझ्या शहाऱ्‍यांत तू कशी दाहतेस ?

मेघांतून बरसतेस तू थेंब होऊन
तन मन चुंबून तुझ्या आठवणींत नेतेस वाहून
आठवांच्या सरीत माझ्या तू कशी नाहतेस ?

संध्याकाळच्या हवेतून होतात तुझेच भास
रातराणी सुगंधातून येतात तुझेच श्वास
सांग माझ्या श्वासांविना तू कशी राहतेस ?

किती दिवस आता असे दुरून दुरून पहाणे
कुणकुण ऐकून होईल जुने वारे शहाणे
सांग कधी वाऱ्‍यासारखी माझ्या मिठीत येतेस ?

- राजीव मासरूळकर
मासरूळ , बुलडाणा

माझ्या त्या सा-या कविता..

माझ्या त्या साऱ्‍या कविता

अत्यानंदातच विरल्या
दुःखातही नुरल्या काही
माझ्या त्या साऱ्‍या कविता
शब्दांत उतरल्या नाही !

आईच्या डोळ्यांमधल्या
बापाच्या छातीवरल्या
माझ्या त्या साऱ्‍या कविता
दगडाच्या लेणी ठरल्या !

कधि शेताच्या बांधावर
कधि रस्त्याच्याच कडेला
सूर्याचा वंशज कोणी
देवास पुकारून गेला
कोसळला तरिही नाही
कुठल्याच ढगातून पाऊस
माझ्या त्या साऱ्‍या कविता
बसल्यात उजाडुनिया कुस

एकांती तडफडणाऱ्‍या
मौनाला कुरतडणाऱ्‍या
माझ्या त्या साऱ्‍या कविता
रूधिरातून पाझरणाऱ्‍या !

माझ्या त्या साऱ्‍या कविता
हृदयात बसवलेल्या मी
होईलच देह निकामी
तेव्हा त्या येतील कामी !

- राजीव मासरूळकर
दि . २४.८.१२
सकाळी ८.४५ वाजता

मनासारखे झाले नाही

मनासारखे झाले नाही

नको मानवा मनास लावू क्षुल्लक खोचक उगीच काही
विस्मरून ते हसत म्हणावे मनासारखे झाले नाही

सुंदर कोमल फुले चुलीतच आयुष्याला जाळत बसती
उमरावांच्या इमल्यांसाठी निरागसांची जळते वस्ती
नियमांआडुन चोरांसाठी सदाच असती पळवाटाही
हसून खोटे पुन्हा म्हणावे मनासारखे झाले नाही

जन्म मिळाला रंकघरातून जसे मिळाले जगून गेलो
स्वप्न कशाचे वास्तवातही कितीकितीदा मनात मेलो
अन्यायाने लाचारीने सर्वांगाची होते लाही
नशीब नियती म्हणू कशाला.... मनासारखे झाले नाही

जे कामाचे ते दुसऱ्‍याचे, कुचकामी ते सगळे माझे
चुकलेमुकले स्विकारूनही नवागतांना झालो ओझे
हे मित्रांनो , विश्वच तुमचे , आनंदाने देतो ग्वाही
पंख उभारुुन म्हणू नका पण मनासारखे झाले नाही

जन्मा येणे, खाणे, पीणे, हसणे, रडणे, कष्ट उपसणे
निरर्थभरल्या आयुष्याला झिजवून सजवून विझून जाणे
माझे माझे जपून सारे नसते माझे धन कायाही
कशास गावे रडगाणे की मनासारखे झाले नाही !

- राजीव मासरूळकर
मासरूळ जि बुलडाणा
दि २५.५.१२, ५.०० वा

तू...

तू....

सोनकोवळ्या सांजउन्हातुन
तुला पाहतो अंतरामधुन
दूर मंदिरी वाजे घंटा
रव येई तव पैंजणांमधुन !

धरणावरचा वारा ओला
स्पर्शुन जाता तुझ्या तनाला
सलज्ज तृप्ती तुझ्या मुखीची
मोहीत करते सांजनभाला !

गालावरची बघून तुझिया ,
आभाळीही चढते, लाली
तुझ्या पावलांना स्पर्शाया
श्वास रोखते धुंद लव्हाळी!

सूर्य थांबतो क्षितिजावरती
ढगाआडुनी तुला बघाया
गवतफुलेही तुझ्या दर्शनी
उधळुन देती मधाळ फाया !

तुला लपेटुन घेण्यासाठी
अंधाराला होते घाई
किर्र वनापल्याडुन येऊन
चंद्र तुझी बघतो नवलाई !

घरास तुझिया , मनात माझ्या
चालत डोलत पोचतेस तू
शब्दरूप तुज देतो , कायम
मम हृदयी वसतेस तूच तू !

- राजीव मासरूळकर
मु पो मासरूळ
ता जि बुलडाणा
दि १४.१०.२०१०
सायंकाळी ६.०० वाजता

प्रवास



आज
अगदी अनोळखी  असूनही
सोबत प्रवास केला आपण...
तुझं वागणंही सहाजिकच होतं
अनोळखीचं....
शुन्यात बघत राहिलीस खिडकीतून बाहेर काही वेळ
तर थोडा वेळ कानांना  हेडफोन लावून
डोळे बंद करून
गढून गेलीस गाणी ऎकण्यात...
मी सुद्धा मग
तुझ्याकडे लक्ष नसल्यासारखं भासवत
मोबाईलमध्ये डोकं घातलं बराच वेळ...
उतरण्यासाठी उठताना 
एक कटाक्ष टाकावासाच वाटला तुझ्याकडे
तर तुझे डोळे बंदच....
एक शब्दही न बोलल्याचं शल्य
सद-यावरची धूळ झटकावी
तसं झटकून मी खाली उतरलो
तर खिडकीतून तू 
खिन्न डोळ्यांनी
माझ्याकडेच बघत असलेली.......

का गं ? ? ? ? ? 

~ राजीव मासरूळकर
19/9/2014
05:30pm

सखे तुझी निराळीच त-हा

*तुझी निराळीच तऱ्‍हा*

ओठातून ओसंडतो गुलाबाचा गंध
गालातली खळी करे नयनांना धुंद
झुकते पापणी मान कलवते जरा
लाजण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

खोल खोल डोळ्यांमध्ये लखलखे पाणी
मधाळसे शब्द तुझे पडतात कानी
हृयाच्या आत आत फुलतो मोगरा
बोलण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

भांडतेस रूसतेस शोधतेस पुन्हा
आवेगाने मिठीमध्ये शिरतेस पुन्हा
मनातला पाझरतो तुझा प्रीतझरा
वागण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

कधी कुठे थांबतो मी होतो मला वेळ
मनामध्ये सुरू होतो तुझ्या वैरखेळ
चेहराही होतो तुझा घाबराघुबरा
साहण्याची सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

कित्ती कित्ती करशील माझ्यावर प्रेम
कधी कुठे काय होई नसतोच नेम
सत्यवान नाही तरी तुझा खराखुरा
प्रिय मला सखे तुझी निराळीच तऱ्‍हा !

- राजीव मासरूळकर
दि . ४ जून २०१२
दुपारी २.०० वाजता

बोभाटा

आत शांतता, वरवर लाटा
निरर्थ याउप्पर बोभाटा

जो संरक्षण करी फुलाचे
तो या जगती ठरतो काटा

जगण्याचे संदर्भ बदलले
वाट्यावरुनी ठरती वाटा

कर वर्षाव नभा दाण्यांचा
विव्हळतो कणसाविण धाटा

आठवते मज रुचकर जेवण
आई...चुल...वरवंटा...पाटा!

~ राजीव मासरूळकर

मतदारांनो...

मतदारांनो.....

दान करा मत, मतदारांनो
बदला ही गत, मतदारांनो

स्वत:स विकण्यामध्ये सांगा
कुठली इज्जत, मतदारांनो

सुदृढ जनतंत्राचे आहे
तुमचे मत - छत, मतदारांनो

घरात बसता प्रश्न वाढती
बदला आदत, मतदारांनो

स्विकारल्याने काळा पैसा
घटते बरकत, मतदारांनो

गुंडगिरी, अन्याय दडपण्या
मत ही ताकत, मतदारांनो

पैसा दारू देणे घेणे
वाईट ही लत, मतदारांनो

महाराष्ट्राला करण्या उन्नत
अवश्य द्या मत, मतदारांनो!!!

~राजीव मासरूळकर
 दि.15  ऑक्टो. 2014
सकाळी 11 वाजता

ओठांमध्ये गझल पाहिजे

डोळा कायम सजल पाहिजे
ओठांमध्ये गझल पाहिजे

श्वास नव्हे जगण्याचे कारण
..कुणी घेतली दखल पाहिजे

रहावयाला असो झोपडी
हृदयी सुंदर महल पाहिजे

सुख नसते पैशांतच केवळ
थोडे कुतुहल, नवल पाहिजे

जगता जगता मरतो आपण
श्वासांनाही बदल पाहिजे

वास्तव निष्ठुर असते सोबत
सुस्वप्नांची सहल पाहिजे

जगणे सार्थक व्हावे, मित्रा
मृत्यूपुढती मजल पाहिजे

~ राजीव मासरूळकर
दि.29/07/2014
रमजान ईद
सकाळी 9:50 वाजता

https://www.facebook.com/pages/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80/155987694573820

जाळ देवा

।।जाळ देवा।।

सुकलेली पिके
पाहू नये वाटे
उरी दुःख दाटे
झोपड्यांच्या

हातातोंडालागी
आला होता घास
आता उपवास
आमरण

खर्चाचा डोंगर
झाला डोईजड
देवही दगड
झोपलेला

पिकांनीही आता
टाकल्यात माना
माझ्याही या तना
जाळ देवा !

- राजीव मासरूळकर
दि ९.१०.११
सारोळा औरंगाबाद

शिलाई

शिलाई

आतड्यांची उसवता शिलाई
दुःख होते तुलाही, मलाही

ठेव विश्वास, पण कर चिकित्सा
ऐकले जे, खरे तेच नाही

नाव घेती कुणी शाप देती,
ठेव चालू तुझी तू भलाई

आपल्यांच्या पुढे मान दे पण,
तू न व्हावे कधीही कसाई

सांग पैसा, घरे, बंगले की
मानसन्मान असली कमाई ?

जर शिकाया न जमलेच जगणे
व्यर्थ आहे पढाई लिखाई !

रोज हरतो मनातून युद्धे
मारतो पण हसुन मी बढाई !

का म्हणावे मुके या पशुंना ?
हंबरुन बघ पुकारीत गाई !

का सुखे येथ इतिहास घडतो ?
आटते सांडते रक्तशाई !

भोवती जर सदा तेच धोंडे
बहरु दे अंतरातून जाई !

बाप उन्हातली सावली अन्
ऊब थंडीतली खुद्द आई !

~ राजीव मासरूळकर

मेघपापणी

मेघपापणी

गहिवरलेल्या आभाळाने
हळु उचलली मेघपापणी
मुजरे करती झाडे वेली
पशुपक्षीही लक्ष करांनी

दिशा उधळती गुलाल वेड्या
सरणावरती बसल्या जाउन
क्षितिजाचाही कंठ दाटला
पाहत सारे डोंगरावरुन

वारा विझला, काळ गोठला
आभाळाची मिटे पापणी
क्षितिजाच्या अन् ओठी स्फुरली
क्षीण तांबडी विरक्त गाणी

या गाण्यांचा रातकिड्यांनी
अंधारातच उत्सव केला
मिटल्या डोळ्यांतच आभाळी
शुभ्र दाटला चांदणमेळा

असेच गेले हर्षित तन क्षण
नभास पडले स्वप्न विलक्षण
मिटलेल्या त्या पापणींचला
रविराजा हळु गेला चुंबून ...!

गहिवरलेल्या आभाळाने
पुन्हा उचलली चिंब पापणी
अवनीवरती तृणपात्यांवर
चांदणमौक्तिकांची विखुरणी ...!

~ राजीव मासरूळकर
दि. 06/10/2005

कवडसा

"कवडसा"

झुळुक हवीशी
मोहक दरवळ
शुद्ध शांतता
तन मन निर्मळ !

अपुर्व लाली
ढगांत होळी
दूर खगांच्या
सुरेल ओळी !

गवतावरती
विलसे सोने
कणसांमधले
भरती दाणे !

हिरवाईवर
खेळे वारा
नदीत सांडुन
चमके पारा !

रस्त्यावर मी
संमोहितसा
जपत मनातुन
लाल कवडसा !

~ राजीव मासरूळकर
   दि. २२.१०.२०१३